वॉशिंग्टन ः 'नासा'चे 'व्होएजर-1' हे यान सध्या आपल्या सौरमालिकेची सीमा भेदून पुढे जात आहे. 45 वर्षांपूर्वी हे अंतराळ यान पाठवण्यात आले होते. या यानाच्या मोहिमेतून सौरमंडळातील अनेक प्रकारची माहिती संशोधकांना मिळालेली आहे. मात्र, आता हे यान विचित्र डेटा पाठवत आहे. त्यामुळे वैज्ञानिक चकीत झाले आहेत.
'नासा'ने म्हटले आहे की व्होएजर-1 मध्ये कोणताही बिघाड झालेला नाही. हे यान चांगल्याप्रकारे काम करीत असून त्याचा अँटेनाही पृथ्वीच्या दिशेने आहे. मात्र, हे यान आता आपल्या स्थानाबाबत वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज पाठवत आहे. हे मेसेज अन्य डेटाशी मिळते-जुळते नाहीत. हा डेटा 'नासा'साठी गरजेचा आहे कारण त्याच्या मध्यमातूनच ते पृथ्वीच्या योग्य दिशेकडे यानाचा अँटेना ठेवू शकतात.
'नासा'च्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या एक प्रोजेक्ट मॅनेजर सुझान डॉड यांनी सांगितले की 'व्होएजर-1'चे हे मेसेज खरोखरच रहस्यमय असे आहेत. त्याची 'एएसीएस' सिस्टीम योग्य माहिती देत नाहीये. 'एएसीएस' हे त्याच्या ठावठिकाण्याची माहिती देण्याबरोबरच अन्यही काही महत्त्वाची कामे करते. त्यापैकी एक काम म्हणजेच यानाचा अँटेना पृथ्वीच्या दिशेने ठेवणे हे आहे. 'एएसीएस' सध्या काम करीत असला तरी तो एरर असलेला डेटा पाठवत आहे.
त्यामध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 'व्होएजर-1' ला 1977 मध्ये लाँच करण्यात आले होते. हे यान 2012 मध्ये आपल्या सौरमंडलातून बाहेर पडून पुढच्या अंतरीक्षात पोहोचले होते. 'व्होएजर-1' ही अशी एकमेव मानवनिर्मिती वस्तू आहे जी पृथ्वीपासून सर्वाधिक दूर अंतरावर आहे. सध्या हे यान पृथ्वीपासून 23 अब्ज किलोमीटरवर आहे. हे अंतर इतके मोठे आहे की पृथ्वी आणि व्होएजरपासून एक मेसेज येण्यास व तो पुन्हा व्होएजरकडे पाठवण्यास 48 तासांचा वेळ लागतो.