वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग धुंडाळणार्या 'नासा'च्या क्युरिओसिटी रोव्हरने एका प्राचीन सरोवराचा शोध घेतला असून या ग्रहावर कधीकाळी पाण्याचे अस्तित्व होते, याचा ठोस पुरावा यानिमित्ताने हाती लागल्याची माहिती 'नासा'ने नुकतीच दिली. हा पुरावा खडकावर पाण्याचा प्रवाह आदळून त्याच्या रचनेत होणार्या बदलांच्या स्वरूपात आहे.
मंगळावरील ज्या दुर्गम भागात काही असेल, अशी कल्पनाच कोणी केली नाही. त्याच ठिकाणी आढळलेल्या खडकांच्या बनावटीवरून तेथे कधीकाळी मोठ्या प्रमाणात पाणी अस्तित्वात होते, असे संकेत मिळतात, असे नासाने म्हटले आहे. नासाने याबाबत एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की, क्युरिओसिटी रोव्हर सध्या माऊंट शार्प या तीन मैल उंचीच्या पर्वताच्या पायथ्याशी भ्रमण करीत आहे. कधीकाळी हा पर्वत पाण्याच्या मोठ्या स्रोताने व्यापला होता. त्याच्या पायथ्यापासून अर्धा मैल वर खडकांची वेगळी रचना आढळून आली. पाण्याचा प्रवाह आदळून त्याच्या मूळ रचनेत हा बदल झाला आहे. याठिकाणी अब्जावधी वर्षांपूर्वी असलेल्या एका सरोवरात या लाटा उसळत असाव्यात, ज्यामुळे या खडकांवर त्याच्या खुणा निर्माण झाल्याचे नासाने म्हटले आहे.