पार्कर सोलर प्रोब : सूर्याला स्पर्श

पार्कर सोलर प्रोब : सूर्याला स्पर्श
Published on
Updated on

नासाच्या पार्कर सोलर प्रोब यानाने सूर्याच्या वातावरणात प्रवेश केला आहे. मानवी इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या अंतराळ यानाने सूर्याच्या वातावरणाला स्पर्श केला असून, हा एक चमत्कारच ठरला आहे. या उत्तुंग यशामुळे सूर्याबद्दलच्या अनेक दंतकथा लवकरच निकालात निघतील.

मानवी इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या अंतराळ यानाने सूर्याच्या वातावरणाला स्पर्श केला असून, ही बाब चमत्कारापेक्षा वेगळी नाही. 'नासा'च्या 'पार्कर सोलर प्रोब' यानाने सूर्याच्या वातावरणात प्रवेश केला आहे. हे यश आणि त्यासंदर्भातील प्रारंभिक निरीक्षणांची घोषणा 14 डिसेंबर रोजी अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स येथे करण्यात आली. यासंदर्भात अत्यंत वाचनीय असा वृत्तांत अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. 'पार्कर सोलर प्रोब' ही सौरविज्ञान क्षेत्रातील एक हनुमानउडी असून, ती भविष्यात कायम चर्चेत राहील. ज्याप्रमाणे चंद्रावर उतरल्यानंतर शास्त्रज्ञांना चंद्राची निर्मिती कशी झाली, हे समजण्यास मदत झाली, त्याचप्रमाणे सूर्याकडे गेल्याने सूर्याची निर्मिती कशी झाली, याची ठोस माहिती मिळू शकेल. जगभरातील लोकांना सूर्याचा भूगोल, इतिहास आणि त्याच्या संदर्भातील अन्य उपयुक्त आणि विश्वासार्ह माहिती मिळू शकेल. 'नासा'च्या वॉशिंग्टन येथील मुख्यालयातील विज्ञान मोहिमा संचालनालयाचे प्रशासक थॉमस जुर्बुचेन यांचा यासंदर्भातील उत्साह लक्ष वेधून घेणारा आहे. हे यश म्हणजे मैलाचा दगड असल्याचे ते मानतात. सूर्याची उत्क्रांती आणि सूर्यमालेचे प्रभाव जाणून घेण्याच्या दिशेने जग यापुढे वेगाने वाटचाल करणार आहे. सूर्याबाबत माहिती जाणून घेतल्यामुळे ब्रह्मांड आणि त्यातील इतर तेजस्वी तार्‍यांसंबंधी जाणून घेण्याची प्रक्रिया गतिमान होईल.

'नासा'ची ही मोहीम 2018 मध्ये सुरू झाली होती आणि आता तिचे यश समोर येऊ लागले आहे. सौरवादळामध्ये चुंबकीय संरचना कोठे आणि कशा तयार होतात, याचा शोध या मोहिमेच्या माध्यमातून सुरू आहे. पार्कर सोलार हळूहळू सूर्याच्या पृष्ठभागाजवळ आले आहे. या महत्त्वाच्या मोहिमेतील शास्त्रज्ञ नूर रौफी यांच्या म्हणण्यानुसार, सूर्याच्या इतक्या जवळून उड्डाण करताना 'पार्कर सोलर प्रोब' यान कोरोना या सौर वातावरणातील चुंबकीयद़ृष्ट्या प्रबळ थराची स्थिती समजून घेण्यास सक्षम ठरणार आहे. यापूर्वी हे काम आपण कधीही करू शकलेलो नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागाप्रमाणे सूर्याचा पृष्ठभाग टणक नाही. गुरुत्वाकर्षण आणि चुंबकीय शक्तींनी सूर्याला जोडल्या गेलेल्या सौर सामग्रीपासून बनलेले अत्यंत उष्ण वातावरण तेथे आहे. वाढती उष्णता आणि दाबामुळे सौर सामग्री सूर्यापासून दूर विखुरते. आपल्याला आता सौरवादळाच्या बदलत्या परिस्थितीबद्दल अधिक जाणून घेता येणार आहे. किरण किंवा ऊर्जा फक्त सूर्यापासून वेगाने केवळ दूर फेकली जाते की, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ती परतसुद्धा येते, याचा तपशीलवार अभ्यास शास्त्रज्ञ करणार आहेत.

पार्कर सोलर व्हेईकलने पृथ्वीपासून सूर्यापर्यंत असलेले सुमारे 91 टक्केअंतर कापले असावे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. त्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र इतके मजबूत आहे की, तेथील प्रत्येक कणाच्या हालचालींवर या क्षेत्राचे प्रभुत्व आहे, अशा परिसरात अंतरिक्ष यान प्रथमच पोहोचले आहे. जेथून सूर्याचा विशेष प्रभाव सुरू होतो आणि जिथे सूर्याचे थेट नियंत्रण असते, असे हे क्षेत्र आहे. पार्कर सोलर ऑर्बिटर काही तास सूर्याच्या निकटच्या या प्रदेशात होते आणि आता पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी 2022 मध्ये पुन्हा याच प्रदेशात ते असेल. सर्व काही सुरळीत झाल्यास येत्या काही वर्षांत हे वाहन अनेक वेळा सूर्याच्या जवळच्या परिसरातून जाईल. सूर्याचे रहस्य उलगडण्याची 'नासा'ची ही मोहीम म्हणजे शास्त्रज्ञांना मिळालेले मोठे यश आहे. यामुळे जगाचे विज्ञानाकडील आकर्षणही वाढेल. सूर्याबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत. त्यापैकी बहुतांश दंतकथा हळूहळू लयालाही गेल्या आहेत आणि उर्वरित दंतकथा लवकरच निकालात निघतील. आगामी सौर आणि अंतराळ मोहिमांसाठी या मोहिमेची विशेष मदत होईल, हे वेगळे सांगण्याची आवश्यकताच नाही.

– प्रा. विजया पंडित

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news