पाकिस्तान पुढे तालिबान्यांचे आव्हान

पाकिस्तान पुढे तालिबान्यांचे आव्हान

रशियन फौजांविरोधात लढण्यासाठी ज्या तालिबानी संघटनेला पाकिस्तानने मदत केली, त्याच तालिबानी समुदायातील काही गट आता पाकिस्तानच्या विरोधात उतरण्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. या कट्टरपंथी तालिबान्यांना पाकिस्तानने आर्थिकदृष्ट्या आणि शस्त्रास्त्रदृष्ट्या संपन्‍न बनवले. रशियनांची हकालपट्टी करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य केले. प्रचंड प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवली. पाकिस्तानच्या आय.एस.आय. या कुख्यात गुप्‍तहेर संघटनेने हा पैसा आणि शस्त्रास्त्रे तालिबान्यांना दिली. त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही दिले. ज्या तालिबान्यांनी ही मदत घेतली, त्या मदतीतून 1996 ते 2001 या काळात सत्ता मिळवली, त्याच तालिबान्यांतील दहशतवादी संघटना आता पाकिस्तानवर उलटली आहे. तालिबान्यांचा हा भस्मासुर पाकिस्तानच्या डोक्यावर हात ठेवायला सरसावला आहे. तालिबानी दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील हल्‍ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. 'गुरूची विद्या गुरूला' या म्हणीचा अनुभव सध्या पाकिस्तानला येत आहे.

अमेरिकेकडून येणारी मदत तालिबान्यांना पुरवण्यात पाकिस्तानचा भारताला डोकेदुखी निर्माण व्हावी हा हेतू होता. तालिबानी दहशतवाद्यांनी काश्मिरात घुसखोरी करावी आणि तिथे उच्छाद माजवावा, हा या मदतीमागील पाकिस्तानचा नापाक इरादा! भारतीय जवानांच्या सतर्कतेने हा मनसुबा फारसा सफल झाला नाही; पण आता भारताविरुद्धचे कारस्थान पाकिस्तानच्याच अंगलट आले आहे. 'केले तुका आणि झाले माका' अशी पाकिस्तानची दयनीय अवस्था झाली आहे.

तालिबान्यांच्या दहशतवादी हल्ल्यात प्रचंड वाढ

तसे म्हटले तर गेल्या चार वर्षांपासून तालिबानी दहशतवाद्यांचा पाकिस्तानात धुडगूस सुरूच आहे. पण 17 ऑगस्टला तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर आपला कब्जा केला आणि त्यानंतर पाकिस्तानात तालिबान्यांच्या दहशतवादी कृत्यांना ऊतच आला आहे. 2017 सालच्या फेब्रुवारीपासून तालिबानी दहशतवाद्यांनी पाकिस्तानात घातपाती कृत्ये सुरू केली. ते प्रमाण गेल्या चार वर्षांत फार मोठे नव्हते किंवा त्याची तीव्रताही नव्हती; पण अफगाणिस्तानात तालिबान्यांची सत्ता आली आणि तालिबान्यांनी उचल खाल्‍ली. गेल्या एका ऑगस्ट महिन्यात तालिबानी दहशतवाद्यांनी पाकिस्तानात 35 घातपाती कृत्ये घडवली. त्यात 52 नागरिक ठार झाले. या घातपाती साखळी घटनांनी पाकिस्तानात तालिबान्यांची दहशत निर्माण झाली आहे. तहरिक-ई-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने या घातपाताची जबाबदारी घेतली आहे आणि आणखी विध्वंसक हल्ल्याचीही तयारी चालवली आहे. पाकिस्तानच्या अंतर्गत सुव्यवस्थेला हे मोठेच आव्हान आहे.

सरकार उलथवून टाकण्याची महत्त्वाकांक्षा

तहरिक-ई-तालिबान पाकिस्तान या संघटनेचे उद्दिष्ट केवळ घातपाती, दहशतवादी कृत्यापुरते मर्यादित नाही. या संघटनेला पाकिस्तानातील इम्रान खान यांचे सरकार उलथवून टाकायचे आहे. संघटनेने तसा इरादाही जाहीर केला आहे. सरकारविरोधात व्यापक युद्ध करायची या संघटनेने तयारी सुरूही केली आहे. पाकिस्तानी सरकाराविरोधात सशस्त्र उठावाचा तहरिकचा मनसुबा आहे आणि त्यासाठी अल्-कायदा या खतरनाक दहशतवादी संघटनेशीही तहरिकने संधान बांधले आहे. अफगाणिस्तानातील सत्तांतराने तहरिकलाही उत्तेजन मिळाले आहे.

वर्षभरापासून तयारी

अफगाणिस्तानातून अमेरिका सेना माघारी जाणार हे निश्‍चित होताच, तहरिकने आपल्या हालचाली वाढविल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अफगाणिस्तानवर रशियाने कब्जा केल्यानंतर अनेक अफगाणी गट पाकिस्तानात आश्रयाला आले. त्यातून छोटे-छोटे दहशतवादी गट तयार झाले. अशा काही छोट्या गटांना तहरिकने हाताशी धरले आणि आपल्या संघटनेत सामील करून घेतले आहे. गेल्या वर्षभरापासून तहरिकची ही तयारी चालली असल्याचे दक्षिण आशियाई तज्ज्ञांचे मत आहे.

तहरिकचा मोठा दणका

खैबर पख्तुनवा प्रांतामधील खुर्रम भागात तहरिकविरोधात पाकिस्तानी लष्कराने मोठी कारवाई केली होती; पण तहरिकने त्याला मोठाच धक्‍का दिला. तहरिकच्या प्रतिहल्ल्यात पाकचे 15 सैनिक ठार झाले. 63 सैनिकांना पळवून नेण्यात आले. तहरिकचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत असल्याचे हे लक्षण आहे.

पाक सरकार चिंतेत

तालिबानी संघटनांचा धोका पाकिस्तान सरकारच्या चिंतेत भर घालणारा आहे. पाकिस्तान सरकारने उघडपणे कधी या धोक्याचा उल्‍लेख केलेला नाही; पण तहरिक आणि इतर तालिबानी गटांना चिरडण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने मोहिमा काढल्या आहेत आणि त्यात अमेरिकेनेही ड्रोन हल्‍ले करून पाकला मदत केली आहे. तथापि, तालिबान्यांचा हा विषवृक्ष फोफावतच चालला आहे.

अफगाण हद्दीतून हल्‍ले

अफगाण हद्दीतून होणारे दहशतवादी हल्‍ले ही पाकची नवी डोकेदुखी ठरली आहे. अशा वेगवेगळ्या हल्ल्यांत पाकिस्तानचे नऊ सैनिक ठार झाले आहेत आणि अनेक सैनिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानात तहरिकच्या कारवाया वाढत असताना अफगाणिस्तानातून होणारे हल्‍ले पाकिस्तानची आणीख कोंडी करणारे ठरत आहेत. अफगाणी तालिबानी आणि तहरिक यांची हातमिळवणी झाली आहे का, अशी शंका घ्यायला जागा आहे.

अफगाणमध्ये पाकचा हस्तक्षेप नको ः तालिबान

पाकिस्तान सरकार तहरिकशी सामना करीत असतानाच अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने पाकिस्तानला अफगाणिस्तानात हस्तक्षेप करायला मुभा देणार नाही, असे स्पष्टपणे बजावले आहे. ज्या पाकिस्तानने तालिबानला सत्तेवर यायला मदत केली, त्याची अशी परतफेड तालिबानने केली आहे.

"तालिबानचे फुटीर गट एकत्र येत आहेत. त्यातून तहरिक-ई-तालिबान बळकट होत आहे."
– उमर करीम,
लंडनमधील रॉयल युनायटेड सर्व्हिस
इन्स्टिट्यूटचे फेलो

"तहरिकच्या धोक्याबद्दल पाकिस्तान उघडपणे बोलत नाही; पण तालिबानच्या संकटाबद्दल पाक सरकार चिंताग्रस्त आहे."
– अस्फदियार मीर,
अमेरिकेतील शांतता प्रतिष्ठानचे तज्ज्ञ

"पाकिस्तानने आमच्या अंतर्गत कारभारात कसलाही हस्तक्षेप करू नये."
– सुहेल शाहीन,
तालिबान प्रवक्‍ता

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news