नेताजींच्या स्वप्नातील भारत

नेताजींच्या स्वप्नातील भारत

एखादा महामानव काळाच्या पडद्यावरून नाहीसा होतो. मात्र, त्यानंतर त्याचे जीवन लोकांना सातत्याने प्रेरणादायी ठरू शकते. नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांच्या हयातीपेक्षाही निर्वाणानंंतरच्या काळात लोकांच्या चिंतनाचे, विचाराचे आकर्षण बनले. नेताजींनी कालचक्राच्या प्रवाहावर उमटवलेला ठसा म्हणजेच त्यांचे नवभारताचे स्वप्न होय. ते साकारण्यासाठी जो कोणी महानायक प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, त्याला नेताजींच्या विचारांचे परिशीलन करून पुढे वाटचाल करावी लागेल. आज (सोमवार) त्यांची जयंती.

नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे भारतीय राजकारणातील अतिशय धगधगते होमकुंड होते. स्वातंत्र्यलढ्याच्या यशामध्ये नेताजींचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. असीम त्याग, सेवा व समर्पण यांचा आदर्श त्यांनी निर्माण केला. त्यांच्या प्रखर देशभक्तीने आणि समर्पणामुळे भारतीय स्वातंत्र्याचा क्षण समीप आला. त्यांच्या तेजःपुंज आणि प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वाला भारतीय स्वातंत्र्यलढ्यात तोड नाही असे म्हणावे लागेल. ब्रिटिश राज्यकर्त्यांचा प्रखर विरोध असूनही नेताजींनी आपल्या युयुत्सु लढाऊ बाण्याचे दर्शन नेहमीच घडवले. साम—ाज्यवादाशी अहर्निश लढा देऊन स्वातंत्र्याचा सुवर्णक्षण त्यांनी जवळ आणला. नेताजी सुभाषचंद्र बोस नसते तर भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णक्षण आणखी 20 वर्षे लांबला असता, असे मत इंग्लंडचे माजी पंतप्रधान मॅकडोनाल्ड यांनी व्यक्त केले होते. त्यावरूनच नेताजींच्या कार्याचे श्रेष्ठत्व सिद्ध होते.

नेताजींच्या कर्तृत्वाची साक्ष तत्कालीन कागदपत्रांवरून आणि त्यांच्यावर लिहिलेल्या चरित्रग्रंथांतून प्रकट होते. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये गांधी आणि नेहरू या दोन नेत्यांची इतकी पूजा झाली की, त्यांच्या तुलनेत सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा बराचसा विसर पडला. परंतु आता नेताजींविषयीची कागदपत्रे पुढे आली आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या अनेक नव्या पैलूंचे दर्शन घडते आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान आणि त्यांची नवभारताची दृष्टी याबाबत अनेक नवे पैलू समोर येत आहेत. नेताजी हे स्वातंत्र्यलढ्याचे धगधगते होमकुंड बनले होते. ही धरती, आकाश आणि ही भूमी ही भारतमातेच्या मुक्तीसाठी जागृत झाली आहे. आजवर या भूमीने बराच विसावा घेतला; परंतु ही भूमी आता एवढी जागृत झाली आहे की, ती आता मुक्तीच्या लढ्यासाठी सज्ज झाली आहे. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र देतो, अशा स्वरूपाचा करारच जणू नेताजींनी केला होता.

भारतीय युवाशक्तीला जागृत करण्याचे आणि युवाशक्तीला स्वातंत्र्याच्या मध्यवर्ती प्रवाहात आणण्याचे कार्य हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जितक्या प्रभावीपणे केले, तितक्या प्रभावीपणे त्या काळात इतर कुणीही केले नाही. नेताजींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची मुंबईमध्ये भेट घेऊन त्यांच्याकडून प्रेरणा घेतली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण आझाद हिंद सेनेची स्थापना करावी, अशी सूचना केली होती. त्यानुसार नेताजींनी योग्य वेळ येताच स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या आझाद हिंद सेनेची स्थापना केली. जपानमध्ये तुरुंगात असलेल्या भारतीय जवानांना एकत्र करून त्यांच्या सहाय्याने ही सेना त्यांनी उभी केली. सुरुवातीला 3000 इतकी संख्या होती; परंतु पुढे ती सातत्याने वाढत गेली.

नेताजींचा जीवनपट असे सांगतो की, प्रखर बुद्धिमत्ता आणि प्रतिभाशक्ती हे त्यांचे महत्त्वाचे शक्तिस्थळ होते. महाविद्यालयीन जीवनात कोलकाता, कटक येथे त्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष केला, तरुणाईचे संघटन केले आणि प्रसंगी इंग्रजांशी लढा दिला. 1922 मध्ये पदवीधर झाल्यावर नेताजी आयपीएसीसी परीक्षा उत्तीर्ण झाले. या काळात क्रॉनिकल या इंग्रजी दैनिकाने भारताविषयी लिहिलेल्या अपमानास्पद मजकुराविषयी त्यांना माफी मागण्यास भाग पाडले होते.

नेताजींचे हे यश विलक्षण होते. एकानंतर एक असे दोनवेळा काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद भूषविण्याचा विक्रम त्यांनी केला. लाहोर अधिवेशनात त्यांनी संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करून घेतला. त्यावेळी काँग्रेसमधील काही नेत्यांना टप्प्याटप्प्याने स्वराज्य घ्यावे, असे वाटत असे; परंतु नेताजींचा असा आग्रह होता की अंतिम स्वराज्य किंवा संपूर्ण स्वराज्य एकदाच घेतले पाहिजे याविषयी त्यांचे गांधीजींशी मतभेद झाले; पण नेताजी आपल्या मतावर ठाम होते. त्यांनी लाहोरमध्ये अखेर पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर करून घेतला. गांधीजींशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला. अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.

– प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news