दीपोत्सव : प्राचीन परंपरा जपणारा वसुबारस

दीपोत्सव : प्राचीन परंपरा जपणारा वसुबारस

दीपोत्सव विशेष : गायीचे, तिच्या दुधाचे महत्त्व ऋग्वेदातील ऋचांमध्ये वर्णिले गेले आहे. गायीची प्रशंसा करताना म्हटले गेले आहे की, "दुर्बल मनुष्याला तुम्ही पुष्ट करता. तेजहीन माणसाला तुम्ही तेज प्रदान करता. तुमचे हंबरणे मंगलमय असते.

तुम्ही आमचे घरही मंगलमय करा."

दीपवाळी, दिवाळी किंवा दीपावली आपला आवडता सण! शरद ऋतूच्या मध्यावर, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकाळात दिवाळी येते. हा सण ज्या स्वरूपात साजरा केला जातो, त्याचे मूळ पौराणिक काळात आहे. कारण दिवाळीशी निगडित दिवसांशी जोडलेला कथाभाग पुराण ग्रंथांमध्ये आढळतो. अल्बेरूनी या विख्यात विद्वानाने भारतास भेट दिल्यानंतर जे विवेचन नोंदवून ठेवले, त्यात दीपावली सणाचा उल्लेख आहे. म्हणजे नऊशे वर्षांहून अधिक जुन्या काळापासून दीपावली साजरी करण्याची प्रथा दिसते. वेद, उपनिषदांनंतरच्या सूत्रकाळातील सामाजिक संदर्भाचा विचार करता असे दिसते की, अनेक गृह्य संस्कारांचे रूपांतर विविध भारतीय सणांमध्ये झाले. त्यानुसार पार्वण, आश्वयुजी आणि आग्रयण या तीन पाकयज्ञांचे एकत्रीकरण होऊन दीपावली प्रकाशू लागली.

दीपोत्सव म्हटल्यावर अर्थातच दिव्याला महत्त्व आहे. अग्नीच्या शुभ्र कळीचं कौतुक आहे. दीप या शब्दाची व्याख्या अशी आहे, "दीप्यते दीपयति वा स्वं परं चेति।" म्हणजे "जो स्वत: प्रकाशतो किंवा दुसर्‍याला प्रकाशित करतो, तो दीप होय." भारतीय परंपरेने दीपदान हे पुण्यकर्म मानले. दिव्यांच्या इतिहासातही फार रंजक गोष्टी मिळतात. अश्मयुगात केला गेलेला दिवा दगडात खोदून तयार केला गेलेला होता. त्याच्या खोलगट भागात प्राणिजन्य चरबी, शेवाळे किंवा तत्सम भिजणारा पदार्थ घालून तो पेटवत असत. भारतात अग्नीचे व प्रकाशाचे ज्ञान प्राचीन काळापासून होते. पेटते अग्निकुंड हा माणसाचा आधार असे. त्यातून अग्नीला देवाचे स्थान मिळाले. अग्नीचा शोध भृगू ऋषींनी लावला, असे मानले जाते. रामायण व महाभारत ग्रंथांमध्ये सोन्याचे, रत्नांचे दिवे किंवा दीपवृक्षांचा संदर्भ मिळतो. मोहंजोदडो येथील उत्खननात टांगण्याचे दिवे मिळाले आहेत. भारतात धार्मिक व प्रादेशिक भिन्नतेनुसार व काळानुसार दिव्यांचे अनेक प्रकार आढळतात. दिवाळीत महत्त्वाचे स्थान आहे ते मातीची पणती आणि आकाशदिवा यांना. आकाशदिवा पितरांना प्रकाश देतो, असे मानले जाते. पूर्वीच्या काळी दिव्याची वात पद्मसूत्र, दर्भगर्भसूत्र किंवा वाख यांपासून तयार केली जाई.

प्राचीन काळी पार्वण किंवा पिंडपितृयज्ञ नावाचा पाकयज्ञ केला जाई. पितरांच्या स्मरणासाठी यमतर्पण, दीपोत्सव असे. आश्विन महिन्याच्या पौर्णिमेस इंद्रास दूध आणि तांदळापासून केलेली खीर अर्पण केली जाई. असे वैदिक संदर्भावरून दिसते. गायीबद्दलच्या आदरासाठी तुपाच्या आहुती दिल्या जात. गाय व तिचे वासरू यांना एकत्र ठेवले जात असे. कृषिदेवता सीतेची प्रार्थना करण्यासाठी यज्ञ केला जाई. अशा विविध मुद्द्यांवरून दिवाळी हा पितरांप्रती आणि कृषी संस्कृतीप्रती आदर व्यक्त करण्याचा सण होता, हे स्पष्ट होते. वैदिक कृषिदेवतेची जागा पौराणिक काळात धनधान्याची देवता मानली गेलेल्या लक्ष्मीने घेतली. आग्रयण किंवा आग्रहायणी म्हणजे नवीन धान्याचे कौतुक करण्याचा उत्सव होता. गोधनाचे महत्त्व रेखित करणारा सण होता. प्राचीन काळाचे पडसाद आजही दिवाळीच्या सणात विखुरलेले आहेत. संस्कृतीचे सातत्य त्यातून सांभाळले जाते. मात्र, आजच्या माणसाने त्यास प्रदूषण आणि कुप्रथांचे गालबोट न लावता दिवाळीला सामाजिक भान देऊन जतन करायला हवे.

आकाशदिवा घरावर लखलखू लागल्यावर दिवाळीचा पहिला दिवस साजरा होतो तो वसुबारसेचा. आश्विन वद्य द्वादशी म्हणजे वसुबारस. या दिवशी सायंकाळी संवत्स गायीची पूजा केली जाते. नैवेद्य दाखविला जातो. त्यावेळी मंत्र म्हटला जातो, तो असा –

"तत: सर्वमये देवि सर्व देवै: अलंकृते ।
मात: मम अभिलषितं सफलं कुरू नन्दिनी ॥"
म्हणजे "हे सर्वात्मिक आणि सर्व देवांनी शोभित अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ पूर्ण कर."

गोवत्सद्वादशीला काही जण 'नन्दिनी व्रत' करतात. महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशात वसुबारस मोठ्या उत्साहात साजरी होते. गायीचे, तिच्या दुधाचे महत्त्व ऋग्वेदात वर्णिले आहे. गायीची प्रशंसा करताना म्हटले आहे की, "दुर्बल मनुष्याला तुम्ही पुष्ट करता. तेजहीन माणसाला तेज प्रदान करता. तुमचे हंबरणे मंगलमय असते. तुम्ही आमचे घरही मंगलमय करा." संस्कृत भाषेत मूळ धातू 'गुपू' म्हणजे 'राखणे' असा आहे. त्यावरून 'गोप' हा शब्द आला.

कृषी संस्कृतीचा गौरव

पितरांना म्हणजे गतकाळाला आदर देणे; निसर्गाचे व जीवजगताचे महत्त्व स्मरणे आणि कौटुंबिक नातेसंबंधांना उजाळा देऊन प्रेमाच्या धाग्यात बांधणे – असे पैलू असलेल्या दीपोत्सवाचे अप्रूप निश्चितच मोठे आहे.

– डॉ. सुरुची पांडे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news