कुवैत : वृत्तसंस्था प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात फहील भागात विदेशी नागरिकांनी निदर्शने केली. कुवैत सरकारने निदर्शकांवर कडक कारवाई केली.
सर्व निदर्शकांच्या अटकेचे आदेश जारी केले आहे. त्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय त्यांना आयुष्यात पुन्हा कधीही कुवैतमध्ये प्रवेश नसेल. कुवैतमधील 'अरब टाईम्स' या वृत्तपत्रातील बातमीनुसार फहील भागात बहुतांश वस्ती भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशी मुस्लिमांची आहे. हे सारे मिळून निदर्शनात सहभागी झाले होते. या सर्वांनी निदर्शने करून कुवैत सरकारचा नियम मोडलेला आहे, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
याआधी कुवैतसह 57 मुस्लिम देशांनी नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. कुवैतमध्ये 4.5 लाख भारतीय रहिवासी आहेत. त्यांच्या माध्यमातून 5.5 टक्के विदेशी चलन भारताला प्राप्त होते. कुवैतमध्ये 70 टक्के अप्रवासी लोक राहतात. यापैकी सर्वाधिक भारतीय आहेत.