निपाणी : चोरट्यांची पळताभुई थोडी, आपली गाडी सोडली आणि दुसऱ्याची नेली

निपाणी : चोरट्यांची पळताभुई थोडी, आपली गाडी सोडली आणि दुसऱ्याची नेली
Published on
Updated on

निपाणी ; पुढारी वृत्तसेवा : निपाणी शहर व उपनगरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, गुरुवारी पहाटे तीन ते चार या वेळेत प्रगतीनगरमध्ये दाेन ठिकाणी सराईत चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला. दरम्यान, एका विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. यावेळी पोलिसांना वेळीच पाचारण करण्यात आले. दरम्यान, चोरट्यांनी घटनास्थळीच आपली दुचाकी सोडून पळ काढला, मात्र चोरट्यांनी जाता जाता आंदोलन नगरमधील आकाश पाटील यांच्या मालकीची दारात उभी केलेली दुचाकी लांबवली.

दरम्यान चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून पोलिसांनी ताब्यात मिळालेल्या दुचाकीसह हत्यार व अन्य साहित्याच्या आधारे चोरट्यांचा कसून तपास चालवला आहे.पहाटेच्या दरम्यान या घडलेल्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रगतीनगर येथील कै. डॉ. प्रशांत चिकोर्डे यांचे हॉस्पिटल डॉ.प्रमोद निळेकर चालवतात डॉ. चिकोर्डे यांच्या दुमजली घराच्या तळमजल्याच्या दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करीत असताना या घरासमोर असलेल्या दुमजली इमारतीमध्ये अभ्यास करण्यासाठी बसलेल्या विद्यार्थ्याच्या ही बाब लक्षात आली. त्याने याची माहिती तातडीने डॉ. निळेकर यांना दिली. यावेळी डॉक्टर निळेकर यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. दरम्यान, चोरट्यांनी पोलीस घटनास्थळी येताच, दरवाजा उघडण्यासाठी लागणारी कटावणी,दुचाकी इतर साहित्य तसेच पायातील चप्पल टाकून पळ काढला.

पोलिसांचा बराच अंतरापर्यंत पाठलाग

यावेळी पोलिसांनी त्यांचा बराच अंतरापर्यंत पाठलाग केला. मात्र चोरटे पळून गेले. दरम्यान याच परिसरातील अविनाश दिवाकर यांच्या तीन मजली अपार्टमेंटमध्ये चोरट्यानी प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला.मात्र तो अयशस्वी ठरला. यावेळी चोरट्यांनी या अपार्टमेंटमध्ये राहात असलेल्या पत्रकार मधुकर पाटील यांच्यासह इतर सहा जणांच्या फ्लॅटचे दरवाजे ठोठावले. तसेच समाेर राहत असलेल्या माजी नगरसेवक राजेंद्र बेळसकर यांच्या दरवाज्याच्या बाहेर लावण्यात आलेले कापडी पडदे लांबवून पोबारा केला.

यामध्ये या अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे सात मिनिटे चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आले.ही बाब गुरुवारी सकाळी बेळसकर यांच्या लक्षात आली. त्यानुसार बेळसकर यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर, हवालदार प्रवीण किल्लेदार यांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून मिळालेल्या दुचाकीच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध जारी ठेवला आहे.

निपाणी : आता तरी प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे…

 दुमजली घरात अभ्यासासाठी रात्री बसलेल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने तातडीने याची माहिती डॉ. निळेकर यांना दिली. यावेळी त्यांनी तातडीने पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले.यावेळी पोलीसही तत्परतेने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरट्यांनी सोडून दिलेली दुचाकी, हत्यार व इतर साहित्य ताब्यात घेतले. असे असले तरी गेल्या तीन महिन्यात निपाणी व परिसरात 30 ठिकाणी घरफोड्या झाल्या असून पोलिसांनी मिळालेल्या दुचाकी व इतर साहित्याच्या आधारे चोरट्यांना वेळीच अटक करून नागरिकांना सुरक्षितता प्राप्त करून द्यावी, अशी मागणी शहरवासीयातून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news