द्रौपदीची थाळी…

द्रौपदीची थाळी…
Published on
Updated on

काय आक्‍का? कुठे निघालात एवढ्या लगबगीने?
साड्यांच्या सेलला हो मावशी. साड्या, ब्लाऊज, ड्रेसेस, मॅचिंग बूट, चपला, पर्सेस सगळंच जमवायला हवंय.
किस खुशीमें?

अहो, नगरसेविकेच्या पदासाठी लढायचंय ना? सारखं याला भेट, त्याला भेट, सभा, मीटिंगा, निवेदनं, आवाहनं, थोडं का काम असणार आहे? लोकांना सामोरं जाताना कसं टिपटॉप असायला हवं. शेवटी जनता लक्षात काय ठेवेल?
तुमच्या साड्यांचे काठ! पोलक्यांची मॅचिंगं! झालंच तर पर्सचा ब्रँड वगैरे वगैरे..!
टोमणे कळतात बरं मला!

टोमणे नाही. आता बाई म्हटल्यावर इतपत तरी नेत्रसुखद राहणी ठेवायला हवीच. कामं काय, होत राहतील पुढे-मागे.
आमच्या साहेबांनी तर बजावलंय, महिलांसाठी राखीव जागा नशिबाने आयती चालून आलीये, तिचं चीज कर.
म्हणजे ते सांगतील ते ऐक, असंच ना?

फार वरपर्यंत ओळखी आहेत त्यांच्या. आमच्या जाऊबाई फार कौतुक करतात त्यांचं. त्या सरपंच आहेत गावच्या. सरपंच झाल्यापासून फक्‍त पांढर्‍या साड्या नेसतात. शहापुरी असो, टसर सिल्क असो, नारायणपेठी असो, नाहीतर पैठणी असो, कलर पांढरा म्हणजे पांढराच ठेवणार त्या. साधेपणा दिसला पाहिजे लोकांना. आमच्या घराण्याची परंपराच आहे ती.
परंपरा आहे म्हणताय म्हणजे जपायला हवीच तुम्हाला.
नशिबाने जनतेच्या सेवेची संधी मिळतेय, सुटायला नको.

सेवेत आता काय कमी राहणार आहे? अहो, आता लवकरच द्रौपदीची थाळीच मांडली जाणार आहे बघा आपल्या सर्वांसाठी. न्यायाने मागाल ते सगळं मिळेल.
काय सांगता? उद्या एखाद्या बाईने राष्ट्रपती व्हायचं म्हटलं तरी मिळेल?
मिळू शकेल. फक्‍त त्यासाठी नवर्‍याच्या वरपर्यंतच्या ओळखी, मॅचिंग कपड्यांचा रुबाब, गुर्मीची भाषा वगैरेंचा काही उपयोग होणार नाही.
मग कशाचा उपयोग होईल?

सच्च्या आणि निरपेक्ष कामाचा.
भले! द्रौपदीची थाळीही म्हणता आणि कामही करायला लावता! तेही निरपेक्षपणे!
त्यांनी तसंच तर केलंय. अजून करताहेत.
कोण?

द्रौपदी मुर्मू मॅडम!
ऐकलं नाही त्यांच्याबद्दल फारसं.
ऐकवत सुटत नाहीत ना त्या? म्हणून. बाकी सिंचन खात्यात कारकून, शिक्षिका, नगरसेविका, आमदार, मंत्री, अशी एकेक पदं भूषवता भूषवता झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपालही होऊन गेल्या आहेत त्या.
एवढी पदं? नक्‍कीच वरपर्यंत कनेक्शनं असणार!
अगदीच नाही हो, मुळात बाई आदिवासी. घरातल्या पहिल्या महिला पदवीधर. प्रपंचात नाना दुःखांनी पोळलेल्या; पण कामामध्ये नेहमी नेक आणि चोख.

आमच्या साहेबांसारख्या म्हणा की!
त्यांच्या मागे कोणी साहेबही नाहीये. दोन मुलगे आणि नवरा यांनाही मुकल्या; पण कर्तव्याला कधी चुकल्या नाहीत.
कशावरून?

अहो, 21 जूनला राष्ट्रपतिपदासाठी नाव घोषित झालं, तरी 22 जूनला सकाळी रोजच्यासारख्या गावातलं शिवमंदिर झाडायला गेल्याच, हातात झाडू घेऊन.

बाई गं! किती ही निरलसता!
म्हणून तर म्हटलं. निरलस देशसेवेची द्रौपदीची थाळी लवकरच आपल्यासाठी वाढली जाणार आहे. तिच्यावर बसण्याआधी आपली फक्‍त हातात झाडू घेण्याची तयारी हवी. आपापली मनं, जीवनं असं करताकरता सगळा देश स्वच्छ करायची प्रतिज्ञा हवी. बघा जमतंय का?

– झटका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news