कराड; पुढारी वृत्तसेवा : पृथ्वीराज चव्हाण यांनी 'ईडी'च्या चौकशा शेवटपर्यंत जात नाही असे विधान कराडमध्ये केले. सरकार पडणार आहे, असे सांगणे विरोधी पक्षाचे कामच आहे. महाराष्ट्रात ईडीच्या एवढ्या चौकशा सुरू आहेत; मात्र त्या शेवटपर्यंत जात नाहीत. त्यात काय तडजोड होते की काय माहीत नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कराड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अॅड. उदयसिंह पाटील, मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, केंद्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. त्यातून सावरण्यासाठी मोदी सरकारने सरकारी कंपन्या, बँका, इमारती, मालमत्ता विकून सरकार चालवायचे काम सुरू केले आहे. सामान्य माणसांवर इंधन दरवाढीचा बोजा टाकल्याने सामान्य माणूस कोलमडला आहे.
मोदी जात नाहीत, तोपर्यंत अर्थव्यवस्था सुधारणार नाही. भारत 85 टक्के कच्चे तेल आयात करतो. पंतप्रधान मनमोहन सिंग असताना त्यावर कर लावला नव्हता. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले तरी इंधनाचे दर वाढले नव्हते. मात्र मोदी सरकार तोटा कमी करण्यासाठी लोकांवर कर लावत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांच्या भेटीबाबत बोलताना आ. चव्हाण म्हणाले, काही दिवसापुर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही माजी संरक्षण मंत्री म्हणून शरद पवार यांना भेटीसाठी बोलवले होते. आता मोदींनी त्यांना बोलवले आहे. विरोधी पक्षांना विश्वासात घेण्याचा मोदींचा प्रयत्न असावा. मात्र भेटीत काय झाले याची माहिती नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कार्यकर्त्यांना बळकटी देण्यासाठी ताकद वाढवा असे सांगत आहेत. मात्र त्याचा राज्य सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षे चालेल. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आहे. त्याची प्रक्रीया येत्या काही दिवसात पुर्ण होईल.
यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये महा जंबो कोवीड सेंटर 15 ऑगस्टपासून सुरु होत आहे. कितीही मोठी लाट आली तरी आरोग्य यंत्रणा कोलमडून पडणार नाही. उंडाळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पुन्हा नव्याने सुरु होणार असून सव्वासहा कोटींची निवादा निघाली आहे.
एक कोटींचा निधी ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधा सुधारण्याकरता दिला आहे. मलकापूर नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी दोन कोटींचा निधी मंजुर झाला आहे. ग्रामीण विकासाच्या 25 बाय 15 योजनेतून नव्याने तीन कोटी रुपये मंजुर झाले आहेत, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.
कराडात काँग्रेसची सायकल रॅली
कराड: पुढारी वृत्तसेवा
पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीसह महागाईविरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी शनिवारी दुपारी कराड शहरात सायकल रॅली काढण्यात आली. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील या रॅलीवेळी स्वाक्षरी मोहिमेचाही प्रारंभ करण्यात आला.
कराड दक्षिण काँग्रेस कमिटीकडून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधील कोल्हापूर नाका येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीस सुरुवात केली. ही रॅली पुढे येऊन दत्त चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुढे जाऊन भेदा चौक मार्गे शहरातील पोपटभाई शहा पेट्रोल पंपावर समारोप करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
या रॅलीमध्ये जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड शहर अध्यक्ष राजेंद्र माने, उपाध्यक्ष भास्कर देवकर, नगरसेवक इंद्रजीत गुजर, ज़िल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, माजी नगरसेवक अशोकराव पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.