आधुनिक जग, त्यातील वस्तू आणि त्या वापरण्याच्या आपल्या चुकीच्या पद्धती यांमुळे आता नव्या व्याधी जन्माला येऊ लागल्या आहेत. मोबाईल फोन ही अशीच आधुनिक काळाची देणगी आणि आधुनिक काळाची गरज; पण ही काळाची गरज आता काळजीचे कारण ठरतेय. मोबाईल फोनकडे पाहण्याच्या आपल्या चुकीच्या पद्धतीमुळे मणक्याचे आजार जडायला सुरुवात झाली आहे. या आजाराला 'टेक्स्ट नेक' असे म्हटले जाते.
मोबाईलवर सतत व्यस्त असणारे लोक मान खाली घालून सतत एकटक काम करताना दिसतात. त्यामुळे मानेतील मणक्यांच्या हाडांना इजा होते. हा आजार कदाचित भविष्यात गंभीर रूपही प्राप्त करू शकतो.
मोबाईलच्या वाढत्या वापराने 'टेक्स्ट नेक' हा आजार झपाट्याने बळावताना दिसतोय. आपण मोबाईल पाहताना, वापरताना दोन्ही हातात धरतो आणि मान खाली वाकवूनच त्यावर काम करत राहतो. त्यामुळे मानेवरील ताण वाढण्यास आता मोबाईल कारणीभूत ठरू लागले आहेत. यामुळे मानेच्या हाडांची झीज होते. प्रसंगी मानेचे हे दुखणे बरे करण्यासाठी शस्त्रक्रियेचा आधारही घ्यावा लागू शकतो.
फोनमध्ये डोके खुपसून बसणार्या कित्येक व्यक्ती आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे पाठीच्या वरच्या बाजूच्या दुखण्याच्या तक्रारींत वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. ही पाठदुखी भविष्यात गंभीर रूप धारण करून पाठीच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो.
अनेक जण आपला स्मार्टफोन पाहत असताना कित्येक तास कुबड काढून मोबाईल स्क्रीन जवळ घेऊन बसतात. अशा व्यक्तींना डोकेदुखी, मानदुखी, हातदुखी आणि बधीरपणा असे त्रास होऊ शकतात. नेहमीच्या उभे राहण्याच्या पद्धतीमध्ये मान आणि पाठ सरळ राहात असते; पण जेव्हा आपण मान खाली करून खूप वेळ पाहत राहतो तेव्हा मान, पाठ आणि कणा या सगळ्यांवरच त्याचा ताण येतो.
खाली वाकून पाहण्याची, काम करण्याची स्थिती काही अगदी आत्ताची नाही, तर ही पारंपरिक पद्धतच म्हणायला हवी. कारण अभ्यास करताना, वाचन करतानाही आपण याच पद्धतीने बसत आलो, वाचत आलो; पण जेव्हा आपण मोबाईलवर मेसेज टाईप करत असतो, तेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी सुरू असतात आणि मुख्य म्हणजे बराच काळ या गोष्टी सुरू असतात. त्यामुळे मानेचे दुखणे मुलांना सहन करावे लागू शकते.
आजार –
* तीव्र पाठ दुखीपासून सुरुवात होऊन पाठीच्या वरील बाजूच्या स्नायूंचे ताणले जाणे ज्याला 'मसल्स स्पाझम' असे म्हटले जाते.
* खांदे दुखणे आणि ओढल्यासारखा वाटणे. त्याचा परिणाम म्हणून खांद्यांच्या स्नायूंवर ताण येणे.
* मानेची नस दबली जाणे
उपाय काय?
आपण मोबाईल वापरणे बंद करू शकत नाही; पण जेव्हा मोबाईल पाहू, तेव्हा तो नजरेच्या टप्प्यात धरा. कोणतेही गॅझेट, लॅपटॉप, टॅब हेसुद्धा आपल्या डोळ्यांच्या पातळीवर ठेवून मगच त्यावर काम करा. त्यामुळे आपल्याला मान खाली घालून सातत्याने काम करण्याची वेळ येणार नाही.
फोनवर किंवा लॅपटॉपवर काम करत असाल तर अधूनमधून काम थांबवा. दर 20 ते 30 मिनिटांनी विराम घेण्याची आठवण करून देणारे अलार्म क्लॉक लावा. अलार्म होताच उठून थोडे चालून या.
आपल्या ऑफिसमध्ये संगणकाची स्क्रीन डोळ्यांच्या पातळीवर आहे ना, याची खात्री करून घ्या. त्यामुळे तुमची मान सरळ राहण्यास मदत होईल.
थोडक्यात, सांगायचे झाले तर सातत्याने खाली वाकून पाहू नका. दिवसभरात सातत्याने डोके पुढे वाकवून काम करू नका. अधून मधून थोडा विराम अवश्य घ्या. त्यामुळे आपल्या मानेच्या हाडांवर आणि पर्यायाने पाठीच्या कण्यावर ताण येणार नाही.
लक्षात ठेवा –
आपली शारीरस्थिती योग्य आहे की नाही, याकडे दिवसभर जाणीवपूर्वक लक्ष ठेवा. आपण गाडी चालविताना, टीव्ही पाहताना मान झुकवून पाहत नाही ना, याबाबत सतर्क राहा. कोणत्याही कामासाठी आपण खूप वेळ मान खाली झुकवून काम करत असू तर ती आपल्या भविष्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे जाणीवपूर्वक खाली वाकून बराचवेळ कोणतेही काम करणे नक्कीच टाळायला हवे.
डॉ. संतोष काळे