वांगी, गवारपेक्षा सफरचंद स्वस्त

वांगी, गवारपेक्षा सफरचंद स्वस्त
Published on
Updated on

नवी मुंबई ; पुढारी वार्ताहर : किरकोळ बाजारात सर्वच भाज्या 20 रुपये पाव कि.च्या पुढे गेल्या असून, वांगी आणि गवारसाठी किलोला 120 रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागत आहेत. खरे तर भाज्या आणि फळांची तुलना होत नाही. मात्र, एरवी अत्यंत महाग वाटणार्‍या सफरचंदाचा दर 100 रुपये, 110 रुपये किलो असल्याने वांगी, गवारने सफरचंदापेक्षा जास्त भाव खाल्‍ला आहे.

वातावरणातील गारवा वाढू लागला की भूक वाढते. हिवाळा आरोग्यासाठी पोषक असल्याने सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक आहार या काळात घेण्याकडे अनेकांचा कल असतो. पावसाळा संपल्याने भाजीबाजारात वेगवेगळया भाज्यांची रेलचेल मोठ्या प्रमाणावर असते, परंतु दररोज बदलणारे हवामान, अलीकडे झालेला अवकाळी पाऊस यामुळे भाजीपाल्याची आवक कमी होत असल्याने दर कडाडले आहेत.

महिनाभरापूर्वी कमी झालेले भाजीचे दर पुन्हा 20 ते 30 रुपये पाव कि.च्या घरात पोहोचले आहेत. भाजी विक्रेते अनंता बोजहाडे यांनी सांगितले की, आवक कमी झाल्याने 200 ते 300 रुपयांत मिळणारे क्रेटचे दर आता दुप्पट-तिप्पट झाले. परिणामी भाज्या भडकल्या. प्रत्येक भाजीचे पाव कि.चे दर 20 रुपयांपुढे असून, गवार 40 रुपये, तर वांगी, भेंडी 30 रुपये पाव कि.ने विकली जात आहे.

किरकोळ दर (पाव किलोमध्ये)

वांगी 30 रुपये, टोमॅटो 15, बटाटे 05, कारले, गिलके, दोडके 20, सिमला 30, घेवडा 30, गावठी गवार 40, सुरती गवार 30, वाल शेंगा 30, फ्लॉवर आकारानुसार 20-40, पत्ता कोबी 30, हिरवे वाटाणे 20, गाजर 10, काकडी 10, तोंडली 20, शेवगा शेंगा 30, पालक 25, मेथी 30, कांद्याची पात 30, शेपू 25 ते 30, मुळा 20, कोथिंबीर 20, हिरवी मिरची 20 रुपये. याव्यतिरिक्त कांदा 40 ते 50 रुपये किलो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news