बकरी ईद विशेष : ‘त्याग आणि बलिदानाचा उत्सव’

file photo
file photo

शफीक देसाई : निर्मिकाचे विश्‍व, सृष्टी, आपली मातृभूमी, आपला देश, देशबांधव, आपली संस्कृती याविषयी प्रेम, आत्मीयता, आस्था, जिव्हाळा व सौहार्द हेच जीवनाचे, जगण्याचे गमक आहे. माणसाने सन्मान, शांती, सुरक्षितता आणि विकास, समृद्धी व सुधारणांच्या संधी व हक्‍कासह जीवन जगावे, हाच जीवनाचा उद्देश असावा. मानव आणि समाजाचे कल्याण व उद्धार हे अंतिम ध्येय असावे. मानवतेचा जागर व्हावा. मानवी जीवनमूल्ये व नीतिमूल्यांचा गौरव व्हावा. यातच आपले हित व सौख्य सामावलेले आहे; परंतु माणसाचा अमर्याद स्वार्थ, हव्यास आणि ओरबाडून जगणे हे मानवी जीवन व विश्‍वकल्याणाच्या वाटेत निश्‍चित अडथळा ठरू शकते. अशावेळी निर्मिक व मानवी जीवन यांच्याप्रती त्याग, बलिदान, सेवा, समर्पण या गोष्टी मात्र गौरवाच्या ठरतात. खरे प्रेम व जीवन हे त्यागातच दडलेले आहे.

अशाच गौरवाचा, उत्सवाचा क्षण म्हणजे 'ईद उल अद्हा' (त्याग व बलिदानाची ईद) होय. निर्मिक व त्याची निर्मिती याप्रती प्रेम, भक्‍ती व कृतज्ञता व्यक्‍त करत असताना त्याग, बलिदान, सेवा, समर्पणाचा संकल्प, वचन व इरादा व्यक्‍त करणे व यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हाच उद्देश 'बकरी ईद'च्या निमित्ताने असतो.

मानवी जीवनाच्या हजारो वर्षांच्या या वाटचालीमध्ये परमेश्‍वर व त्याची निर्मिती आणि मानवतेसाठी आजपर्यंत अनेक प्रेषितांनी त्याग व बलिदानाची आत्यंतिक सीमा गाठली. हजरत इब्राहिम (अ.) यांनी एक परमेश्‍वर व मानवतेच्या प्रतिष्ठापनेसाठी आपला अत्यंत प्रिय पुत्र यांच्या बलिदानाची व हजरत इस्माईल (अ.) यांनीही आपल्या वडिलांच्या आदेशार्थ पराकाष्ठेेचा इरादा केला. याच उद्देशासाठी आजपर्यंत अनेक प्रेषितांनी त्याग, बलिदानासह प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. तसेच पैगंबरांचे सोबती (सहाबा), वली-औलीया (सूफी संत- महात्मे), विद्वान या सर्वांनी इस्लामच्या प्रतिष्ठापनेसाठीच आपले कार्य केले आहे. या सर्वांच्या कार्याचा गौरव व आठवण म्हणूनच हा त्याग, बलिदान व समर्पणाचा उत्सव 'ईद उल अद्हा' म्हणून साजरी केली जाते.

हजरत महंमद (स.) पैगंबर यांनीही आपले सर्वस्व जीवन इस्लामच्या प्रतिष्ठापनेसाठी समर्पित केले. भक्‍ती, अध्यात्म व दुनियावी जीवन यांचा योग्य ताळमेळ पैगंबरांनी घालून दिला. एक ईश्‍वराची भक्‍ती व अध्यात्म या माध्यमातून परमेश्‍वराचा मार्ग दाखवला. परमेश्‍वराच्या भक्‍तीमध्ये शुद्ध, बुद्ध व भान हरपून आणि भौतिक, सांसारिक गोष्टींचा त्याग व विरक्‍तीचा मार्ग नाही. मग परमेश्‍वराचा मार्ग कोणता आहे? खरं तर हा भक्‍तिमार्ग भौतिक, सांसारिक जीवनातूनच समाजाचे कल्याण, चांगले व भल्यासाठी जातो. यासाठी मात्र त्याग, समर्पण व प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे बंधन आपल्यावर आहे. इस्लामने सांगितलेली नैतिक व जीवनमूल्ये अंगीकारण्यासाठी आणि अनिवार्य कर्तव्य बजावण्यासाठी झोकून देऊन या मार्गात समर्पण व पराकाष्ठा करणे गरजेचे आहे.

इस्लामचे आचरण आपणास भौतिक, सांसारिक मार्गातूनच परमेश्‍वराच्या (अल्लाह) मार्गावर नेते. म्हणजे परमेश्‍वराला राजी करण्यास निव्वळ त्याची भक्‍ती व अध्यात्म पुरेसे नाही, तर यासाठी कर्तव्यकठोर भौतिक, सांसारिक गोष्टी पार पाडणे आवश्यक आहे. इस्लामची अनिवार्य कर्तव्ये पार पाडण्यासाठी तुमचे कर्म आत्यंतिक त्याग, समर्पण व प्रयत्नांच्या पराकाष्ठेचे असले पाहिजे. सर्वात मोठा त्याग म्हणजे स्वतःचा अहंकार, स्वार्थ व अप्पलपोटेपणा यांचा त्याग करा. समाजात आधुनिकता व सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करा. गरीब, गरजवंत व सामान्यांच्या अडचणी व प्रश्‍नांसाठी त्यागाची तयारी ठेवा. जगात ज्ञान प्राप्‍त करण्यासाठी सर्व दूर पोहोचा व त्यासाठी पराकाष्ठा करा. दीनदुबळे, वंचित व पीडितांची सेवा करा. निराधारांना आधार द्या. त्यांना मदतीचा हात द्या. त्यासाठी पराकाष्ठा करा. अन्याय, अत्याचार, शोषण व पिळवणूक सहन करू नका. स्वतःचा चरितार्थ कष्ट व प्रामाणिकपणे चालवा आणि इतरांना आर्थिक मदतीचा हात द्या.

आजारी, वृद्ध व माता-पिता यांची सेवा करा. मानव व समाज यांचे सर्वांगीण कल्याण व भल्यासाठी आणि मानवतेसाठी आपल्याकडे असलेल्या साधनसुविधेसह यथाशक्‍ती प्रयत्न करा. यासाठी त्याग, सेवा, समर्पण व प्रयत्नांची पराकाष्ठा करा. हे सर्व मार्ग व प्रयत्न निश्‍चितच परमेश्‍वराकडे घेऊन जातील. हाच संदेश व शिकवण सामान्य माणसांत रुजावी, या उद्देशाने 'ईद उल अद्हा'सारखा त्यागाचा उत्सव साजरा करण्यात येतो.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news