‘पुढारी’तर्फे उद्यापासून कोल्हापुरात ‘एज्यु दिशा 2022’

‘पुढारी’तर्फे उद्यापासून कोल्हापुरात ‘एज्यु दिशा 2022’

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : तुमचा कल कुठे आहे? तुम्हाला रस कशात आहे? तुमच्या क्षमता कुठल्या क्षेत्राला पूरक आहेत? हे सगळे करिअरशी, रोजगाराशी निगडित प्रश्न आहेत. करिअरविषयक सर्वच प्रश्नांची उत्तरे एकाच छताखाली मिळावीत यासाठी दै. 'पुढारी'ने एक अत्यंत उपयुक्त ठरेल असे 'एज्यु दिशा 2022 कोल्हापूर' हे शैक्षणिक प्रदर्शन व ज्ञानसत्र 28 ते 30 मेदरम्यान कोल्हापुरात आयोजित केले आहे.

शिक्षण आणि करिअरदरम्यान एक सशक्त दुवा ठरेल, अशा या उपक्रमाचे उद्घाटन गृह राज्यमंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. 28 मे) सकाळी साडेदहा वाजता होईल. सतेज पाटील यांच्या उद्घाटनपर मार्गदर्शनानंतर लगेच सेमिनारला सुरुवात होईल. कोल्हापूर शहरात राजारामपुरीतील ताराराणी विद्यापीठाच्या व्ही. टी. पाटील मेमोरियल हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल.

शनिवारचे पहिले सत्र

शनिवारी, दि. 28 मे रोजी पहिल्या सत्राला संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाने प्रारंभ होईल. दुपारी 12 ते 1 दरम्यान संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांचे 'उच्च शिक्षणाचे महत्त्व, आव्हाने व संधी' या विषयावर व्याख्यान होईल. नंतर तीन तासांच्या अवकाशाअंती 4 ते 5 या वेळेत 'फॉरेन्सिक अकाऊंटमधील जागतिक करिअरच्या संधी' या अत्यंत नावीन्यपूर्ण आणि रोजगारविषयक खात्री देणार्‍या विषयावर 'रिक्स प्रो मॅनेजमेंट'च्या संचालिका डॉ. अपूर्वा जोशी मार्गदर्शन करतील. 'हॉटेल मॅनेजमेंट' हे जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी नोकरीची हमखास शाश्वती देणारे विद्याक्षेत्र आहे. त्या विषयावर सायंकाळी 5 ते 6 दरम्यान पुण्यातील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठांतर्गत हॉटेल मॅनेजमेंट विद्याशाखेचे तज्ज्ञ शेफ इबेन मॅथीव्ह यांचे व्याख्यान होणार आहे.

रविवारचे दुसरे सत्र

रविवारी, दि. 29 मे रोजी सकाळी 11 ते 12 दरम्यान पुणे येथील न्यूफ्लिक्स टॅलेंट सॉल्युशनचे डॉ. भूषण केळकर (आयबीएम मास्टर इन्व्हेन्टॉर) हे 'आपले करिअर कसे घडवावे?' या कळीच्या मुद्द्याला हात घालतील. त्यांचे व्याख्यान अर्थातच द़ृष्टिकोन, वर्तन, संघभावना आदी विषयांचा अचूक वेध घेणारे आहे. नंतर लगेचच 12 ते 1 दरम्यान पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजचे गणेश लोहार 'कौशल्यावर आधारित करिअरच्या संधी' या विषयावर मार्गदर्शन करतील. याच सत्रात दुपारी 4 ते 5 लातूर येथील प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी क्लासेस या प्रसिद्ध शैक्षणिक प्रतिष्ठानचे प्रा. एम. के. कुरणे (एम.टेक्) हे 'फिजिक्स नीट' परीक्षेबाबत मार्गदर्शन करतील. लगेचच सायंकाळी 5 ते 6 दरम्यान 'नीट'ची तयारी कशी करावी, त्याबद्दल आयआयबी पीसीबी क्लासेस या लातुरातील दुसर्‍या एका प्रसिद्ध शैक्षणिक प्रतिष्ठानचे चिराग सिन्हा विद्यार्थ्यांचे उद्बोधन करणार आहेत.

सोमवारचे अंतिम सत्र

सोमवारी, दि. 30 मे रोजी सकाळी 11 ते 12 दरम्यान 'परदेशी शिक्षण' या विषयातील ज्येष्ठ तज्ज्ञ प्रा. जयंत पाटील हे कोणत्या देशात कोणकोणत्या शिक्षणाच्या संधी आहेत, याबद्दल तपशीलवार माहिती देणार आहेत. परदेशात शिक्षणाच्या अनुषंगाने रोजगाराच्या कुठे आणि कशा प्रकारच्या संधी आहेत, याबाबतही ते मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 12 वाजता केआयटी कॉलेजचे डॉ. अक्षय थोरवत, प्रा. सई ठाकूर या तज्ज्ञ द्वयींचे 'जैवतंत्रज्ञान व पर्यावरण अभियांत्रिकी' या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान होईल. दुपारी 1 वाजता 'नॅनो

टेक्नॉलॉजी :  संशोधनाची नवीन कवाडे उघडणारे शास्त्र' या अलीकडच्या काळातील दिवसेंदिवस अधिकाधिक अद्ययावत होत चाललेल्या तंत्रज्ञान शाखेबद्दल शिवाजी विद्यापीठातील 'स्कूल ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी'चे प्रा. डॉ. सुशीलकुमार जाधव मार्गदर्शन करतील. नंतर दुपारी 4 वाजता 'स्पर्धा परीक्षेचे विश्वच वेगळे' या विषयावर नाशिक येथील स्पेक्ट्रम अ‍ॅकॅडमीचे प्रा. सुनील पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.

सायंकाळी 5 वाजता 'व्हीएफएक्स' आणि 'अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील शिक्षण व रोजगाराच्या संधी' या विषयावर अद्ययावत माहितीसह मधुर चांदणे, प्रमोद जाधव ही तज्ज्ञ द्वयी मार्गदर्शन करतील. अ‍ॅनिमेशनबद्दल सर्वांना माहिती आहे. 'व्हीएफएक्स' हा विषय म्हणजे 'कॉम्प्युटर प्रोग्रामिंग'च्या मदतीने 'सिनेमॅटोग्राफी'ला भव्यदिव्य करून सोडणारे असे हे तंत्र आहे. अलीकडे यातील 'एक्स्पर्टस्'ना मागणी आहे.

आजच्या विद्यार्थ्यांना उद्याचे यशस्वी नागरिक होण्यात दै. 'पुढारी' आयोजित तीन दिवसांचे 'एज्यु दिशा 2022 कोल्हापूर' हे रोजगाराधिष्ठित ज्ञानसत्र नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. तिन्ही दिवस पूर्णवेळ उपस्थित राहावे, कुठली गुरुकिल्ली तुमच्या करिअरचे कुलूप उघडेल, हे ठरवायला तुम्हाला नक्कीच या उपक्रमाचा फायदा होईल. तेव्हा जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या ज्ञानसत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

तीन दिवस विविध विषयांच्या तज्ज्ञांची व्याख्याने; 'नीट'पासून ते सर्वप्रकारच्या स्पर्धा परीक्षांबाबत सखोल माहिती
फॉरेन्सिक अकाऊंट, हॉटेल मॅनेजमेंट, व्हीएफएक्स/अ‍ॅनिमेशन, नॅनो टेक्नॉलॉजीपासून ते परदेशातील शिक्षण व रोजगाराच्या संधींपर्यंत मार्गदर्शन

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news