देशभर वाजतोय महिब्याचा डंका; रातोरात बनला स्टार

देशभर वाजतोय महिब्याचा डंका; रातोरात बनला स्टार

वारणावती; आष्पाक आत्तार : अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि भाळवणी येथील बैलगाडी शर्यतीतील थार गाडीचा विजेता कोण होणार, या पडलेल्या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळाला आहे. कराड तालुक्यातील रेठरे खुर्द येथील प्राथमिक शिक्षक सदाशिव कदम यांचा महिब्या 'रुस्तम ए हिंद' चा मानकरी ठरला आहे. त्याने थार गाडीवर आपल्या मालकाचे नाव कोरून महाराष्ट्रभर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

महिब्या या अवघ्या दोन वर्षाच्या बैलाने आजवर अनेक विक्रम करत महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर नाव कमावले आहे. अवघ्या 39 हजार रुपयात सदाशिव कदम यांनी या वासराला दोन वर्षांपूर्वी घेतले होते. सदाशिव कदम व त्यांच्या पत्नी दोघेही शिक्षक त्यामुळे घरी या वासराचा सांभाळ कोण करणार? त्याला कोण शिकवणार? म्हणून त्यांनी काले येथील संभाजी ड्रायव्हर यांच्याकडे सोडले. त्यांनी याला तरबेज केले. अवघ्या नवव्या महिन्यातच त्याने नंबर घ्यायला सुरुवात केली. आजअखेर अनेक मैदाने त्याने गाजवली आहेत. जेथे जाईल तेथे गुलाल घेऊनच तो परतला आहे. नुकत्याच भाळवणी येथे झालेल्या देशपातळीवरील स्पर्धेत तर त्याने मुळशीच्या बकासूरसोबत प्रथम क्रमांक मिळवून देशभर आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.

विक्रमवीर महिब्याविषयी जाणून घेण्यासाठी त्याचे मालक सदाशिव कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दोन वर्षांपूर्वी आमचा एक मित्र बेंगलोर येथून बैल घेऊन यायचा. कारखान्यावर आणून विकायचा. तिथेच मी हा खोंड घेतला होता. आजपर्यंत त्याने मला पाच मोटरसायकल व लाखो रुपयांची बक्षिसे मिळवून दिली आहेत. त्याची वाढती क्रेझ पाहून एक कोटी दहा लाख रुपयांना मागणी झाली होती. मात्र मी त्याच्यावर जीवापाड प्रेम करतो, त्यामुळे त्याला जपत आहे. भाळवणीचे मैदान जिंकून त्याने देशभर माझे नाव केले आहे. मला याचा सार्थ अभिमान आहे.

कर्तृत्वाची छाप बैलावरही

महिब्याचे मालक सदाशिव कदम हे पेशाने शिक्षक आहेत. उत्कृष्ट क्रीडा शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक आहे. आजवर अनेक खेळाडू, विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत. महिब्यालाही त्यांनी मोठ्या कष्टाने घडविले आहे. त्यामुळेच 19 लाखांची थार गाडी त्याने मिळवली आहे. सध्या समाज माध्यमातून महिब्या आणि मालक सदाशिव कदम यांचीच चर्चा सुरू आहे. एकूणच भाळवणीच्या मैदानाने या दोघांनाही यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news