पर्यटन विकासाला हवे मार्केटिंगचे बळ!

पर्यटन विकासाला हवे मार्केटिंगचे बळ!

गडकोट, पर्यटन तसेच धार्मिक स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे आदी वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींमुळे कोल्हापूर पर्यटनाच्या द‍ृष्टीने पूरेपूर आहे. आल्हाददायक वातावरण, उन्हाळा-पावसाळा-हिवाळा असे तीन ऋतू, बारमाही निसर्गसंपन्‍न असणार्‍या कोल्हापूरला पर्यटन व्यापकतेच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. यासाठी कृतिशील प्रयत्न गरजेचे आहेत. करवीर काशी – धार्मिक स्थळ, छत्रपतींची राजधानी – ऐतिहासिक भूमी, राजर्षी शाहूंच्या विचारांची पुरोगामी नगरी, कला व क्रीडानगरी या व अशा अनेक बिरुदावल्यांनी कोल्हापूरची सातासमुद्रापार ओळख आहे. सुमारे दोन हजारहून अधिक वर्षांचा प्रदीर्घ वारसा कोल्हापूरला लाभला आहे. त्यामुळेच कोल्हापूरची आता 'पर्यटन नगरी' अशी नवी ओळख निर्माण झाली आहे.

गुंफा, मंदिरे, मठ, वास्तू, गडकोट-किल्‍ले, घाट, तलाव, धरणे, पठारे, जंगले यांची शृंखलाच येथे आहे. मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचली आहे. बहुतांशी गोष्टींचे मार्केटिंग न झाल्याने कोल्हापूरचे पर्यटन दुर्लक्षित राहिले आहे.

सर्वधर्मीय स्थळाची विविधता

करवीर निवासिनी अंबाबाई, दख्खनचा राजा जोतिबा, नृसिंहवाडी या देवस्थानांमुळे कोल्हापूरचे धार्मिक पर्यटन प्रसिद्ध झाले आहे. भारतातील 12 शक्‍तिपीठांपैकी एक असणार्‍या कोल्हापुरातील करवीर निवासिनी व जोतिबाच्या दर्शनाला देशभरातून भाविक येतात. प्राचीन काळापासून अस्तित्वात असणार्‍या अनेक मंदिरांमुळे इथल्या पर्यटनाचे महत्त्व कित्येक पटींनी वाढले आहे. विविधधर्मीय मंदिर, मशीद, चर्चमुळे कोल्हापूरचे धार्मिक पर्यटन सजले आहे.

प्राचीन गुंफा, शिल्पवैभव

कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी अशा प्राचीन गुंफा, शिलालेख व शिल्पवैभव शेकडो वर्षांचा इतिहास सांगत आपले अस्तित्व टिकवून उभे आहेत. पण मोजकी ठिकाणे सोडली तर बहुतांशी गुंफा, शिलालेख यांची माहिती नसल्याने कोल्हापूरचा हा वैभवशाली वारसा पर्यटकांपासून वंचित राहिला आहे.

पराक्रमाची साक्षीदार स्फूर्तिस्थळे

शेकडो वर्षांच्या लढवय्या इतिहासाची साक्ष देणारी ठिकाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाहायला मिळतात. स्फूर्तिदायी इतिहासाची महती सांगणारे वीरगळ, विविध कालखंडातील वीरांची समाधिस्थळे, स्त्रीशक्‍तीची साक्ष देणार्‍या सती शिळा यांचा यात समावेश आहे. याशिवाय विविध कालखंडातील तब्बल 14 गडकोट-किल्‍ले जिल्ह्यात ठिकठिकाणी आहेत. या सर्व स्फूर्तिस्थळांची माहिती पर्यटकांना झाल्यास वीरांच्या पराक्रमांचे दर्शन घडविणार्‍या स्फूर्तिस्थळांचेही पर्यटन विकसित होऊ शकते.

पुरोगामी विचारांचा वारसा

शिवछत्रपती, रणरागिणी ताराराणी यांचा वारसा विकसित करण्याचे काम लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केले. त्यांच्या कार्याची माहिती देणारी स्मारके जिल्हाभर विखुरलेली आहेत. अशा स्मारकांचे दर्शन घेऊन पुरोगामी विचारांच्या शाहू कार्याची माहिती घेणे हेही एक अनोखे पर्यटन ठरू शकते.

अभयारण्ये, धरणे अन् बरंच काही…

निसर्गसंपन्‍न कोल्हापुरात अभयारण्ये, छोटी-मोठी जंगले, घाटवाटा, पठारे, डोंगर-दर्‍या, धरणे, नदी पात्रे, देवराया अशी विविधता आहे. याच बरोबर कृषी, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, खाद्य संस्कृती, लष्करी परंपरा या व अशा विविध क्षेत्रांचा मोठा वारसाही कोल्हापूरला लाभला आहे. या सर्वांचे दर्शन घडविणार्‍या, विविधतेने नटलेल्या पर्यटनाच्याही अनेक संधी कोल्हापूरकरांना उपलब्ध आहेत. यासाठी जाणीवपूर्वक व सर्वसमावेशक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

ऐतिहासिक वस्तुसंग्रहालये

प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासाचा शेकडो वर्षांचा वारसा सामावलेल्या ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहालयांनी कोल्हापूरच्या पर्यटनात भर घातली आहे. टाऊन हॉलमधील कोल्हापूर वस्तुसंग्रहालय, न्यू पॅलेसमधील छत्रपती शहाजी म्युझियम, कसबा बावडा लक्ष्मी विलास पॅलेस येथील शाहू जन्मस्थळ व संग्रहालय यामुळे ऐतिहासिक पर्यटन जपले आहेच. त्याचबरोबर राजारामपुरी येथील चंद्रकांत मांडरे कला दालन व कणेरी मठ येथील ग्रामीण संस्कृती दर्शविणारे संग्रहालय या माध्यमातून कलानगरीचा वारसा जपला आहे. याचबरोबर क्रांतिकारी परंपरा, कोल्हापूरचा उद्योग विकास, ग्रंथ संपदेचा वारसा, कला क्षेत्रातील वाटचाल अशा विविध विषयांवरील संग्रहालयेही करता येणे शक्य आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news