नाट्य आणि चित्रपटगृहे यांचा पडदा २२ ऑक्टोबरला उघडणार

नाट्य आणि चित्रपटगृहे यांचा पडदा २२ ऑक्टोबरला उघडणार
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : येत्या 22 ऑक्टोबर रोजी राज्यातील नाट्य आणि चित्रपटगृहे खुली करण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी टास्क फोर्स, चित्रपट निर्माते आणि कलाकारांशी झालेल्या चर्चेत जाहीर केले.

नाट्य आणि चित्रपट गृहे खुली करण्यासाठी जाहीर करण्यात येणार्‍या मार्गदर्शक तत्त्वांकडे आता रंगकर्मींचे लक्ष लागले आहे. राज्य शासनाने अन्य राज्यांप्रमाणे मदतीचा हात दिला तरच एकपडदा चित्रपटगृहे सुरू करता येतील आणि भविष्यात तग धरतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर एकपडदा चित्रपटगृहे खुली केली जातील, अशी

भूमिका सिनेमा ओनर्स अ‍ॅन्ड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेत स्पष्टता नसल्याने येत्या 27 सप्टेंबर रोजी ठरल्याप्रमाणे पितृस्मृती आंदोलन करण्याच्या निर्णयावरदेखील रंगकर्मी ठाम आहेत.

गतवर्षीपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये चित्रपटांचे प्रदर्शन थांबले, नाट्यप्रयोगही बंद झाले. या क्षेत्रावर अवलंबून असलेले कलाकार, तांत्रिक कर्मचारी, चित्रपट व नाट्यगृह चालक, कर्मचारी आदींचा रोजगार बुडाला आहे. अन्य क्षेत्रे निर्बंधमुक्‍त होत असताना सरकारने चित्रपटगृहे आणि रंगमंदिरे मात्र बंदच ठेवल्याने गेल्या महिन्यात कलावंतांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मध्यस्ती करीत शनिवारी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणली.

वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्यक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याच बैठकीत चित्रपट व नाट्यगृह 22 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. त्यासाठी नियमावली तातडीने तयार करून त्या जाहीर करण्याचे आदेश त्यांनी दिले.

चित्रपटगृहे सुरू होणे, ही आनंदाची बातमी आहे, पण आता एकपडदा चित्रपटगृह सुरू करण्यासाठी आम्हाला शासनाच्या मदतीची गरज आहे. अन्य राज्यांप्रमाणे चित्रपटगृहांना शासनाने मालमत्ता करात, वीजबिलात सूट दिली तरच एकपडदा चित्रपटगृहे खुली होऊ शकतील. त्यासंदर्भात आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत.
– नितीन दातार, अध्यक्ष – सिनेमा ओनर्स

अ‍ॅण्ड एक्झिबीटर्स असोशिएशन ऑफ इंडिया
मंदिरे खुली करताना शासनाने गेल्या वर्षीचीच एसओपी कायम ठेवली आहे.त्याचप्रमाणे नाट्य आणि चित्रपटगृहांसाठी तशीच एसओपी असण्याची शक्यता आहे.
– आदेश बांदेकर, निर्माते व शिवसेना उपनेते

नाट्य आणि चित्रपटगृहे खुली करण्यासाठी रंगकर्मी म्हणून आभारी आहोत. परंतु आमचं आंदोलन केवळ रंगकर्मींसाठी नाही, शासनाने सांस्कृतिक क्षेत्र पूर्णपणे खुले करण्याचे आदेश द्यावेत अशी आमची मागणी आहे.
– हरी पाटणकर, सचिव, नाट्य व्यवस्थापक संघ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news