फोटोग्राफी : ‘लाईक्स, शेअरने फोटोग्राफीचे गांभीर्य हरवले’

फोटोग्राफी : ‘लाईक्स, शेअरने फोटोग्राफीचे गांभीर्य हरवले’
Published on
Updated on

कोल्हापूर; प्रतिनिधी

फोटोग्राफीसाठी संयम असायला हवा. न थकता अथकपणे दीर्घकाळ परिश्रम केल्यानंतर फोटो वाचता येतो. मात्र अलिकडे लाईक आणि शेअरसाठी फोटोग्राफी केली जात असल्याने त्याचे गांभीर्य हरवत चालले आहे, अशी खंत वाईल्डलाईफ फोटाग्राफर स्वप्निल पवार आणि डॉक्युमेंट्री फोटोग्राफर इंद्रजित खांबे यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन आणि व्हिजन आय फोटो व्हिडिओ असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फोटोग्राफी कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी असोशिएशनचे उपाध्यक्ष आकाश चव्हाण होते. अर्थशास्त्र अधिविभागाच्या सेमिनार हॉलमध्ये ही कार्यशाळा झाली.

'प्राण्यांच्या डोळ्यांतील भाव पकडता आले पाहिजेत'

स्वप्निल पवार म्हणाले, वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्ये सर्व प्राण्यांना तितकेच महत्त्व आहे. कोणत्याही प्रकारच्या फोटोग्राफीत त्या फोटोचा नेमका उपयोग काय, याची स्पष्ट कल्पना असायला हवी. प्राण्यांच्या प्रजननाचा काळ किंवा प्राण्यांचे अधिवास यांची फोटोग्राफी करताना काळजी घ्यावी. वन्यजीवांचा आदर करणे आणि त्यांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने फोटोग्राफी व्हावी. प्राण्यांच्या डोळ्यांतील भाव पकडता आले पाहिजेत.

पवार म्हणाले, वन्यजीवांच्या फोटोसाठी प्रकाशाचे ज्ञान हवे. प्राण्यांची माहिती आणि त्यांच्या दिनचर्येबद्दल किमान माहिती हवी. जंगलाच्या आसपास राहणार्‍या लोकांशी संवाद साधता आला तर त्या त्या परिसरातील वन्यजीवांची माहिती मिळू शकते. जंगलात फोटोग्राफी करताना वन्यजीव संरक्षण कायद्यासह अन्य नियम आणि संकेत पाळले जावेत. शिवाय जंगलात कायम दक्ष असणेही आवश्यक आहे. फोटो काढून तो सोशल मीडियावर टाकायचा आहे आणि त्याला लाईक्स मिळवायच्या आहेत, अशी भावना असेल तर गुणवत्तापूर्ण फोटोग्राफी होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

डॉक्युमेंट्री फोटोग्राफी हा अत्यंत महत्त्वाचा विषय

इंद्रजीत खांबे म्हणाले, डॉक्युमेंट्री फोटोग्राफी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कोणत्याही छोट्या विषयावर अशा पद्धतीची फोटोग्राफी करता येते. अगदी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या भावभावना टिपूनसुद्धा उत्तम फोटोग्राफी होऊ शकते. कोकणातील ओमप्रकाश चव्हाण या दशावतार कलाकाराच्या जीवनावर उच्च दर्जाची फोटोग्राफी झाली आहे. कोल्हापुरातील कुस्तीवरही चांगली डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. तालीम, पैलवान, त्यांच जगणं, व्यायाम, गावागावातील कुस्त्यांचे फड, तेथील ईर्ष्या अशा एकाच विषयाशी संलग्न असणार्‍या विविध घटकांना जोडून आगळी डॉक्युमेंट्री फोटोग्राफी करण्यात आली आहे.

फोटोमध्ये सामाजिक, सांस्कृतिक बंध

फोटोमध्ये सामाजिक, सांस्कृतिक बंध असतात. ते शोधता आले पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी त्या-त्या संस्कृतीचा फोटोशी संबंध येतो. अनेक बदलाची नोंद फोटोग्राफीमुळे घेता येते. याासठी डॉक्युमेंटशन खूप महत्त्वाचे आहे. फोटो वाचता येणे ही एक मोठी कला असून ती लगेचच आत्मसात होत नाही. यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. अनेक चांगल्या फोटोंचा अभ्यास करावा लागतो आणि त्यातून आपण स्वतःची धारणा तयार होण्यास मदत होते. सोशल मीडियाच्या जमान्यात घाईने प्रसिद्धी मिळविण्यासाठी फोटोग्राफीचा वापर केला जात आहे. मात्र यातून गुणवत्तापूर्ण फोटोग्राफी होत नसून विषयाकडे उथळपणे पाहण्याचा दृष्टीकोन बळावत आहे. फोटोग्राफीसाठी ही चांगली गोष्ट नाही, असे खांबे यांनी म्हटले.

अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत केले. कार्यशाळा सहसंयोजक अभिजित गुर्जर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी माजी समन्वयक डॉ. रत्नाकर पंडित, विवेकानंद महाविद्यालयाच्या फोटोग्राफी विषयाचे शिक्षक रवीराज सुतार, फोटोग्राफर असोशिएशनचे पदाधिकारी, पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते.

गव्याला त्रास देऊ नका…

वन्य प्राणी मानवी वस्तीत का येतात, याचा विचार करायला हवा. नागरिक वन्य प्राण्यांच्या मागे धावत असल्याने हे प्राणी बिथरतात आणि त्यातून अप्रिय घटना घडतात. यासाठी माणसांनी जंगली प्राण्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कोल्हापुरात गवा आल्यानंतर नागरिकांनी ज्या पद्धतीने त्याला जेरीस आणले ते पाहता अशा गोष्टी थांबवणे आवश्यक आहे, असे मत स्वप्निल पवार यांनी व्यक्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news