पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये दोन व्यक्ती दरम्यान झालेले संभाषण व्हायरल झाले होते. बंजारा व इतर बोली भाषेत हे संभाषण होते. त्यावरून विविध प्रकारचे तर्क वितर्क लढविले जात असतानाच या संभाषणातील एक आवाज माजी मंत्री संजय राठोड यांचा असल्याचे न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेच्या (फॉरेन्सिक लॅब) अहवालातून समोर आले आहे.
याला पुणे पोलिसांनी अधिकृत दुजोरा देत दोन महिन्यापूर्वीच हा अहवाल आम्हाला प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. ७ फेब्रुवारी २०२१ ला पूजा चव्हाणने पुण्यात राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती.
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा संदर्भ थेट विद्यमान सरकारमधील तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जोडण्यात आल्यामुळे, राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे शेवटी राठोड यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यातच आता पुन्हा राठोड यांना मंत्रीपद मिळण्याच्या चर्चांना उधान आले आहे.
दरम्यान आत्महत्येआधी पूजा आणि राठोड यांच्यात 90 मिनिटे फोनवर बोलणे झाल्याचं समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांना फॉरेन्सिक रिपोर्ट देण्यात आला आहे. पुजाच्या आत्महत्येपूर्वी सुमारे ९० मिनिट पूजा हीच संजय राठोड यांच्याशी फोनवर बोलणं झालं असल्याची माहितीसमोर आली आहे.
व्हिसेरा रिपोर्टमध्ये पूजा चव्हाण हिने आत्महत्येपूर्वी दारू पिल्याचं ही निष्पन्न झाले आहे. दारूच्या नशेत तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, असे असले तरी पूजाच्या आई वडिलांनी दिलेल्या जबाबात कुठलीही तक्रार नसल्याचे यापूर्वीच लिहून लिहून दिले आहे.
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केल्याची मध्यंतरी अफवा उठली होती. याला पुणे पोलिसांनी कोणताही क्लोजररिपोर्ट सादर केला नसल्याचे म्हणताना पूर्ण विराम दिला होता.
याप्रकरणी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची तांत्रिकदृष्या तपासणी पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती शहर पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिका-याने दिली होती. सुरूवातीला १२ ऑडिओक्लिप व्हायरल झाल्या होत्या.
त्यामध्ये दोन व्यक्ती बोलताना पुजा चव्हाण, व ती आत्महत्या करणार असल्याचे संभाषण आहे. त्यामुळे पोलिस खरच त्यामधील आवाज आरोप झालेल्या मंत्र्याचा आहे की अन्य कोणाचा याबाबत तपास करीत होती. त्या ऑडीओ
क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच असल्याचा वृत्ताला आता फॉरेन्सिक अहवालामुळे दुजोरा मिळाला आहे.
पुचा चव्हाण प्रकरणात 'गबरू' नावाच्या पात्राने प्रवेश केला होता. गबरू आणि पुजाच्या नावाने ऑडीओ रेकॉर्डींगही व्हायरल झाले होते. त्यामुळे पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे गुढ वाढतच चालले होते.
पहिली व्यक्ती : मी अरुण बोलतोय.
दुसरी व्यक्ती : हा, अरुण बोल.
पहिली व्यक्ती : ते तिच्या डोक्यातून सुसाईडचं भूत काढा जरा.
दुसरी व्यक्ती : हम्म… काय करावा आता.
पहिली व्यक्ती : सुसाईड हा पर्याय नाही ना.. काढा तिच्या डोक्यातून..
पुढे किती तरी आयुष्य आहे ना, ती आयडियल आहे. तिच्यासारखं जगायला बघत्यात मुली. आता तीच आत्महत्या करते म्हटल्यावर अवघड आहे. असं थोडंच असतंय..
दुसरी व्यक्ती : तू कुठंय.. बाहेर आहे का…?
पहिली व्यक्ती : तुम्ही बोला, मी सांगतो तुम्हाला..
दुसरी व्यक्ती : आता एवढं क्लिअर बोलूनही एकाच मुद्द्यावर अडत असेल तर काय करायचं?
पहिली व्यक्ती : त्या दिवसापासून मी तिला सांगतोय.. ट्रिटमेंट करू, आता ठिकय म्हणली. तू सांगतो तर मी ट्रिटमेंट करायला तयार आहे म्हणली. पण ट्रिटमेंट झाल्यानंतर मी सुसाईड करणार म्हणली. असं थोडंच असतंय.
दुसरी व्यक्ती : हम्म…
पहिली व्यक्ती : आता तिच्या डोक्यातून काढा ते..
दुसरी व्यक्ती : तुला काय म्हणत होती ती.. कोणाला आण म्हणत होती.. काही तरी म्हणली ना ती तुला आणून दे म्हणून…
पहिली व्यक्ती : काही नाही. आता तिचा फोन आला होता. कशाला सांगितले म्हणून. मी म्हणालो आवश्यक आहे ना ते सांगणं. असं थोडंच असतंय.. सुसाईड म्हणजे काय…
दुसरी व्यक्ती : हम्म… तू कुठाय? इथंच आहे ना?
पहिली व्यक्ती : हा इथंच आहे.. बाहेर आहे मी..
दुसरी व्यक्ती : बोलतो तिला….
पहिली व्यक्ती : हां, तिच्या डोक्यातून तेवढं सुसाईडचं काढा.
दुसरी व्यक्ती : हं…
पहिली व्यक्ती : फोन ठेवू?
दुसरी व्यक्ती : हां..ठीक आहे.