पाचव्या फुटीने शिवसेनेला जबरदस्त धक्का

शिवसैनिक
शिवसैनिक

राजकीय विश्लेषण : सुरेश पवार 1966 मध्ये बरोबर 56 वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना झाली. 19 जून हा शिवसेनेचा स्थापना दिन. शिवसेनेला 56 वर्षे पूर्ण होत असतानाच शिवसेनेत पाचवी मोठी फूट पडली आहे. आक्रमक धोरण आणि मराठी बाणा हे शिवसेनेचे मूलभूत वैशिष्ट्य. या मूळ पायावर शिवसेनेचा मुंबईसह महाराष्ट्रात विस्तार झाला. 1995 मध्ये मोठा भाऊ म्हणून शिवसेनेसोबत भाजपने युती सरकार स्थापन केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत 2014 मध्ये भाजप मोठा भाऊ होऊन शिवसेनेला 'युती'मध्ये सहभागी व्हावे लागले. 2019 मध्ये शिवसेनेने भाजपबरोबरचे संबंध झुगारून दिले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता मिळवली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारले. हे पद स्वीकारताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द पाळल्याची भावनिक साद त्यांनी घातली.

मुख्यमंत्रिपदाचे शिवधनुष्य त्यांनी हाती घेतले खरे; पण सरकारची निम्मी वाटचाल होत असतानाच शिवसेनेचे एक मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बुलंद बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. तब्बल 35 आमदार घेऊन ते शिवसेनेतून बाहेर पडले आहेत आणि त्यांनी प्रस्ताव दिला, तर सरकार बनवण्याचा आम्ही विचार करू, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या बुलंद बालेकिल्ल्याला या पाचव्या फुटीने जबरदस्त धक्का बसला असून त्याचे दूरगामी परिणामी होतील, अशीच चिन्हे दिसत आहेत.

आतापर्यंत शिवसेनेत चारवेळा फूट पडली आणि बडे नेते बाहेर पडले; पण त्यातून शिवसेना सावरली. पुन्हा उभारी धरून शिवसेनेने सत्तेचा सोपान गाठला. तथापि, यावेळच्या पाचव्या फुटीची घटना ही सर्वाधिक गंभीर स्वरूपाची असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राच्या सर्व विभागातील आमदारांचा या बंडात सहभाग आहे आणि त्यामुळे आगामी मुंबईसह राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर त्याचे थेट परिणाम तर होतीलच, त्याबरोबर शिवसेना संघटनेवर परिणाम होऊन भाजपलाही बळकटी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनाही भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर यांच्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. एकूणच शिवसेनेतील या बंडाचे दूरवर परिणाम होतील, अशीच ही उलथापालथ असल्याचे दिसून येते.

शिवसेनेत आजवर चार मोठ्या फाटाफुटी झाल्या. शिवसेनेच्या स्थापनेनंतर काही वर्षांत बंडू शिंगरे यांनी प्रतिशिवसेना स्थापन केली; पण ती काही टिकली नाही. तिचे नामोनिशाण राहिले नाही; पण 1991 मध्ये छगन भुजबळ यांच्यासह शिवसेनेच्या 18 आमदारांनी बंड केले. या आमदारांनी पक्ष सोडला तेव्हा सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. हे 18 आमदार काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यावेळी छगन भुजबळ यांना आपल्या भागात फिरणे शिवसैनिकांनी मुश्कील केले होते. कालांतराने शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भुजबळ यांनी प्रवेश केला. त्यांना विविध पदे मिळाली. तथापि, त्यांचा अपवाद वगळता फुटिरापैकी कोणाला आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवता आले नाही आणि शिवसेनेवरही या बंडाचा फार परिणाम झाला नाही. नवी मुंबई म्हणजे गणेश नाईक असे समीकरण असलेल्या गणेश नाईक यांनी 1999 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. नंतर भाजपमध्ये डेरेदाखल झाले. त्यांच्या जाण्यानेही शिवसेनेवर फारसा परिणाम झाला नाही.

राणे आणि राज

ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात अंतर आले आणि राणे यांनीही 2 जुलै 2005 रोजी पक्षत्याग केला. ते काँग्रेस पक्षात गेले. मुख्यमंत्रिपद मिळावे, ही त्यांची अपेक्षा होती. ती काही पूर्ण झाली नाही. काँग्रेस नेतृत्वावर टीकास्त्र सोडत त्यांनी अखेर काँग्रेस पक्षाचा त्याग केला. काही काळ वेगळी संघटना स्थापून मग त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रात मंत्रिपद मिळाले; पण शिवसेना सोडल्यानंतर त्यांना दोनदा पराभवाला तोंड द्यावे लागले होते.

त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात राज ठाकरे यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. त्यावेळी शिवसेनेत मोठी फूट पडली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राज यांच्या पक्षाचे 13 आमदार निवडून आले. तथापि, राज यांचा करिष्मा पुढे टिकला नाही. राज यांचा पक्ष टिकून असला, तरी त्यांच्या पक्षत्यागाचा शिवसेनेवर फार मोठा परिणाम झाल्याचे दिसले नाही. आजवरच्या चार मोठ्या बंडाचा फार परिणाम शिवसेनेवर झाला नसला, तरी यावेळी मात्र शिवसेनेच्या बुलंद बुरुजालाच मोठे खिंडार पडले आहे आणि त्याचा परिणाम शिवसेनेच्या संघटनेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी निवडणूक, राजकारण, सत्ताकारण या सार्‍या घडामोडीत या बंडाचे सखोल परिणाम होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. महाराष्ट्राच्या एकूण राजकारणालाच या बंडाने नव्या वळणावर आणून ठेवले आहे.

मध्य प्रदेश पॅटर्न

मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा एक गट बाहेर पडला आणि मध्य प्रदेशात भाजप सरकार सत्तेवर आले. आता त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. फोन बंद ठेवून एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह रातोरात सुरतला दाखल झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी तात्विक मतभेद असल्याचे सांगत त्यांनी आपली दिशा स्पष्टच केली आहे. एक प्रकारे त्यांनी आपले परतीचे मार्ग बंद केले आहेत. महाराष्ट्रातही मध्य प्रदेश पॅटर्नची नांदी होण्याची चिन्हे आहेत.

राज्यसभेवेळीच चाहूल

राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. भाजप उमेदवार विजयी झाला. त्याचवेळी काही तरी शिजत असल्याची चाहूल जाणकारांना लागली होती. विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीत राज्यसभेपेक्षा अधिक मते भाजपच्या पारड्यात पडली तेव्हाच हा संशय बळावला होता. तथापि, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या या हालचाली एवढ्या गोपनीय आणि पडद्याआड होत्या की, त्याची जरासुद्धा कल्पना कोणालाही आली नाही. अडीच वर्षांपूर्वी ऐन पहाटे जसा अकस्मिक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी झाला होता, त्याच इतिहासाची आता यावेळी पुनरावृत्ती झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news