नृसिंहवाडीसह गगनगडावर आज दत्त जयंती महोत्सव

नृसिंहवाडीसह गगनगडावर आज दत्त जयंती महोत्सव
Published on
Updated on

नृसिंहवाडी : विनोद पुजारी

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे शनिवारी कोरोनाचे नियम पाळून दत्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट केली आहे. दरम्यान, लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व विश्वगौरव सन्मान विभूषित महान योगी प. पू. गगनगिरी महाराजांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या गगनगडावर श्री दत्त जयंतीचा अपूर्व सोहळा शनिवारी साजरा होत आहे. यानिमित्त गगनगडावरील आश्रमात भाविकांची मांदियाळी जमली आहे. यंदाच्या सोहळ्यास एस.टी. संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

नृसिंहवाडी येथे मुख्य मंदिरात शनिवारी पहाटे चार वाजता काकड आरती होईल. त्यानंतर श्रींच्या चरणकमलांची पूजा होणार आहे. सकाळी 9 ते 12 या वेळेत पंचामृत अभिषेक, दुपारी 12 वाजता महापूजा होऊन त्रयमूर्तीची पान पूजा बांधण्यात येईल. दुपारी चार वाजता पवमान पठण व त्यानंतर दुपारी साडेचार वाजता श्रींच्या उत्सवमूर्तीचे मुख्य मंदिरात जन्मोत्सवासाठी आगमन होईल. तत्पूर्वी, दत्तात्रेय उपाध्ये यांचे कीर्तन होईल. सायंकाळी पाच वा. जन्मकाळ साजरा होऊन ब्रह्मवृंद पाळण्याचे पठण करतील. रात्री धूपारती, पालखी व शेजारती आदी कार्यक्रम होणार आहेत.

पोलिस-दुकानदारांत वाद

दरम्यान, येथे एकेरी मार्गावरून पोलिस प्रशासन व मिठाई दुकानदार यांच्यात शुक्रवारी दुपारी वाद झाला; पण प्रशासन व दुकानदारांनी चर्चेतून मार्ग काढून या वादावर पडदा टाकला. प्रशासनाने ठराविक काळासाठी एकेरी मार्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.
गगनगडावर विविध कार्यक्रम

गगनबावडा ः गगनगडावर जयंती सोहळ्यानिमित्त शुक्रवारपासून सलग चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. वाल्मीकी पाटणहून पायी दिंडी गगनगडावर दाखल झाली आहे. श्रमिक सेवा मंडळ मुंबई, श्री दत्त जयंती उत्सव समिती पनवेल व श्रीश्रेत्र किल्ले गगनगड ट्रस्टच्या वतीने शनिवारी दत्त जयंतीचा मुख्य सोहळा गगनगड पठारावर साजरा होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news