मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : नाणार येथे रिफायनरी उभारण्यास होत असलेला विरोध पाहता हा प्रकल्प राजापूरच्याच बारसू येथे हलविण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे दिला आहे. मात्र त्यावर अद्याप केंद्राने कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्थानिकांच्या विरोधामुळे नाणार येथे रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर हा प्रकल्प कोकणातच इतर ठिकाणी करण्यासाठी जागेची शोधाशोध सुरू झाली होती. त्यानुसार बारसू आणि सोलगाव या दोन गावांतील जागांचा पर्याय सांगण्यात आला. त्यापैकी बारसूच्या जागेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना 12 जानेवारी रोजी पत्र लिहून या गावात प्रकल्प उभारण्याची तयारी दाखविली आहे. बारसू येथेच प्रकल्प का? याबाबतही पत्रात माहिती देण्यात आली आहे..
बारसूतील 14 हजार एकर जागा प्रकल्पाला दिली जाऊ शकते. क्रूड ऑईल टर्मिनलसाठी नाटे गावात 2 हजार 144 एकर जागा देणार. रिफायनरीला दिली जाणारी बारसूतील 90 टक्के जागा ही पडीक आहे. त्यामुळे वाड्या वस्त्यांच्या स्थलांतराचा प्रश्न येणार नाही. आरआरपीसीएल टीमचाही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद असून उद्योग मंत्र्यांसह सरकारच्या प्रतिनिधींचाही बारसूतील स्थानिकांशी संवाद झाला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
नितेश राणे यांचा विरोध
बारसू गावाच्या पर्यायाला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विरोध केला आहे. ग्रीन रिफायनरी केंद्राची आहे. ती जिथे ठरली आहे तिथेच होईल. बारसूची चर्चा केवळ शिवसेना आणि राज्यातील मंत्र्यांनी सुरू केली असून ही चर्चा त्यापुरतीच आहे. नाणारमध्ये ज्या गावांचा विरोध होता त्या गावांना वगळून प्रकल्प होणार आहे. प्रमोद जठार यांच्या नेतृत्वात दिल्लीत जाऊन नाणार प्रकल्पाबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करू, असे नितेश राणे यांनी सांगितले आहे.