पाकिस्तानला खडे बोल

पाकिस्तानला खडे बोल

दहशतवाद ही कोणा एका देशापुरती समस्या नाही, तर संपूर्ण जगाला त्यापासून धोका असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्षुल्लक राजकीय स्वार्थासाठी अनेक देशांनी दहशतवादाला खतपाणी घातले किंवा दहशतवादाकडे दुर्लक्ष केले. अशी अनेक उदाहरणे देता येऊ शकतील; परंतु दहशतवादाला पाठबळ देणार्‍या याच देशांवर दहशतवादाचा राक्षस उलटला आणि त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागली. अमेरिकेतील ट्विन टॉवरवरील हल्ला हे त्याचे ठळक उदाहरण आहे. दहशतवादाचे भरण पोषण करणारा पाकिस्तानही त्या आगीत होरपळून निघाला आहे. भारताच्या उरावर दहशतवादाने केलेल्या जखमा एवढ्या खोलवर आहेत, की अनेक वर्षांनंतरही त्या भरून निघालेल्या नाहीत किंवा त्यांची वेदना कमी झालेली नाही. संयुक्‍त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या वतीने याच वेदनेचा पुनरुच्चार करताना दहशतवाद पोसणार्‍या पाकिस्तानला खडे बोल सुनावण्यात आले. सीमेपलीकडील दहशतवादाचा भारताला मोठा फटका बसला आहे. 2008 साली मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला असो किंवा 2016 मध्ये पठाणकोटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना अद्याप न्याय मिळाला नसल्याची भूमिका भारताच्या वतीने मांडण्यात आली. संयुक्‍त राष्ट्रांतील भारताचे कायम प्रतिनिधी टी. एस. तिरूमूर्ती यांनी दहशतवादी कृत्यांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका असल्याचे सुरक्षा परिषदेच्या व्यासपीठावरून ठामपणे सांगितले. जगाच्या कुठल्याही एका कानाकोपर्‍यात असलेला दहशतवाद हा तेवढ्या तुकड्यापुरता मर्यादित नसतो, तर त्यापासून संपूर्ण जगाच्या शांतता आणि सुरक्षिततेला धोका असतो, ही भारताची भूमिका संयुक्‍त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पुन्हा एकदा ठामपणे मांडण्यात आली. अशी भूमिका वारंवार मांडण्याची गरज असते आणि ती सतत मांडत राहिले तरच जगातील इतर देशांनाही दहशतवादाविरोधात ठोस भूमिका घेण्यास भाग पाडता येते. तसे केले नाही तर शेजारी देशाकडून कांगावा करून भारताला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जातात. पाकिस्तानचे असे प्रयत्न वर्षानुवर्षे आपण पाहात आलो आहोत. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. जगालाही हे वास्तव माहीत आहे. तरीसुद्धा पाकिस्तानकडून अनेकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला जातो. तेथील नागरिकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची ओरड केली जाते. त्यातून साध्य काहीच होत नसले तरी त्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताला संशयाच्या भोवर्‍यात उभे करता येते. जगातील काही देशांना आपला फौजदारकीचा रुबाब मिरवायचा असल्यामुळे असे देश कधी कधी त्यासंदर्भाने काही प्रतिक्रिया व्यक्‍त करतात, त्या भारताच्या भूमिकेच्या विरोधातही असू शकतात आणि कोणत्याही अर्थाने भारतासंदर्भात नकारात्मक चर्चा होणे योग्य नसते. अशा परिस्थितीमध्ये शेजारी राष्ट्रांनी कांगावा करण्याआधीच आपण आपली भूमिका मांडणे म्हणजे आपली बाजू भक्कम करण्यासारखे असते. त्याअर्थाने संयुक्‍त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताने मांडलेली भूमिका महत्त्वाची ठरते.

चार महिन्यांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये संयुक्‍त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या फर्स्ट सेक्रेटरी स्नेहा दुबे यांनी अशाच पद्धतीने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना रोखठोक उत्तर दिले होते. इम्रान खान यांनी काश्मीरचा विषय उपस्थित केल्यानंतर स्नेहा दुबे यांनी राईट टू रिप्लायचा वापर करून इम्रान खान यांच्या वक्‍तव्याचा समाचार घेताना दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या पाकिस्तानच्या प्रवृत्तीला जगासमोर उघडे केले होते. काश्मीरचा विषय उपस्थित करण्यापूर्वी पाकिस्तानने आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. संपूर्ण देशभरातून तेव्हा स्नेहा दुबे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. आतासुद्धा सुरक्षा परिषदेमध्ये टी. एस. तिरूमूर्ती यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्यांच्या दहशतवादासंदर्भातील भूमिकेचा पंचनामा केला. 11 सप्टेंबरच्या हल्ल्याला वीस वर्षे होऊन गेल्यानंतरही त्यासंदर्भात पश्‍चाताप न करता, ओसामा बिन लादेनचा शहीद म्हणून उल्लेख करणारे नेते असल्याचे कटू सत्य विसरता येणार नाही, असे सांगून त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना थेट लक्ष्य केले. भारताकडून जेव्हा दहशतवादासंदर्भात मांडणी केली जाते, तेव्हा ती केवळ पुस्तकी स्वरूपाची नसते. देशांतर्गत दहशतवाद असो किंवा सीमेपलीकडचा दहशतवाद असो दोन्ही पातळ्यांवर भारताने दीर्घकाळ दहशतवादाची झळ सोसली आहे. दहशतवादी हल्ल्यात एक पंतप्रधान आणि एक माजी पंतप्रधान भारताने गमावले आहेत. शिवाय शेकडो नागरिक दहशतवादाचे बळी ठरले आहेत, अब्जावधीच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. अशी झळ सोसलेल्या देशाकडून दहशतवादासंदर्भात ठोस भूमिका घेण्याबरोबरच दहशतवादाची पाठराखण करणार्‍यांचे बुरखे फाडण्याचीही आवश्यकता असते आणि भारताकडून ती पार पाडली जात आहे. अफगाणिस्तान, इराक, सीरिया, कांगो, युगांडामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये आप्त गमावलेल्या लोकांप्रती सहवेदना व्यक्‍त करून भारताने ही समस्या वैश्‍विक असल्याचे स्पष्ट केले. मुंबई आणि पठाणकोटवरील हल्ल्यातील पीडितांना न्याय न मिळाल्याची खंत त्याचीच निदर्शक आहे. दहशतवादामुळे चुकवाव्या लागणार्‍या मानवी मूल्याची जाणीव भारताला असल्याचे नमूद करणे, तसेच दहशतवादाच्या सूत्रधारांना न्यायासनासमोर खेचून शिक्षा देण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचे निःसंदिग्धपणे सांगणे हे त्यातूनच घडते. मुंबई हल्ल्यातील पकडलेला एकमेव जिवंत दहशतवादी कसाबला फाशीपर्यंत नेण्यासाठी भारताने संपूर्ण प्रक्रिया राबवली आणि जगाला भारताच्या न्यायप्रियतेचे दर्शन घडवले. त्यामुळे भारताकडून केलेले वक्‍तव्य 'केवळ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात' नाही. भारताने पकडलेल्या दहशतवाद्याला शिक्षा सुनावली तरी त्याचे जे सूत्रधार पाकिस्तानात आहेत, त्यांना मात्र पाकिस्ताने संरक्षण दिले आहे. त्यांच्यावरील खटल्यांचे देखावे उभे केले जातात आणि प्रत्यक्षात हे सूत्रधार खुलेआम फिरत भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्यात गुंतलेले असतात. म्हणूनच दहशतवादाच्या विरोधात आपले प्रत्युत्तर एकसंध आणि सुस्पष्ट असावे, असे भारताकडून सुरक्षा परिषदेत स्पष्ट करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news