नामचीन आठ गुंडांच्या टोळ्या सांगलीत दाखल www.pudharinews.
नामचीन आठ गुंडांच्या टोळ्या सांगलीत दाखल www.pudharinews.

नामचीन आठ गुंडांच्या टोळ्या सांगलीत दाखल

Published on

सांगली ः सचिन लाड खून, खुनाचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यातील आठ नामचीन गुंडांच्या टोळ्या सांगलीत दाखल झाल्या आहेत. यामध्ये सचिन सावंतसह 40 जणांचा समावेश आहे. न्यायालयात त्यांच्याविरुद्ध असलेले खटले सुरू झाल्याने या सर्वांना कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून येथे आणण्यात आले आहे. त्यामुळे सांगलीचे कारागृह 'हाऊसफुल्ल' झाल्याने सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या पाच वर्षात सांगलीतील गुन्हेगारीचा आलेख नजरेत भरण्यासारखा आहे. सातत्याने गुन्हेगारीत चढ-उतार राहिला आहे. एकमेकांचा खुनाचा बदला घेण्यासाठी 'गेम' केल्याच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. अनेक गुंडांचा परस्पर विरोधातील टोळ्यांनी खात्मा केला आहे.

'खून का बदला खून', असे सुडाने पेटून खुनाची मालिकाच सातत्याने सुरू आहे. यातून अनेक गुन्हेगार पोलिसांच्या रेकॉर्डवर आले. पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिस कोठडी झाल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. परस्परविरोधी टोळ्यातील गुंड सांगलीच्या कारागृहात आल्याने सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यांच्यामध्ये हाणामारी होऊ नये, यासाठी कारागृह प्रशासनाने सराईत गुंडांच्या टोळ्यांची कोल्हापुरातील कळंबा कारागृहात रवानगी करावी, अशी विनंती जिल्हा न्यायालयात केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य केली. सराईत टोळ्यातील दीडशेहून अधिक गुंडांची कळंबा कारागृहात रवानगी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यानुसार गेल्या पाच वर्षात टोळीयुद्धातून जे खून झाले; त्यामधील सर्व गुंडांना कळंबा कारागृहात हलविले. या गुंडांविरुद्ध न्यायालयात खटले सुरू झाले आहेत. त्यांना दररोज कळंबामधून येथील न्यायालयात आणणे शक्य नाही.

यासाठी आठ टोळ्यांना खटले सुरू असेपर्यंत सांगलीच्या कारागृहात आणण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयात केली होती. न्यायालयाने ही विनंतीही मान्य केली. त्यानुसार आठ टोळ्यांना नुकतेच येथे आणणण्यात आले आहे. आठ टोळ्यांमध्ये सचिन सावंतसह 40 जणांचा समावेश आहे. त्यांना जिल्हा कारागृहातील वेगवेगळ्या बरॅकमध्ये ठेवण्यात आले आहे. बरॅकजवळ बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. या टोळ्या सांगलीत आल्यानेे त्यांच्या साथीदारांची कारागृह परिसरात ये-जा सुरू झाली आहे. भेटायचा प्रयत्न केला जात आहे. नातेवाईकही भेटीसाठी अर्ज करीत आहेत.

  1. विविध गुन्ह्यातील 40 गुंडांना न्यायालयाच्या सुनावणीसाठी जिल्हा कारागृहात आणण्यात आले आहे. पोलिस संरक्षणार्थ त्यांना सुनावणीसाठी न्यायालयात नेले जात आहे. – राजेंद्र खामकर, अधीक्षक सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृह

क्षमता ओलांडली : धोका वाढला

जिल्हा कारागृहाची 235 कैद्यांची क्षमता आहे. पण वाढत्या गुन्हेगारीमुळे कारागृहाने क्षमता ओलांडली आहे. सध्या 290 कच्चे कैदी आहेत. यामध्ये नऊ महिलांचा समावेश आहे. दोन वर्षापूर्वी 423 कैदी होते. त्यामुळे सातत्याने सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होतो. क्षमता ओलांडली असल्याने धोकाही वाढला आहे. डोळ्यात तेल घालून सुरक्षा रक्षकांना ड्युटी करावी लागत आहे.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news