निळा शर्ट, गोल टिळा; आमदारांना ओळखण्यात घोटाळा

निळा शर्ट, गोल टिळा; आमदारांना ओळखण्यात घोटाळा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेत सहकारी आमदाराला ओळखण्यात घोटाळा झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट उपसभापती नीलम गोऱ्हे यांनाच शुक्रवारी एक पत्र पाठवले. त्यात निळा शर्ट, गोल टिळा लावलेली अज्ञात व्यक्ती सभागृहात बसली असून, याबाबत खातरजमा करण्याची मागणी केली.

अखेर विधिमंडळ सचिवालयाने सीसीटीव्ही फुटेज खंगाळल्यानंतर ही अज्ञात व्यक्ती म्हणजे भाजपचे विधान परिषदेतील आमदार रमेश कराड असल्याचे उघड झाले. स्वतः नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी सभागृहात ही माहिती दिली. शिवाय, सभागृहातील सहकाऱ्यांना मिटकरी ओळखू शकले नाहीत, याबद्दल आश्चर्यही व्यक्त केले.

यावर आपली बाजू मांडताना मिटकरी म्हणाले की, आपण कराड यांना ओळखू शकलो नाही. माझ्या शेजारच्या सहकाऱ्यांना विचारले असता तेही आमदार कराडांना ओळखू शकले नाहीत. शिवाय, त्या दिवशी आमदार श्रीकांत भारतीय, ज्ञानेश्वर म्हात्रे हेसुद्धा निळ्या शर्टात होते; पण यापुढे काळजी घेण्याची ग्वाही मिटकरी यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news