पुतीन यांच्या विरोधकावर तयार केलेल्या डॉक्युमेंटरीला ऑस्कर
लॉसएंजिल्स; वृत्तसंस्था : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे विरोधक अॅलेक्सी नेव्हलनी यांच्यावर तयार करण्यात आलेल्या डॉक्युमेंटरीला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार घेण्यासाठी डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शक डॅनिअल रोहर आणि नेव्हलनी यांची पत्नी युलिया पोहोचल्या. यावेळी मंचावर युलिया खूपच भावुक झाल्या. त्या म्हणाल्या, माझे पती तुरुंंगात आहेत. त्यांनी केवळ सत्य आणि लोकशाही वाचवण्याचे काम केले आहे.
आमचा देश कधी स्वतंत्र होईल, त्या दिवसाची मी वाट पाहत आहे. दरम्यान, अमेरिकन कंपनी सीएनन आणि एचबीओने डॉक्युमेंटरी तयार केली होती. यामध्ये सायबेरियामध्ये नेव्हलनी यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला आणि त्यांना अटक करण्यापर्यंतच्या सर्व घटनाक्रमांचा समावेश आहे. तसेच रशियात लोकशाही आणणे आणि पुतीन यांच्या विरोधातील संघर्षात झालेल्या त्रासाचे चित्रीकरण डॉक्युमेंटरीमध्ये करण्यात आले आहे. नेव्हलनी 700 दिवसांपासून जेलमध्ये बंद आहेत.