चंदीगड ; वृत्तसंस्था : पंजाब राज्य सरकारने वाहतूक नियमांबाबत नवीन अधिसूचना जारी केली असून, याअंतर्गत दारू पिऊन वाहन चालवणार्याचा परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. संबंधित दोषी व्यक्तीला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये एकतर रुग्णसेवा किंवा मग एक युनिट रक्तदान करावे लागणार आहे.
नियम उल्लंघनाची पुनरावृत्ती केल्यास दुप्पट दंड भरावा लागेल. वाहतूक नियम मोडल्यास रिफ्रेशर कोर्स करावा लागेल व परिवहन प्राधिकरणाकडून तसे प्रमाणपत्रही घ्यावे लागेल. दोषी व्यक्तीला किमान 20 शालेय विद्यार्थ्यांना 2 तास वाहतुकीचे नियम शिकवावे लागतील. अतिवेग, वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे, ट्रिपल सीट, सिग्नल तोडणे आदी बाबींचा नियमभंगांमध्ये समावेश आहे. अतिवेगावर 1 हजार रुपये, दारू पिऊन गाडी चालवल्यास, गाडी चालवताना मोबाईल फोनवर बोलल्यास 5 हजार रुपये दंड आकारला जाईल.