पिवळ्या वाघिणींच्या पाठवणीचा मुहूर्त ठरला; जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाणार गुजरातला

पिवळ्या वाघिणींच्या पाठवणीचा मुहूर्त ठरला; जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाणार गुजरातला

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील दोन वाघिणी गुजरात राज्यातील अहमदाबादच्या कमला नेहरू प्राणिसंग्रहालयात पाठविल्या जाणार आहेत. त्यांच्या पाठवणीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. या वाघिणी घेऊन जाण्यासाठी गुजरातचे पथक नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ३ किंवा ४ जानेवारी रोजी औरंगाबादेत येणार आहे. वाघिणींच्या बदल्यात इथे देण्यासाठी हे पथक येताना कोल्हा, इमू, सायाळ आणि स्पून बिल हे प्राणी सोबत आणणार आहे.

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात तीनशेहून अधिक प्राणी आहेत. यात सर्वाधिक १४ वाघ आहेत. बहुतेक प्राण्यांच्या जोड्या आहेत, परंतु सायाळ, स्पून बिल पक्षी, इमू आणि कोल्हा हे प्राणी मात्र एकेकच आहेत. त्यांना जोडीदार नाहीत. त्यामुळे त्यांना जोडीदार मिळविण्यासाठी महापालिकेचे प्रशासन प्रयत्नशील होते. त्या अनुषंगाने देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. गुजरातमधील अहमदाबाद येथील प्राणिसंग्रहालयाने हे प्राणी देण्याची तयारी दर्शविली होती. त्याबदल्यात त्यांनी दोन पिवळे मादी वाघ देण्याची अट टाकली होती. दोन्ही प्राणिसंग्रहालयांच्या पत्रव्यवहारानंतर सेंट्रल झू ऑथॉरिटी ऑफ इंडियाने त्याला ७ जुलै ऑक्टोबर २०२२ रोजी मान्यता दिली. त्यानुसार आता औरंगाबादेतून दोन वाघिणी घेऊन जाण्यासाठी अहमदाबादच्या प्राणिसंग्रहालयाचे पथक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ३ किंवा ४ जानेवारी रोजी औरंगाबादेत येत आहे. वाघिणींच्या बदल्यात औरंगाबादला देण्यासाठी हे पथक तेथून तीन कोल्हे, दहा सायाळ, २ इमू आणि ६ स्पून बिल पक्षी आणणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

देशभरात पाठविले २६ वाघ

गेल्या काही वर्षांत औरंगाबाद हे वाघ पुरवठादार शहर बनले आहे. औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयात सध्या १४ वाघ आहेत, तर आतापर्यंत येथून देशभरातील विविध संग्रहालयांना सुमारे २६ वाघ देण्यात आले आहेत. वाघांच्या जन्मदरासाठी औरंगाबाद प्राणिसंग्रहालय चांगले ठिकाण ठरत आहे. मागील काही वर्षांत सुमारे पस्तीसहून अधिक वाघ जन्मले आहेत. त्यामुळेच देशभरातील प्राणिसंग्रहालयांकडून अधूनमधून औरंगाबादकडे वाघांची मागणी होत असते.

वाघाच्या बदल्यात कोल्हा, सायाळ

अहमदाबाद आणि औरंगाबाद येथील प्राणीसंग्रहालयांमध्ये प्राण्यांच्या आपसातील देवाण घेवाणीस केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) आधीच मान्यता आहे. त्यानुसार आपल्याकडील दोन पिवळ्या वाघीणी अहमदाबादच्या प्राणीसंग्रहालयात दिल्या जाणार आहेत. तर त्यांच्याकडून आपल्याला कोल्हा, सायाळ, स्पून बील आणि इमू हे प्राणी मिळणार आहेत. त्यासाठी अहमदाबादचे पथक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे.
– राहुल सूर्यवंशी, उपायुक्त

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news