नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : दूरसंचार आणि डिजिटायझेशन क्षेत्रांत देश मोठी प्रगती करीत आहे. या माध्यमातून दळणवळण यंत्रणा मजबूत करण्यात येत आहे. सध्या देशात फोर-जी सेवा सुरू आहे. आगामी सहा 6 महिन्यांत, म्हणजेच एप्रिल-मे महिन्यापर्यंत देशभरात ५-जी सेवा देण्यासाठीची लिलाव प्रक्रिया राबवण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली.
एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. लिलाव प्रक्रियेसाठीचे नियम आणि इतर बाबी ट्रायकडून निश्चित केल्या जातील. ही प्रक्रिया पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच ५-जी सेवा साठीची लिलाव प्रक्रिया राबवण्यात येईल. ही प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी आम्ही आग्रही असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
वैष्णव यांनी येत्या दोन ते तीन वर्षांत भारतात दूरसंचार क्षेत्रांत वेगाने बदल होतील, असे सांगितले. त्यातील नियमांमध्येही पूर्णपणे बदल होणार असून ते जागतिक स्तरावरील मानकांनुसार असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.