दुचाकी अपघातात सावंतवाडीतील तरुण ठार

दुचाकी अपघातात सावंतवाडीतील तरुण ठार

Published on

सिंधुदुर्ग ; पुढारी वृत्तसेवा : चौके बाजारपेठ येथे शुक्रवारी रात्री झालेल्या दुचाकी अपघातात गणेश सुरेश भोसले (वय 26, रा. सावंतवाडी, न्यू सबनीसवाडा) हा तरुण जागीच ठार झाला, तर त्याच्या सोबत असलेला हरीश परब (रा. आचरा-डोंगरेवाडी) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास हा अपघात घडला. अपघाताची नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मालवण पोलिस ठाण्याचे निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनी दिली.

शुक्रवारी रात्री वरील दोन्ही तरुण मोटारसायकलने मालवणच्या दिशेने येत होते. चौके -बाजारपेठ येथील वळणावर स्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यालगतच्या दगडाला धडकली. यामुळे दुचाकीवरील दोन्ही स्वार रस्त्यावर फेकले गेले. अपघाताच्या आवाजाने स्थानिकांनी धाव घेतली असता रक्‍ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेले तरुण दिसून आले.

ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींनी तात्काळ रुग्णवाहिका बोलवली. मात्र, डोकीतून मोठ्या प्रमाणात रक्‍तस्त्राव झाल्याने गणेश भोसले याचा जागीच मृत्यू झाला. तर या दुचाकी अपघातात आचरा-डोंगरेवाडी येथील हरीश परब गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिस घटनास्थळी दाखल

अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या अपघात प्रकरणी जखमीचा जबाब नोंद व अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news