मासिक पाळीच्या अगोदर शारीरिक, मानसिक त्रास, ‘या’ समस्येसाठी ही आहेत होमिओपॅथिक औषधे

मासिक पाळीच्या अगोदर शारीरिक, मानसिक त्रास, ‘या’ समस्येसाठी ही आहेत होमिओपॅथिक औषधे
Published on
Updated on

पीएमएस म्हणजे नेमकं काय? पीएमएस म्हणजे Pre Menstrual Syndrome. थोडक्यात, मासिक पाळीच्या 7 ते 10 दिवस अगोदर होणार्‍या शारीरिक व मानसिक त्रासाला पीएमएस म्हणतात. मासिक पाळी खरंतर स्त्रियांच्या आयुष्यातली अतिशय महत्त्वपूर्ण बाब असते; पण पाळीच्या अगोदर किंवा पाळीतल्या त्रासामुळे स्त्रीला मासिक पाळी हे मिळालेले वरदान न वाटता एक शाप वाटत राहते. ज्या स्त्रियांना त्रास सोसवेल तेवढा त्या सोसत राहतात व ज्यांना त्रास सहनशक्तीच्या पलीकडे होतो, तेव्हा त्या उपचारांचा शोध घेतात.

या त्रासाला महिलांचा मोठा वयोगट सामोरे जातो. कारण, पीएमएस हे महिलांच्या पुनरुत्पादक वयोगटांमध्ये कधीही येऊ शकतात. भारतात झालेल्या सर्व्हेवरून असे आढळून आले आहे की, 72 टक्के महिलांना सौम्य ते मध्यम स्वरूपाचा त्रास होतो व 3 टक्के महिलांना अतिशय तीव्र स्वरूपाचा त्रास होतो, याला पीएमडीडी म्हणजेच premenstrual dysphoric disorder असे म्हणतात.

'पीएमएस'च्या तक्रारी

यात पोट फुगणे, छातीत जळजळ होणे, बद्धकोष्ठता, डोकेदुखी, स्तनांचे दुखणे व जड येणे, पाय ओढणे, पोटर्‍या दुखणे, कंबर दुखणे, अशक्त वाटणे, स्थूलपणा वाटणे, शरीरावर सूज येणे, चेहर्‍यावर फोडी येणे, अस्वस्थता, क्षुल्लक कारणाने होणारी चिडचिड, गोंधळ, लक्ष केंद्रित न होणे, चिंता, नैराश्य, मूडमध्ये बदल, झोप न लागणे, एकटेच विचार करत बसणे इत्यादी लक्षणे आढळतात. ही लक्षणे सर्व स्त्रियांमध्ये असतात असे नाही; पण दोन किंवा अधिक लक्षणे दिसू शकतात. काही जणींना उत्तेजक पेय घ्यावेसे वाटते, गोड पदार्थ खावेसे वाटतात. जे घेतल्याने थोडावेळ बरे वाटते; पण नंतर त्याचे दुष्परिणामही दिसतात.

या सगळ्या लक्षणांना आपण पीएमएस तेव्हाच म्हणू शकतो; जेव्हा हे नियमितपणे मासिक पाळीच्या सात ते दहा दिवस अगोदर दिसत असतील व पाळी आल्यावर नाहीसे होत असतील. त्यासाठी या तक्रारी कधी उद्भवतात याची व मासिक पाळीच्या तारखेची जाणीवपूर्वक कॅलेंडरवर नोंद ठेवावी. जर या लक्षणांचा व मासिक पाळीचा काही संबंध नसेल तर दुसरी कुठली व्याधी तर नाही ना, हे तपासून घ्यावे लागते.

पीएमएस हा काही रोग नाही. हे फक्त स्त्रियांमध्ये मासिक पाळीसाठी होणार्‍या हरमोनल इम्बॅलेन्समुळे उद्भवणार्‍या तक्रारी आहेत. बर्‍याचदा असे आढळून आले आहे की, या तक्रारी लठ्ठ महिलांमध्ये, शारीरिक व्यायामाचा अभाव असलेल्या महिलांमध्ये, पौष्टिक आहाराचा अभाव असलेल्या महिलांमध्ये, सतत मानसिक ताणामध्ये वावरणार्‍या महिलांमध्ये किंवा आनुवंशिकतेमुळे दिसू शकतात. म्हणून पीएमएसवर मात करण्यासाठी औषधोपचारासोबत शारीरिक व्यायाम, पौष्टिक आहाराचे सेवन व मानसिक ताणमुक्त जीवन जगण्याचे तंत्र; जसे योगा, प्राणायाम, ध्यानधारणा इत्यादी आत्मसात करण्याची गरज आहे.

या पीएमएसच्या त्रासामुळे महिलांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक पातळीवर खूप प्रभाव पडतो. या त्रासामुळे बर्‍याचदा महिला कामावर जाऊ शकत नाहीत, मुली शाळा-कॉलेजला जात नाहीत, स्वतःला समाजापासून अलिप्त ठेवतात, यामुळे पुन्हा मानसिक त्रास उद्भवतो.

या समस्येसाठी होमिओपॅथिक औषधे :

बोविस्टा, कॅल्केरिया करबोनिकम, कॅल्केरिया फॉस्फोरिकम, कोनायम, मेलिलोटस, सेपिया, इग्निशिया, पलसाटीला, लँकँसीस इत्यादी.
होमिओपॅथिक औषधांची थोडक्यात माहिती :

1. सेपिया : ज्या स्त्रियांमध्ये चिडचिडेपणा दिसतो. मासिक पाळीच्या काही दिवस आधी चिडचिडेपणामध्ये त्यांना कोणतेही शारीरिक व मानसिक काम करण्याची इच्छा राहत नाही. ओटीपोट खाली खेचण्याची जाणीव होते व अनियमित मासिक पाळी आढळते. अशा स्त्रियांना सेपिया उपयुक्त ठरू शकते.

2. इग्निशिया : पाळीच्या काही दिवस अगोदर इतके नैराश्य येते की, त्यांना एकटे राहायला आवडते. एकटेच तासन्तास रडत बसतात, मूडमध्ये अचानक बदल होतो. आता हसतमुख, तर दुसर्‍या क्षणी दु:खी. अशा तक्रारींसाठी हे औषध उपयुक्त ठरते.

3. पल्सेटिला : ज्या स्त्रिया अतिशय संवेदनशील असतात, छोट्यातल्या छोट्या गोष्टींमुळे लगेच रडू लागतात, त्यांना सहानुभूती मिळाल्यावर बरे वाटते, मोकळ्या हवेत बरे वाटते, अशा महिलांसाठी पल्सेटिला खूप उपयुक्त ठरते.

4. लँकँसीस : तीव्र डोकेदुखी, पोट दुखी, कंबरदुखी, जी मासिक पाळी चालू होताच नाहीशी होते. या स्त्रिया तंग कपडे अजिबात सहन करू शकत नाहीत. ज्या स्त्रियांची मानसिक स्थिती अशी असते की, बडबड करत सुटतात. ज्या या मुद्द्यावरून दुसर्‍या मुद्द्याकडे लगेच बदलतात अशा स्त्रियांना उपयुक्त ठरते.

डॉ. प्रिया पाटील

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news