नागपूरमधील मशिदींवर नियमानुसार भोंगा वाजला !

नागपूरमधील मशिदींवर नियमानुसार भोंगा वाजला !

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील २८३ तर, ग्रामीण भागातील १०८ मशिदीत आज पहाटे फजरची नमाज झाली, पण आवाजाची मर्यादा पाळतच. काही मशिदीत आज भोंग्यांचा आवाज कमी करत नमाज देण्यात आली. नागपुरातील सर्वात मोठी असलेल्या जामा मशीद येथेही सकाळच्या नमाजच्या वेळेस भोंग्याचा आवाज कमी करण्यात आला होता. सध्या नागपुरातील जामा मशीद परिसरात शांतता आहे. नागपुरातील जामा मशिदीसह इतर मशिदीमध्ये भोंगे कायम होते. नियमानुसार आवाज कमी करून अजान झाली. पहाटेच्या वेळी भोंगे वाजले. पण, आवाजाची मर्यादा पाळल्याचं दिसून आलं.

मशिदींवरील भोंगा उतरविण्यासाठी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी ४ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. मात्र त्यानंतर कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास पोलिस सज्ज झाले आहेत. पोलिसांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यादी तयार केली आहे. तसेच त्यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. शहरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना थेट कोठडीत डांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले आहे.

नागपुरात पोलिसांच्या परवानगीनेच आंदोलन करणार असल्याची मनसेची भूमिका आहे. ३२ ठिकाणी हनुमान चालिसा पठणासाठी मनसेने पोलिसांकडे अर्ज केलाय. पोलिसांकडून अद्याप एकाही ठिकाणी हनुमान चालिसा पठणासाठी परवानगी दिलेली नाही. शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी स्थानिक पोलिसांशिवाय दोन हजार पोलिसांचा अतिरिक्त ताफा विविध ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील ठिकाणांवरील गस्त वाढविण्यात आली आहे. वेळ पडल्यास बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहितीही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

पोलिस अलर्ट मोडवर असून, पदाधिकाऱ्यांनाही कायदा हातात न घेण्याची विनंती करण्यात आली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करू, असे आश्वासन मनसे पदाधिकाऱ्यांनी दिल्याचेही आयुक्तांनी सांगितले. शहरात २९३ मशिदी, १२०४ मंदिरे आणि ४०० बुद्धविहार आहेत. शासनाच्या आदेशानंतरच या धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत निर्णय घेण्यात येईल. कोणालाही महाआरतीसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. भोग्यांबाबत शासनाच्या आदेशानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news