‘नारायण राणेंचे वय झाले त्यांनी आता वानप्रस्थाश्रमाला जावं’

‘नारायण राणेंचे वय झाले त्यांनी आता वानप्रस्थाश्रमाला जावं’

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : देशातील चार प्रमुख शंकराचार्यांनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावर बहिष्कार टाकल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे संतापले. शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय योगदान दिले, असा प्रश्न त्यांनी केला आणि त्यावरून वादळ उठण्यापूर्वीच त्यांना घूमजाव करावे लागले.

सर्वोच्च धर्मगुरू असे स्थान शंकराचार्यांचे हिंदू धर्मात आहे. आदि शंकराचार्यांनी देशात चार पीठं स्थापन केली असून या पीठांचे प्रमुख शंकराचार्य म्हणून ओळखले जातात. कर्नाटकातील श्रृंगेरी मठाचे शंकराचार्य भारतीतीर्थ महाराज, ओडिशातील पुरीच्या गोवर्धन मठाचे शंकराचार्य निश्चलानन्द सरस्वती महाराज, गुजरातमधील द्वारका येथील शारदा मठाचे शंकराचार्य सदानंद महाराज, उत्तराखंड येथील बदरिका येथील ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज यांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी न लावण्याचा निर्णय घेतला आहे. निश्चलानन्द सरस्वती महाराज आणि अविमुक्तेश्वरानंद महाराज या दोन शंकराचार्यांनी माध्यमांसोबत बोलताना राम मंदिर अपूर्ण असताना तेथे रामाची प्राणप्रतिष्ठा होणे हे धर्मशास्त्राला अनुसरून नसल्याचे म्हटले आहे. चार शंकराचार्यांनी एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आव्हान दिल्याचे चित्र उभे राहिल्याने राणेंनी या शंकराचार्यांचेच योगदान विचारले.

शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्यावर टीका करावी? म्हणजे हे शंकराचार्य आमच्या भाजपला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहत आहेत. राजकीय दृष्टिकोनातून नव्हे तर राम आमचा देव आणि दैवत आहे त्यासाठी हे सर्व केले जात आहे. त्यामुळे शंकराचार्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. त्यांनी जीवनात हिंदू धर्मासाठी काय योगदान दिलं? हे त्यांनी सांगावं. जे योगदान हिंदू धर्मासाठी रामाने दिले, ते त्यांनी दिलं आहे का? असे सवाल राणेंनी केले.

या वक्तव्यांवर चौफेर टीका सुरू होताच संध्याकाळी राणेंनी आपण असे म्हटलेच नसल्याचा दावा करून घूमजाव केले. पत्रकारांनी आपल्या विधानांचा चुकीचा अर्थ लावला, असा दावाही त्यांनी केला.

राणेंनी आता वानप्रस्थाश्रमाला जावं

शंकराचार्यावर तोंडसुख घेणारे नारायण राणेसारखे लोक हिंदू धर्म भ्रष्ट करत असून हे लोकच हिंदू धर्माला कलंक आहेत. शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या श्रीमान नारायण राणे यांचे तरी काय योगदान? असा हल्ला चढवित राणेंचे वय पाहता त्यांनी आता वानप्रस्थाश्रमाचा मार्ग धरावा, असा खोचक सल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राणेंना दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news