पन्हाळगड, विशाळगड इतिहासावर सखोल संशोधनाची गरज

पन्हाळगड, विशाळगड इतिहासावर सखोल संशोधनाची गरज

कोल्हापूर : सागर यादव : शिवकाळात 12 व 13 जुलै 1660 या दिवशी पन्हाळगड ते विशाळगड मार्गावर प्रचंड रणकंदन घडले. रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या शिवछत्रपतींच्या रक्षणार्थ शेकडो बांदल-मराठा सैनिकांनी हजारोंच्या शत्रू सैन्याशी कडवी झुंज देत प्राणांचे बलिदान दिले. अशा या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणार्‍या अनेक पाऊलखुणा पन्हाळगड ते विशाळगड या मार्गावर विखुरल्या आहेत. यात फरसबंदी मार्ग, शिवकालीन विहीर, अज्ञात समाधी यांचा समावेश आहे. यांच्या संशोधनाबरोबरच जतन-संवर्धन आणि संरक्षणासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

इतिहास पदभ्रमंतीपुरता मर्यादित

'पावनखिंड संग्राम' इतिहासाच्या स्मृती जपण्यासाठी प्रतिवर्षी पावनखिंड संग्राम दिनानिमित्त 'पन्हाळगड ते पावनखिंड' या साहसी पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन विविध शिवभक्त, इतिहासप्रेमी संस्था-संघटनांच्या वतीने केले जाते. ही मोहीम आता देशव्यापी झाली आहे. मुसळधार पावसात सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि दर्‍या-खोर्‍यांतील

जंगलातून दगड, चिखल-गोटे-काट्याकुट्यांच्या खडतर मार्गाने संपूर्ण जुलै महिन्यात पन्हाळगड ते पावनखिंड ही मोहीम सुरू असते. मात्र, पावनखिंडीचा संग्राम केवळ पदभ्रमंतीपुरता मर्यादित राहिला आहे. चिंब पावसात भिजत, खाऊन-पिऊन एन्जॉय करत अ‍ॅडव्हेंचरसह रिल, फेसबुक, ट्विटर, व्हॉटस् अ‍ॅपवर क्लिप्स, व्हिडीओ, फोटो शेअर करण्यापुरतेच अनेक ट्रेकर्स यात सहभागी होत असल्याचे वास्तव आहे.

अज्ञात नावे प्रकाशात यावीत

आदिलशहाचा सेनापती सिद्दी जौहर, सलाबत खान यांचा कडेकोट वेढा शिताफीने फोडून शिवछत्रपतींनी 12 जुलै 1660 रोजी विशाळगडाकडे कूच केली. शत्रू सैन्याला चकवा देत रात्रीच्या अंधारात शिवराय विशाळगडावर सुरक्षित पोहोचले. रयतेच्या राजाच्या प्राण रक्षणासाठी वीर शिवा काशिद, बांदल सैन्याचे प्रमुख रायाजी नाईक-बांदल (देशमुख), बाजी व फुलाजीप्रभू देशपांडे, विठोजी काटे, संभाजी जाधव, हैबतराव बांदल यांच्यासह 600 बांदल-मराठा सैनिकांनी प्राणांची बाजी लावली. या मोहिमेतील अज्ञात मावळ्यांच्या नावांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे.

स्फूर्तिदायी स्मारकांकडे दुर्लक्ष

इतिहासातील अशा या देदीप्यमान प्रकरणाच्या स्मृती जपण्यासाठी पन्हाळा व विशाळगडावर वीरांचे पुतळे व स्मारके उभारण्यात आली आहेत. मात्र, त्यांची व्यवस्था नीट राखली जात नाही. स्मारकांच्या जीर्णोद्धाराची कामे गेली कित्येक वर्षे 'जैसे थे' आहेत. सुशोभीकरण, डागडुजी, रंगरंगोटी होत नसल्याने त्यांना अवकळा आली आहे. वीरांच्या इतिहासाची साक्ष देणार्‍या या स्मारकांचे जतन, संवर्धन व संरक्षणासाठी प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे.

पावनखिंड प्रकरणाचा अभ्यास करताना जावळीचा पाडाव (1656), प्रतापगडच्या युद्धात शिवछत्रपतींनी अफजल खानाला ठार मारून केलेला भीम पराक्रम (10 नोव्हेंबर 1659), बांदल-देशमुखांचे योगदान, दीपाऊ बांदल यांचा पराक्रम, बांदल-देशमुखांच्या तुकडीने कर्तृत्वाने निर्माण केलेला विश्वास अशा प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करणे अत्यावश्यक आहे.

याचबरोबर पन्हाळा व विशाळगडाची भौगोलिक स्थिती, इंग्रजांकडून आणलेल्या तोफा, वेढा फोडून विशाळगडाकडे जाण्याचा निर्णय, मसाई पठारमार्गे असणार्‍या प्राचीन मार्गाची निवड, बांदल सैनिकांच्या तुकडीचीच नेमणूक, स्वराज्यावरील शाहिस्तेखानाचे संकट अशा संदर्भांचाही परिपूर्ण अभ्यास होणे गरजेचे असल्याचे सावंत यांनी सांगितले. या सर्वांबरोबरच प्राचीन काळातील व्यापारी मार्ग असणार्‍या पांढरेपाणी व पावनखिंड परिसरातील फरसबंदी मार्गांचे अवशेष, शिवकालीन विहीर, अज्ञात समाध्यांचे जतन-संरक्षण तातडीने व्हावे, अशी अपेक्षाही सावंत यांनी व्यक्त केली.

अनावश्यक गोष्टींचे अवडंबर नको

पावनखिंड परिसरात काही वर्षांपूर्वी शासनाने एका भव्य बुरुजाची निर्मिती केली आहे. या उंच बुरुजावर जाऊन संपूर्ण परिसर सर्वांना पाहता यावा, हा उद्देश आहे. मात्र, अलीकडच्या काळात काही लोकांनी या बुरुजाचे नामकरण 'ध्वजस्तंभ' असे केले असून, चप्पल घालून या बुरुजावर न जाण्याची सक्ती केली जात आहे. तसेच सध्या जी पावनखिंड म्हणून दाखविली जाते ती नैसर्गिक घळ म्हणजे कासारी नदीचे उगम स्थान असून, 6 कि.मी. परिसरात पसरलेल्या पावनखिंड परिसराचा एक भाग आहे. पावसाळ्यात प्रचंड वेगाने पडणारे पाणी धोकादायक असल्याने या घळीत खबरदारी घेत सुरक्षितपणे उतरावे, असे आवाहन इंद्रजित सावंत यांनी केले.

अज्ञात मावळ्यांची नावे प्रकाशझोतात आणण्यासाठी शत्रूच्या म्हणजेच आदिलशाही दरबाराशी संबंधित तत्कालीन पत्रव्यवहार, ऐतिहासिक दस्तावेज, सिद्दी जोहर, सलाबत खान, पीडनाईक बेडर यांच्याशी संबंधित कागदपत्रांचा अभ्यास व संशोधन होणे अत्यावश्यक असल्याचे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news