निमित्त ऑगस्ट क्रांतिदिनाचे !

निमित्त ऑगस्ट क्रांतिदिनाचे !
Published on
Updated on

9 ऑगस्ट 1942 रोजी भारतीय इतिहासाने एक तेजस्वी सुवर्णबिंब पाहिले आणि या सूर्याने स्वातंत्र्याचा मंगलक्षण समीप आणला. जगाच्या इतिहासावर विलक्षण ठसा उमटवणार्‍या बोल्शेविक क्रांती तसेच अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती या क्रांतिकारक घटनांप्रमाणेच ऑगस्ट क्रांतीलाही विशेष महत्त्व आहे. चलेजाव चळवळीने इंग्रजांच्या शोषक प्रवृत्तीविरुद्ध जागतिक पातळीवर जागृती घडवून आणली.

आधुनिक भारताच्या इतिहासात ऑगस्ट क्रांतिदिनास विशेष महत्त्व आहे. ऑगस्ट क्रांती ही वसाहतवाद विरोधी, वर्णवादविरोधी आणि भांडवलशाही विरोधी क्रांती होती. भारतीय राष्ट्रवादास अद्भूत चेतना आणि प्रेरणा देण्याचे सामर्थ्य ऑगस्ट क्रांतीमध्ये दिसून येते. हाती कोणतेही शस्त्र नसताना महात्मा गांधी यांनी 'चले जाव, भारत छोडो' अशी घोषणा केली आणि संबंध भारतातून इंग्रजांविरोधात असंतोषाची लाट निर्माण झाली. इंग्रजी सत्तेला भारतीय जनआंदोलनातून जे जबरदस्त आव्हान देण्यात आले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.

14 जुलै 1942 रोजी बापू कुटीत भारत छोडो चळवळीचा ठराव झाला. या ठरावास 'वर्धा योजना' म्हणून ओळखले जाते. त्या बैठकीत ऑगस्ट क्रांतीची नियमावली, आंदोलनावेळी घ्यावयाची काळजी, आचारतत्त्वे इत्यादींविषयी चर्चा झाली. महात्मा गांधी यांना या चळवळीचे सर्वाधिकार दिले होते. मुंबई येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात 'चले जाव' चळवळीचा ठराव मंजूर झाला होता. त्यानुसार 8 ऑगस्ट 1942 रोजी आझाद मैदानावर गांधीजींनी भाषण केले आणि त्यात 'डू ऑर डाय' असा महत्त्वाचा नारा दिला. 'यंग इंडिया' या साप्‍ताहिकाच्या लेखात गांधीजी म्हणतात, 'हा मोठा कसोटीचा क्षण आहे. ही अग्‍निपरीक्षा आहे. जनतेने चले जाव चळवळीचे भरभरून समर्थन करावे.

माझी वाचकांना विनंती आहे की, आपण आमचे अंधभक्‍त बनू नका. आमचे काही चुकत असेल तर आमच्यावर तुम्ही टीकाही करू शकता.' यावरून गांधीजींची भूमिका अत्यंत प्रांजळ, स्वच्छ आणि स्पष्ट होती हे लक्षात येते.

ब्रिटिशांचा जगातील राजकारणातून फज्जा उडत होता, पराभव होत होता अशा वेळी योग्य प्रसंगी योग्य कालावधीची निवड करून या चळवळीची आखणी केली होती. जर्मनीचा वाढता प्रभाव, इंग्रजांच्या सत्तेला लागलेले ग्रहण या परिस्थितीत भारताने संपूर्ण स्वराज्याची मागणी केली. इंग्रजी सत्तेला मुळापासून हादरवून टाकणारा हा ठराव होता आणि त्याला गांधीजींचे नेतृत्व होते. गांधीजी मुंबईत भाषण करून पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये पोहोचताच त्यांना इंग्रजांनी अटक केली. काँग्रेसचे सर्व नेते भूमिगत झाले. युवा नेत्या अरुणा असफअली यांनी गवालिया टँक म्हणजेच आझाद मैदानावर तिरंगा फडकवला आणि 9 ऑगस्ट क्रांतिदिन चळवळीस प्रारंभ झाला.

संपूर्ण हिंदुस्थानात या चळवळीचे पडसाद उमटले. 9 लाख लोकांना अटक झाली. अनेक ठिकाणी लोकांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. जनतेचा कौल आणि असंतोष एवढा मोठा होता की ही चळवळ मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने पुढे गांधीजींना इंग्रजांनी मुक्‍त केले; परंतु प्रमुख नेत्यांना चार-पाच वर्षे कारावास सोसावा लागला, पण इंग्रजांच्या सत्तेला जबरदस्त हादरा बसला. इथून पुढे हिंदुस्थानात राज्य करणे अवघड आहे, ही गोष्ट इंग्रजांच्या लक्षात आली.

या चळवळीत लोकनायक जयप्रकाश नारायण, पंडित नेहरू, असिफ मेहता यांनी सक्रियपणे भूमिका मांडल्या. चले जाव चळवळीचे मूल्यमापन करताना दयानंद विद्यापीठातील इतिहासाचे अभ्यासक डॉ. मलिक म्हणतात की, चले जाव चळवळीने इंग्रजांना आपण हिंदुस्थानातून काढता पाय घेतला पाहिजे याची खात्री पटली आणि भारताच्या स्वातंत्र्यास पोषक वातावरण तयार झाले. या चळवळीस तत्काळ फलश्रुती मिळाली नसली तरीही नंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचा मार्ग सुकर झाला. 'चले जाव' चळवळीतीलउत्स्फूर्त लोकसहभाग आणि इंग्रजांविरुद्धचा असंतोष या कारणांमुळे हा लढा बव्हंशी सफल झाला, असे आपणाला म्हणता येईल.

1942 च्या लढ्यानंतर पुढे त्रिमंत्री योजना आली आणि लॉर्ड अ‍ॅटर्ली यांनी भारताच्या स्वातंत्र्यास अनुकूलता दर्शवली. त्यातून भारताच्या स्वातंत्र्याचा राजमार्ग सफल होत गेला. म्हणजे 1942 चा लढा हा भारतीय स्वातंत्र्याची मंगल पहाट समीप आणण्याच्या द‍ृष्टीने टाकलेले एक धाडसी पाऊल होते. या लोकलढ्याने भारतीय तरुणांमध्ये इंग्रजांविरोधात जबरदस्त जागृती निर्माण केली. एस. एम. जोशी, अशोक मेहता, जयप्रकाश नारायण यांचा उदय याच काळात झाला. पुढील 50 वर्षांच्या राजकारणावर कार्यकर्तृत्वाने, विचाराने या नेत्यांनी वेगळा ठसा उमटवला. तरुणांचे नवे नेतृत्व प्रदान करणारी चळवळ आणि नव्या युगाला सामोरे जाण्यासाठी जनतेमध्ये विश्‍वास निर्माण करणारी चळवळ असे या चळवळीचे वर्णन करता येईल. राष्ट्रीय महासभेने आखलेल्या भारत छोडो किंवा चले जाव किंवा ऑगस्ट क्रांती या आंदोलनाची लोकप्रियता एवढी शिखरावर पोहोचली होती की महासभेने आखलेल्या जनआंदोलनाचा कार्यक्रम लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सफल झाला आणि भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णक्षण समीप आला.

जगाच्या इतिहासावर विलक्षण ठसा उमटवणार्‍या बोल्शेविक क्रांती तसेच अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती या क्रांतिकारक घटनांप्रमाणेच ऑगस्ट क्रांतीलाही विशेष महत्त्व आहे. वसाहतवादी सत्तेला या क्रांतीने हादरे दिले. चले जाव चळवळीने इंग्रजांच्या शोषक प्रवृत्तीविरुद्ध जागतिक पातळीवर जागृती घडवली. हिंदुस्थानातील जनता जागृत झाली आहे ती कुठल्याही क्षणी इंग्रजी सत्तेला सुरुंग लावू शकते हे लक्षात घेऊन आपण हिंदुस्थानातून काढता पाय घेतला पाहिजे आणि हिंदुस्थानातील जनतेवर स्वातंत्र्य देऊन जबाबदारी टाकली पाहिजे, अशी खात्री इंग्रजांना पटली.

म्हणजे महात्मा गांधी यांनी वर्धा येथे ठराव करून बापू कुटीमध्ये घेतलेला चलेजाव चळवळीचा क्रांतिकारक ठराव अशा प्रकारे मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर सफल झाला. त्यामुळे या मैदानाचे नाव पुढे आझाद क्रांती मैदान किंवा ऑगस्ट क्रांती मैदान असे ठेवले गेले. 9 ऑगस्ट 1942 भारतीय इतिहासाने एक तेजस्वी सुवर्णबिंब पाहिले आणि या सूर्याने स्वातंत्र्याचा मंगलक्षण समीप आणला असेच आपणास या लढ्याचे वर्णन करता येईल.

ऑगस्ट क्रांतीने चलेजावची घोषणा केली; पण आधुनिक भारताच्या विकासासाठी भ्रष्टाचार, महागाई, दहशतवाद इत्यादींपासून आपण मुक्‍त होण्याची गरज आहे. व्यवस्थेत असलेले दोष दूर केले पाहिजेत. जेणेकरून शोषणमुक्‍त कृषी औद्योगिक समाज आपण निर्माण करू. स्वातंत्र्याचे स्वप्न साकार करू. स्वातंत्र्याचे स्वराज्य, सुराज्य आणि रामराज्यात रूपांतर करणे हीच ऑगस्ट क्रांतीमध्ये बलिदान दिलेल्या हुतात्म्यांसाठी खरी आदरांजली ठरेल. ऑगस्ट क्रांतीचा इतिहास आजही तितकाच प्रेरक आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news