ठाणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबई आणि ठाणे शहराचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध 23 जुलै 2021 रोजी कोपरी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्या प्रकरणी संजय पुनमिया आणि सुनील जैन यांना कोपरी पोलिसांनी मुंबईतून अटक केली.
त्यानंतर दोघांना शनिवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांना 12 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. परमबीर यांनी शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटींची खंडणी उकळल्याचा आणि 2 कोटी 68 लाखाची जमीन बळकावल्याचा आरोप आहे.
या गुन्ह्यात संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर आदींसह ठाणे गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त पराग मनेरे यांना देखील सहआरोपी करण्यात आले आहे.
परमबीर सिंह यांच्याविरुद्ध कलम 384, 385, 388, 389, 420, 364 ए, 34, 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील तक्रारदार शरद अग्रवाल यांनी कोपरी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असतांना सिंग आणि तत्कालीन डीसीपी पराग मनेरे यांनी मोक्काच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 2 कोटींची रोख खंडणी वसूल केली होती.
तसेच 2 कोटी 68 लाख रुपयांचा एक भूखंड देखील बळकावला होता. हा प्रकार नोव्हेंम्बर 2016 ते मे 2018 या काळात घडल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. हा सारा घटनाक्रम कोपरी येथील पोलीस आयुक्त बंगला येथे घडला असल्यामुळे या घटने प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.