वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा : कुरवली (ता. इंदापूर) येथील शेतकरी कुटुंबातील अवधूत सतीश पांढरे या युवकाची भारतीय नौदलामध्ये (नेव्ही) सब लेफ्टनंट अधिकारीपदी निवड झाली आहे. दोन दिवसांमध्ये अवधूत मुंबई नौदलामध्ये रुजू होऊन सब लेफ्टनंट पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे.
अवधूत याचे वडील सतीश पांढरे शेतकरी आहेत व आई बायडाबाई पांढरे गृहिणी आहेत. अवधूत यांनी प्राथमिक शिक्षण कुरवली गावातील जिल्हा परिषदेच्या चव्हाणवस्तीवरील प्राथमिक शाळेमध्ये घेतले. इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये झाल्यानंतर पुण्यातील एनडीएच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. सन 2021 मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी (एनडीए) मधील 140 व्या तुकडीत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर केरळमधील भारतीय नौसेना अकादमीच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली.
केरळ येथील कन्नूरमधील भारतीय नौसेना अकादमीच्या (आयएनए) च्या 102 व्या तुकडीमध्ये एक वर्षाचे प्रशिक्षण नुकतेच 28 मे 2022 रोजी पूर्ण केले आहे. आता त्यांची नौदलातील सब लेफ्टनंट अधिकारीपदी निवड झाली असून येत्या दोन दिवसांत मुंबई नौदलात ते सब लेफ्टनंट पदावर रुजू होणार आहेत.