पुणे-सोलापूर महामार्गावर ‘द बर्निंग ट्रक’चा थरार

पुणे-सोलापूर महामार्गावर ‘द बर्निंग ट्रक’चा थरार
Published on
Updated on

टेंभुर्णी ; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर महामार्गावर भल्या पहाटे फटाक्यांची वाहतूक करणारा मालट्रक पेटल्याने 'द बर्निंग ट्रक' चा थरार पाहावयास मिळाला. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आकुंभे (ता. माढा) गावच्या शिवारात ही दुर्घटना घडली. यामध्ये मोठ्या प्रमाणात स्फोट होऊन मालट्रकसह लाखो रुपयांच्या फटाक्यांचे नुकसान झाले. यादरम्यान पाऊस सुरू होता व वीज पडल्याने दुर्घटना घडली की अन्य कारण हे स्पष्ट झाले नाही. अद्याप याबाबत फिर्याद देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.

आग लागल्याचे समजताच चालकाने ट्रक बाजूला घेऊन उभा केला. तसेच मालट्रकमध्ये फटाके (शोभेची दारू) असल्याने सतत फटाक्यांचे मोठे स्फोट होत असल्याने कोणालाही जवळ जाता येत नव्हते. मोठ्या आवाजाने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते.

याबाबत माहिती अशी की, एक ट्रक फटाके घेऊन पुण्याहून सोलापूरकडे निघाला होता. टेंभुर्णीपासून जवळच आकुंभे शिवारात हा ट्रक पहाटे साडेतीनच्या सुमारास पोहोचला होता. या दरम्यान पाऊस व वीजेचा कडकडाटही सुरू होता. अचानक ट्रकमधील फटाक्यांनी पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रक रस्त्याकडेला थांबवून तेथून काही अंतरावर पळ काढला.

अचानक ट्रकमधील फटाक्यांनी पेट घेऊन मोठा स्फोट झाला. हे लक्षात येताच गावकरी व पोलिस घटनास्थळी धावले. अपघात पथकाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अभिमान गुटाळ, चालक पो. कॉ. क्षीरसागर, महामार्ग पथकाचे उपनिरीक्षक मल्लिकार्जुन सोनार, हवालदार हाके, नवले, गणेश शिंदे, सिद्धेश्वर कोडलिंगे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. पण तोवर मालट्रक संपूर्ण आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

ही आग लागल्यावर महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस कर्मचारी व टेंभुर्णी पोलिसांनी वाहतूक सुरळीत करीत दुसर्‍या सर्व्हिस मार्गावरून वळविली. आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब ही कुठेही उपलब्ध झाला नाही.

पोलिसांनी वरवडे टोल प्लाझा येथील पाण्याच्या टँकर मागवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. ही आग विझविण्यासाठी महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले. या मालट्रक कोठून आला व तो कोठे निघाला होता हे अद्याप समजू शकले नाही. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या मालट्रकवर वीज कोसळली असल्याचे बोलले जात असून खरे कारण समोर आले नाही. या घटनेचा अधिक तपास एएसआय अभिमान गुटाळ हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news