पाकव्याप्त काश्मीरसाठी बळाचा वापर लागणार नाही : राजनाथ सिंह

पाकव्याप्त काश्मीरसाठी बळाचा वापर लागणार नाही : राजनाथ सिंह

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जम्मू आणि काश्मीरमधील विकास बघून पाकव्याप्त काश्मीरचे नागरिक आपण होऊनच भारतात येण्यास तयार होतील. भारताला त्यासाठी बळाचा वापर करावा लागणार नाही, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंह म्हणाले, मोदी सरकारच्या काळात जम्मू-काश्मीरचा कायापालट झाला आहे.

विकासाचा वारू सुसाट निघाला आहे. हा विकास बघूनच भविष्यात पाकव्याप्त काश्मीरचे नागरिक त्या भागाला भारतात विलीन करून घेण्याची मागणी करतील यात शंका नाही. तशा मागण्याही त्यांच्याकडून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारताला लष्करी बळाचा वापर करावा लागणार नाही. पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग होता. भारताचा भाग आहे आणि भारताचाच राहील, असेही सिंह यांनी ठणकावून सांगितले.

काश्मीरमधील स्थितीबाबत राजनाथ सिंह म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमधील स्थितीत होत असलेली सुधारणा पाहता एक दिवस तेथे अ‍ॅफस्पा लागू करण्याची गरज राहाणार नाही. अर्थात हे माझे मत असून त्याबाबत गृहमंत्रालयच निर्णय घेईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. ते म्हणाले, पाकिस्तानचा सीमापार दहशतवादामध्ये असलेला सहभाग जगजाहीर आहे. पाकिस्तानने आता या कारवाया बंद करायला हव्यात. या भागात शांतता राहावी आणि दहशतवादाचा बीमोड व्हावा यावर भारताचा निर्धार कायम असल्याचेही ते म्हणाले.

काश्मिरात निवडणुका वेळेवरच

राजनाथ सिंह म्हणाले, जम्मू-काश्मिरातील स्थिती आता सर्वसामान्य होत आहे. तेथे लोकसभेच्या निवडणुकाही होत आहेत. निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात तेथील जनता मताधिकार वापरत आहे. त्यामुळे निर्धारित वेळेलाच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्याही निवडणुका होतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news