नाशिक : कुटुंबाने साजरा केला मुलीचा प्रथम मासिक पाळी महोत्सव, राज्यभर होतेय चर्चा

मासिक पाळी महोत्सव
मासिक पाळी महोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मासिक पाळी शब्द काढला, तरी त्यावर संकोचाने बोलले जाते. त्याबाबत बर्‍याच अंधश्रद्धा, गैरसमजुती आहेत. पण, या सर्वांना छेद देण्याचे काम नाशिकच्या चांदगुडे दाम्पत्याने केले. आपल्या लेकीचा सन्मान व्हावा, तिच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होऊ नये आणि मासिक पाळीबाबतचा समाज दृष्टिकोन बदलावा, यादृष्टीने चांदगुडे दाम्पत्याने लेकीचा मासिक पाळी महोत्सव साजरा केला.

या उपक्रमाची चर्चा समाजमाध्यमातून राज्यभर होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा व अ‍ॅड. विद्या चांदगुडे यांची 13 वर्षांची मुलगी यशदा हिला परवा प्रथमच मासिक पाळी आली. त्यानिमित्ताने महामार्गावरील एका हॉटेलमध्ये तिच्या प्रथम मासिक पाळीचे आयोजन करण्यात आले होते. 'आता माझी पाळी, मीच देते टाळी' हे घोषवाक्य घेऊन उपक्रम राबविला गेला. 'मासिक पाळी' या विषयावर समाजबंध संस्थेचे कल्पेश जाधव यांनी व्याखानाद्वारे जनजागरण केले. या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा, यासाठी या महोत्सवात 'कोश' हा लघुपट दाखवला गेला. यावेळी 'मासिक पाळी' या विषयावर संदेश देणारी गाणी व कविता सादर करण्यात आल्या. संत वाङ्मयातील रचनांमध्ये सापडणार्‍या अभंगांचे सादरीकरण करण्यात आले.

'मासिक पाळी' या विषयावर महिला व पुरुषांचे चर्चासत्र झाले. यात डॉ. टी. आर. गोराणे, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे, जयश्री पाटील, अ‍ॅड. विद्या चांदगुडे, प्रथमेश वर्दे आदींनी सहभाग नोंदवला. यावेळी 'प-पाळीचा' ही पुस्तिका वितरित करण्यात आली. किरण चांदगुडे यांनी सूत्रसंचालन केले, तर अ‍ॅड. समीर शिंदे यांनी आभार मानले. सॅनिटरी पॅडचे वाटप गरजू मुलींना करण्यात आले.

समाजात मासिक पाळीसंदर्भात खूपच गैरसमजुती, अंधश्रद्धा आहेत. आमच्या मुलीला प्रथमच मासिक पाळी आल्यानंतर प्रबोधनासोबत प्रत्यक्ष कृतीची जोड देण्याची गरज होती. म्हणून प्रथम मासिक पाळीचे नियोजन आम्ही केले. त्यातून लोकांना सकारात्मक दृष्टिकोन मिळाला.
– कृष्णा चांदगुडे,
यशदाचे वडील

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news