काश्मीरमध्ये भारत सरकार आणि भारतीय लष्कराकडून मानवाधिकारांचे उल्लंघन केले जात असल्याच्या आंतरराष्ट्रीय प्रपोगंडासाठी पाकिस्तान सरकारकडून पदरचा पैसा खर्च केला जात असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. 'टाईम्स नाऊ'ने यासंदर्भातील पाकिस्तानी यंत्रणांतील अधिकृत पत्रव्यवहार उघडकीला आणला आहे. काश्मीर विषयावरून जगभरात 27 ऑक्टोबर रोजी नियोजित तसेच या विषयावरून यापूर्वी झालेली निदर्शने पाकिस्तान प्रायोजित होती व असतील. ही बाब पुराव्यानिशी सिद्ध झाली आहे.
पाकिस्तान येथील जनतेची अन्नान्नदशा झालेली असताना त्यावर खर्च करताना हात आखडता घेणार्या पाकिस्तान ने केवळ भारताला जगभरात नाहक बदनाम करण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतल्याचे समोर आले आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असताना पाकिस्तान सरकारने 'काश्मीर डेस्क' नावाचा स्वतंत्र उपविभाग सुरू करण्याचे कुठलेही कारण नव्हते. काश्मीरविषयक उपविभागाच्या सहायक संचालक तस्कीन उमर यांनी पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाला झालेल्या खर्चापोटीची (भारताच्या बदनामीसाठी मोहिमेवर) रक्कम मंजूर करण्याविषयी लिहिलेले पत्र 'टाईम्स नाऊ'च्या हाती लागले आहे. नैरोबी या देशातील पाकिस्तानच्या उच्चायोगाला काश्मीरमधील कथित मानवाधिकारांच्या उल्लंघनाबद्दल भारताविरुद्ध निदर्शने, परिसंवाद इत्यादींच्या आयोजनासाठी तसेच त्याबाबतच्या वृत्ताला व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी जो काही खर्च होईल, त्याचा तपशील या पत्रातून बाहेर आला आहे. पाकिस्तान सरकारने खास प्रपोगंडा बजेटच भारताच्या बदनामीसाठी मंजूर केले आहे.
बुधवारी 27 ऑक्टोबर 2021 रोजी पाक सरकार पाळणार असलेल्या 'काश्मीर ब्लॅक डे'चा 'कच्चाचिठ्ठा' त्यामुळे समोर आला आहे. दहशतवादाला संरक्षण देते म्हणून आधीच आंतरराष्ट्रीय करड्या यादीत असलेले पाकिस्तानचे सरकार मुळातच गुन्हेगारी वृत्तीचे असल्याचे या प्रकारामुळे जगाला दिसले आहे. अन्य एका पत्रातून दिल्ली वगळता जगभरात पाकिस्तानी उच्चायोग जेथे जेथे आहे, अशा प्रत्येक देशाच्या राजधानीत भारताविरुद्ध अपप्रचाराची प्रायोजित मोहीम पाकिस्तानने यापूर्वीही राबविली असल्याचे आणि बुधवारीही राबविण्याचे नियोजन उघड झाले आहे. प्रत्येक उच्चायोगाने या दिवशी कोणकोणते उपक्रम भारताविरुद्ध राबविले, त्याचा विस्तृत अहवाल परराष्ट्र मंत्रालयाला पाठविण्यात यावा, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. प्राग, कोपनहेगन तसेच युरोपियन युनियनसह जगभरातील अन्य देशांतील उच्चायोगांकडून काय नियोजन आहे, त्याचाही ऊहापोह यात आहे. नागरी संस्थांच्या माध्यमातून सभा, चर्चासत्रे आयोजिण्यावर या कटात मोठा भर देण्यात आला आहे. त्या-त्या देशांतील स्थानिक मुद्रित, द़ृकश्राव्य माध्यमांसह समाजमाध्यमांचाही वापर करण्याची योजना आहे.
'काश्मीर ब्लॅक डे'ची निवडही हिंसा समर्थक
'काश्मीर ब्लॅक डे'साठी पाकिस्तानने निवडलेली 27 ऑक्टोबर ही तारीखही तेथील सरकारची वृत्ती अधोरेखित करणारी आहे. हा दिवस भारतात 'इन्फेन्ट्री' दिवस म्हणून साजरा केला जातो. 1947 साली याच दिवशी भारतीय लष्कराने काश्मीरमध्ये हिंसाचाराचा कळस गाठणार्या साध्या वेशातील पाकिस्तानी लष्कराला तसेच 'तायफा'वाल्यांना (पाकिस्तानातील गुन्हेगारी टोळ्यांचे संयुक्त दल) पिटाळून लावले होते. तेव्हाही पाकिस्तानने काश्मीरमधील हिंदूंनाच लक्ष्य केले होते.