सिडनी : निसर्गाची सर्वात गुंतागुंतीची आणि थक्क करणारी रचना म्हणजे मानवी मेंदू. मानव स्वतःच या मेंदूच्या कार्यपद्धतीने आश्चर्यचकीत होत असतो व याबाबत नवे नवे प्रयोग सातत्याने केले जात असतात. आता शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत ब्रेन सेल्स अर्थात मेंदूच्या पेशी तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे हा मेंदू व्हिडीओ गेमही खेळू शकतो. एवढंच नाही, तर हा 'मिनी ब्रेन' बाहेरचं वातावरण समजून घेतो आणि त्याला चांगला प्रतिसाद देतो, असा दावा केला जात आहे. ऑस्ट्रेलियातल्या कॉर्टिकल लॅबने हा मेंदू तयार केला आहे. डॉ. ब्रेट कॅगन यांनी 'न्यूरॉन जर्नल'मध्ये या मेंदूविषयी एक लेख लिहिला आहे.
डॉ. कॅगन यांनी दिलेल्या माहितीनुसार, यहा मेंदू प्रयोगशाळेतल्या एका डिशमध्ये तयार केला गेला आहे. हा मेंदू बाह्य स्रोतांकडून माहिती गोळा करायला शिकला आहे. तसेच तो 'रिअल टाईम'मध्ये उत्तर देण्यासदेखील सक्षम आहे. येत्या काही दिवसांत या मेंदूला इतरही अनेक मोठी कामं देऊन त्याची चाचणी केली जाणार आहे, असे डॉ. ब्रेट कॅगन यांनी सांगितले. मायक्रोसेफलीचा अभ्यास करण्यासाठी 2013 मध्ये 'मिनी ब्रेन' पहिल्यांदा तयार करण्यात आला होता. हा एक आनुवंशिक विकार आहे. या विकारात मेंदू खूप लहान असतो आणि तेव्हापासूनच मेंदूच्या विकासाबाबत संशोधनासाठी त्याचा वापर केला जातो; पण पहिल्यांदाच हा मेंदू बाहेरच्या वातावरणात आणला गेला आणि त्याला एक व्हिडीओ गेम खेळायला दिला गेला.
हा मेंदू उंदराच्या भ्रूणाच्या 8,00,000 पेशींपासून तयार करण्यात आला आहे. पाँग हा 1970च्या दशकातला लोकप्रिय व्हिडीओ गेम या मेंदूला खेळण्यासाठी देण्यात आला होता. हा मिनी ब्रेन इलेक्ट्रोडच्या माध्यमातून व्हिडीओ गेमशी जोडला गेला. यावरून चेंडू कोणत्या बाजूने होता आणि पॅडपासून किती दूर होता हे कळतं. यादरम्यान पेशींनी स्वतःची विद्युत क्रिया निर्माण केली. खेळ चालू असताना पेशींनी कमी ऊर्जा खर्च केल्याचे दिसून आले. अल्झायमरसारख्या गंभीर न्यूरोडीजनरेटिव्ह आजारांवरच्या उपचारांची चाचणी घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, अशी आशा डॉ. ब्रेट कॅगन यांनी व्यक्त केली आहे.