सोलापूर : देवळेत गायीच्या दुधात निळीची भेसळ

सोलापूर : देवळेत गायीच्या दुधात निळीची भेसळ

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : देवळे (ता. सांगोला) येथे गायीच्या दुधात निळीच्या भेसळीद्वारे फॅट वाढवून म्हशीचे असल्याचा बनाव करणार्‍या भेसळ सम्राटाचा अन्न-औषध प्रशासनाने छापा टाकून पर्दाफाश केला. याप्रकरणी संबंधित व्यावसायिकासह साथीदाराविरोधात सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय संबंधित दुग्ध व्यावसायिकाचा परवानाही रद्द करण्यात आल्याचे सहायक आयुक्त प्रदीपकुमार राऊत यांनी सांगितले.

देवळे येथील रणजित शिवाजी व्हनमाने (भागीदार) यांच्या मालकीच्या मे. विठाई मिल्क फूड प्रॉडक्टस् या फर्ममध्ये दूध भेसळ होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार 23 सप्टेंबर रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाने पेढीवर धाड टाकून तपासणी केली.

यावेळी तपासणीदरम्यान पेढीमध्ये दूध भेसळीकरिता नीळच्या अर्धा लिटरच्या 10 सिलबंद बॉटल आढळून आल्या. तसेच पेढीच्या बाजूला असलेल्या युवराज भगवान अलदार (भागीदार) यांच्या घराची तपासणी केली असता त्याठिकाणी एका खोलीमध्ये व्हे पावडरच्या 25 किलोच्या तीन बॅग आढळून आल्या.

याबाबत रणजित व्हनमाने (भागीदार) यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात आली. त्यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला. गाय दुधामध्ये टाकून गायीमध्ये नीळ घालून दुधास म्हशीच्या दुधासारखा पांढरा रंग करीत भेसळ सुरू असल्याचे कबूल केले. यावरून मे. विठाई मिल्क फूड प्रॉडक्ट्स या पेढीत भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले.

या ठिकाणाहून गाय दूध तसेच व्हे पावडर व निळीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. उर्वरित आठ हजार रुपयांचे 298 लीटर गाईचे दूध नष्ट करण्यात आले. यावेळी 12 हजार किमतीचे व्हे पावडर – 74 किलो व 540 रुपयांच्या नीळ बाटल्या असा एकूण 20 हजार 660 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी मे. विठाई मिल्क फूड प्रॉडक्ट्सचे भागीदार रणजित व्हनमाने व इतर 5 भागीदार तसेच सदर पेढीकडून भेसळयुक्त दुध स्विकारुन भेसळीस हातभार लावणारी पेढी मे. चैतन्य संकलन केंद्र,पंढरपूर, तसेच व्हे पावडर पुरवठा करणारी पेढी मे. श्री बालाजी ट्रेडर्स,जयसिंगपूर (ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर) यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

ही कारवाई सोलापूरचे सहायक आयुक्त प्रदीपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ज्ञानेश्वर महाले, अरविंद खडके, राम मुंडे, मिलिंद महागंडे, सातारा कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार, रोहन शहा, कोल्हापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे, महेश मासाळ, गणेश कदम व सोलापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी भारत भोसले, उमेश भुसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सणासुदीला भेसळीचा धोका अधिक

गणेशोत्सवापासून दसरा, दिवाळीच्या निमित्ताने मेवा, मिठाईची मोठ्या प्रमाणात मागणी असते. साहजिकच यासाठी दुधाची मागणीही वाढते; परंतु उपलब्ध दुधात वाढ करण्यासाठी कृत्रिम दूध निर्मितीद्वारे भेसळीचा कारभारही त्यानिमित्ताने फोफावण्याचा धोका अधिक वाढतो.

खव्यामध्ये मैद्याची, तुपात रव्यासह विविध प्रकारची भेसळ, मिठाईमध्ये अखाद्य रंगांचा वापर, एवढेच नव्हे तर दुधाच्या निर्मितीसाठी दूध पावडर, युरियासह रसायनांचा वापरही केला जातो. वास्तविक दूध संकलन करणार्‍या एखाद्या केंद्रावर रात्रीत दोन-अडीचशे लिटर दूध वाढते कोठून, याचा शोधही अन्न-औषध प्रशासनाकडून तपासण्यांद्वारे होण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news