नांदेड : भारत जोडो यात्रेत पुन्हा उत्साह संचारला

भारत जोडो यात्रा
भारत जोडो यात्रा

नांदेड ; पुढारी वृत्‍तसेवा : काँग्रेस सेवादलाचे ज्येष्ठ पदाधिकारी कृष्णकुमार पांडे यांच्या आकस्मिक निधनामुळे 'भारत जोडो यात्रे' वर मंगळवारी शोककळा पसरली होती; पण आज (बुधवार) सकाळी खा. राहुल गांधी आणि इतर यात्रींची पदयात्रा शंकरनगर येथून सुरू झाल्यावर नायगावपर्यंतच्या १० कि. मी. अंतराच्या पहिल्या टप्प्यात नेहमीचा उत्साह संचारला होता. ठिकठिकाणी राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले.

या टप्प्यात अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया तसेच चव्हाणांचे मेव्हणे, माजी खासदार भास्करराव खतगावकरांच्या स्नुषा डॉ. मीनल या दोघी हातात-हात घालून खा. गांधी यांच्यासोबत चालताना दिसल्या. त्यातून त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना 'हम साथ साथ है' चा संदेश दिला. या यात्रेच्या निमित्ताने श्रीजया चव्हाण यांच्या राजकीय पदार्पणावर शिक्कामोर्तब झाल्याचे खुद्द अशोक चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे जाहीर केले आहे.

शंकरनगर ते नायगाव या टप्प्यात पदयात्रा सुरू असताना, किनाळा, हिप्परगा माळ, नर्सी चौक येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले. नर्सी चौकात रवींद्र भिलवंडे यांचे स्वागत स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी अचानक तेथील नुरी फंक्शन हॉलला भेट दिली. तेथे त्यांनी थोडी न्याहरी केली. तेथून ही पदयात्रा खैरगावहून नायगाव शहरात दाखल झाली. हेडगेवार चौकात भारतयात्रींच्या स्वागतासाठी व्यासपीठ उभारण्यात आले होते; पण व्यासपीठावरील सर्व सोपस्कार टाळून राहुल गांधी विश्रांतीस्थळ असलेल्या कुसुम लॉन्सच्या दिशेने रवाना झाले.

नायगाव विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असला, तरी या शहरावर काँग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे वर्चस्व असून, पदयात्रा कुसुम लॉन्ससमोर आल्यानंतर तेथे सर्वांचे स्वागत करण्यात आले. सकाळच्या सत्रांमध्ये राहुल गांधीच्या पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माणिकराव ठाकरे, सतेज पाटील, जयराम रमेश या नेत्यांसह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे बुधवारी नांदेडहून नायगावला १० वाजण्याच्या सुमारास पोहोचले.

बुधवारी सकाळच्या सत्रातील पदयात्रेत खा. राहुल गांधी यांनी नेहमीप्रमाणे शाळकरी मुले, त्यांचे पालक यांच्याशी संवाद साधला. शहरी आणि ग्रामीण भागातील स्त्री-पुरूषांसह युवक-युवती व शालेय विद्यार्थी यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. 'नफरत छोडो, भारत जोडो' या घोषणेने १० कि.मी. चा परिसर आज दणाणून गेला होता.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news