संगमनेर शहर, पुढारी वृत्तसेवा : स्पेनमध्ये झालेल्या जागतिक स्तरा वरील आयर्नमॅन स्पर्धेत संगमनेर येथील अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. संजय विखे, उद्योजक करण राजपाल व अमर नाईकवाडे या तिघांनी एका दिवसात 3.8 कि.मी. पोहणे, 180.2 सायकलिंग व 42.2 कि. मी. घावणे या स्पर्धेत विक्रम संपादित करीत संगमनेरचा डंका थेट स्पेनमध्ये वाजवीत अभिमानाने भारताचा तिरंगा फडकविला.
या वर्षीची आयर्नमॅन स्पर्धा स्पेन मधील विटेरिया गस्टेज या शहरात झाली. या स्पर्धेसाठी जगभरातून 3 हजार खेळाडू सहभागी झाले होते. भारतातील 5 खेळाडूंमधून संगमनेरच्या 3 खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या तिन्ही खेळाडूंनी पुणे बायपासवर सायकलिंग स्पर्धेचा सराव केला होता.
स्पेनमधील वेळेनुसार सकाळी 8.45 वाजता या तीन्ही स्पर्धकांनी पोहण्यास सुरुवात केली. डॉ. संजय विखे यांनी या स्पर्धेमध्ये आघाडी घेतली. अनेक शारीरिक व मानसिक आव्हानांचा सामना त्यांनी केला. पोहण्याची स्पर्धा संपल्यानंतर लगेच सायकलिंगला सुरुवात केली. साधारणत: 8 तासांमध्ये त्यांनी सायकलिंग पूर्ण केली. डॉ. संजय विखे यांनी 13 तास 58 मिनिटांमध्ये धावण्याची स्पर्धा पूर्ण केली. त्या तिघांनी जगभरात त्यांच्या वयोगटामध्ये 278 वा क्रमांक पटकाविला.
करण राजपाल यांनी ही स्पर्धा 13 तास 58 मिनिटांमध्ये पूर्ण केली. त्यामुळे त्यांच्या वयोगटात 107 वा क्रमांक आला. अमर नाईकवाडे यांनी ही स्पर्धा 14 तास 25 मिनिटांमध्ये पूर्ण केली. त्यांनी स्वतःच्या वयोगटात 156 वा क्रमांक पटकाविला. या खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.