दिव्यत्वाची प्रचिती!

दिव्यत्वाची प्रचिती!
Published on
Updated on

'दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!' असे आपण नेहमी म्हणत असतो. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राच्या सुवर्ण पदकासह भारतीय खेळाडूंनी सात पदकांची कमाई केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत पदकांचा दुहेरी आकडा गाठताना 'हम भी कुछ कम नही' असे दाखवून दिले. त्यातही अविना लेखरा आणि सुमित अंतील यांनी या यशावर सोनेरी साज चढवीत खर्‍या अर्थाने दिव्यत्वाची प्रचिती घडवली.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील नेत्रदीपक यशामुळे भारतात ऑलिम्पिकविषयक सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. आपल्या दिव्यांग खेळाडूंनी यशाचा हाच वारसा पुढे चालवीत भारतीय क्रीडा क्षेत्रात आणखीनच चैतन्य निर्माण केले आहे. सुदैवाने भारताच्या क्रीडा चाहत्यांना पॅरालिम्पिक स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारांचा थेट प्रक्षेपणाचा आनंद घेता आला.

दिव्यांग असलेल्या खेळाडूंना काय काय अग्निदिव्यातून जावे लागते याची कल्पना सर्वांना आलीच असेल. काही खेळाडूंना एक हात नाही, तर काहींना दोन्ही पाय नाहीत, काही खेळाडूंचे कृत्रिम पाय, पूर्ण अंधत्व किंवा अल्पदृष्टी अशा वेगवेगळ्या कारणांमुळे दिव्यांग झालेल्या खेळाडूंची कामगिरी सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी होती.

भारतीय खेळाडूंनीदेखील दिव्यांगत्वाच्या यातना सोसताना चेहर्‍यावर मात्र त्या वेदनांचा कुठेही लवलेश जाणवू दिला नाही. सतत चेहर्‍यावर आत्मविश्वास, आनंद, देशासाठी खेळण्याची निष्ठा आणि सकारात्मक ऊर्जा याचाच प्रत्यय घडविला आहे.

पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताची पदकांची कमाई यंदा विक्रमी ठरली आहे. सर्वसाधारण खेळाडूंप्रमाणेच दिव्यांग खेळाडूंना आर्थिक सहकार्य देताना केंद्र शासनाने आणि काही खासगी प्रायोजकांनी हात राखून ठेवला नाही. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने तयार केलेल्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम या योजनेतही काही दिव्यांग खेळाडूंना संधी मिळाली होती.

गो स्पोर्टस् फाऊंडेशन, ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट, लक्ष्य फाऊंडेशन आणि अन्य काही दानशूर संस्थांनीही दिव्यांग खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य केले होते. सर्वसाधारण खेळाडूंप्रमाणेच या खेळाडूंना परदेशी प्रशिक्षक, राष्ट्रीय प्रशिक्षक, खासगी प्रशिक्षक, फिजिओ, मानसिक तंदुरुस्ती तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ, क्रीडा वैद्यक तज्ज्ञ, पूरक व्यायामासाठी आवश्यक साधने अशा अनेक सुविधा देण्यात आल्या होत्या. काही खेळाडूंना यापूर्वीच चांगल्या नोकर्‍या मिळाल्यामुळे त्यांची भविष्याची चिंता मिटली होती.

कोरोनाच्या काळातही या खेळाडूंकरिता ऑनलाईन प्रशिक्षण सुविधा देण्यात आली होती. ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसाधारण खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेला जाण्यापूर्वी वैयक्तिकरीत्या भेट घेत शुभेच्छा दिल्या होत्या, तशाच शुभेच्छा त्यांनी दिव्यांग खेळाडूंनादेखील दिल्या होत्या. देशाचे पंतप्रधान वैयक्तिकरीत्या आपल्याला भेटून शुभेच्छा देतात तेव्हा आपल्यावर देशाचा नावलौकिक उंचावण्याची जबाबदारी आहे हे ओळखूनच दिव्यांग खेळाडूंनीही सर्वोच्च क्षमतेइतकी कामगिरी केली.

अवनीचा सोनेरी वेध

नेमबाजीत अभिनव बिंद्रा याने ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवत आपल्या देशात खर्‍या अर्थाने नेमबाजीचे युग निर्माण केले. त्याच्याकडून प्रेरणा घेत राजस्थानची खेळाडू अवनी हिने पॅरालिम्पिकच्या पदार्पणातच दहा मीटर्स एअर रायफलमध्ये सोनेरी वेध घेत स्वप्नवत् कामगिरी केली. वयाच्या अकराव्या वर्षी अपघातामुळे ती पायामध्ये विकलांग झाली. शालेय जीवनात मोठी स्वप्ने पाहात असतानाच असे दुर्दैव तिच्या वाट्यास आले. त्यामुळे ती दोन वर्षे नैराश्येतून बाहेर पडली नव्हती.

अखेर पालकांनी तिला अभिनव बिंद्राचे चरित्र वाचावयास दिले. तिला सुरुवातीला तिरंदाजीत करिअर करावेसे वाटले. पण आपणही बिंद्राप्रमाणेच सुवर्णपदकाचा वेध घ्यावा, असे स्वप्न पाहात तिने नेमबाजीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. महत्त्वाकांक्षेला अफाट कष्टाची जोड देत तिने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये चमक दाखवण्यास सुरुवात केली. तिला पालकांनीही सतत सर्वतोपरी सहकार्य केले.

पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर तिने महाराष्ट्राच्या नेमबाज सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याकरिता काही महिने ती जयपूरहून पनवेलला देखील आली होती. पॅरालिम्पिक स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकतानाच स्पर्धा विक्रमाची नोंद केली.

ऑलिम्पिक स्पर्धेत सपशेल निराशाजनक कामगिरी करणार्‍या खेळाडूंनी अवनीपासून स्फूर्ती घेतली पाहिजे. सर्वसाधारण खेळाडूंच्या ऑलिम्पिक स्पर्धेत अवनीने पदक नक्कीच घेतले असते, अशीच सर्वसाधारण प्रतिक्रिया समाज माध्यमावर उमटली होती. नेमबाजीत अवनीच्या यशापासून प्रेरणा घेत सिंगराज अधाना याने दहा मीटर्स एअर पिस्तूल प्रकारात ब्राँझपदकाची कमाई केली.

नीरज चोप्राचा वारसदार

नीरज चोप्राकडून प्रेरणा घेत सुमित अंतीलियाने दिव्यांगांच्या भालाफेकीत सुवर्ण वेध घेताना अतुलनीय कामगिरी केली आहे. ही कामगिरी करताना त्याने विश्वविक्रमही नोंदविला. मोटारसायकलच्या अपघातात डावा पाय गमावल्यानंतर त्याची अनेक स्वप्ने धुळीस मिळाली. परंतु त्याचा मित्र आणि दिव्यांग खेळाडू राजकुमार याने त्याला अ‍ॅथलेटिक्समध्ये भाग घेण्याचा सल्ला दिला.

त्याप्रमाणे त्याने 2017 मध्ये नितीन जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. गेल्या तीन वर्षांत जागतिक स्तरावर सुमितने अनेक वेळा विश्वविक्रमासह भरपूर पदके मिळवली आहेत. या पदकांच्या शिरपेचात त्याने पॅरालिम्पिक सुवर्णपदकाचा तुरा खोवला आहे.

अ‍ॅथलेटिक्समध्येच निशांत कुमार याने उंच उडीत रूपेरी कामगिरी केली. आठव्या वर्षी अपघातामुळे त्याला उजवा हात गमवावा लागला. मात्र या परिस्थितीस आत्मविश्वासाने सामोरे जात त्याने शैक्षणिक व क्रीडा या दोन्ही क्षेत्रांत यशस्वी कामगिरी केली आहे.

जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळाल्यानंतर दिव्यांगांच्या ऑलिम्पिकमध्ये त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती. जानेवारी महिन्यात कोरोनाच्या आजारामुळे त्याच्या सरावात काही दिवस खंड पडला. शारीरिक तंदुरुस्तीच्याही समस्येला त्याला तोंड द्यावे लागले. पण कमालीची जिद्द ठेवत त्याने पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आणि देशाची मान उंचावली.

दिव्यांगांच्या अन्य गटात मरियप्पन थांगवेलू या खेळाडूचे उंच उडीतील सुवर्णपदक थोडक्यात हुकले. रिओ येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले होते. टोकियो येथे मात्र पावसामुळे त्याचे मोजे भिजले आणि अपेक्षेइतकी पकड त्याला घेता आली नाही. अखेर त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या क्रीडा प्रकारात शरद कुमार ब्राँझपदकाचा मानकरी ठरला.

दिव्यांगांच्या आणखी एका गटात देवेंद्र झाजरिया या अनुभवी खेळाडूने भालाफेकीत रौप्यपदक जिंकले. यापूर्वी त्याने 2004 आणि 2016 च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तो व त्याचा सहकारी सुंदरसिंह गुर्जर यांनी ब्राँझपदक घेत देशाला आणखी एक पदक मिळवून दिले. गतिमंद मुलांच्या विभागात योगेश कथुरिया याने थाळीफेकीत ब्राँझपदक पटकावत पॅरालिम्पिक पदकाचे स्वप्न साकारले.

भाविनाची सनसनाटी कामगिरी

महिलांच्या व्हीलचेअर गटात भाविनाबेन पटेल हिने टेबल टेनिसमध्ये रौप्यपदक जिंकताना सनसनाटी कामगिरी केली. रिओ येथील 2016 ची पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि 2018 ची जागतिक स्पर्धा या दोन्ही स्पर्धांसाठी तिची निवड झाली होती. मात्र दिव्यांगांच्या संघटनांमधील अंतर्गत मतभेदांमुळे तिच्या या संधी हुकल्या होत्या. यंदा मात्र तिला टोकियो स्पर्धेसाठी संधी मिळाली. त्याचा फायदा घेत तिने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. या प्रवासात तिने रिओ सुवर्ण पदक विजेती बोरीस्लाव रँकोविक आणि चीनची मातब्बर खेळाडू झांग मिओ या दोन्ही खेळाडूंवर सनसनाटी विजय नोंदविला. अंतिम फेरीत तिचा अनुभव कमी पडला. कारण तिची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती. व्हीलचेअरवर बसून टेबल टेनिस खेळणे किती अवघड असते हे तिच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहणार्‍यांच्या लक्षात आले असेल.

भारताच्या या दिव्यांग खेळाडूंच्या कामगिरीत पॅरालिम्पिक असोसिएशन ऑफ इंडियाचा सिंहाचा वाटा आहे. या संघटनेच्या अध्यक्ष दीपा मलिक या स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्या स्वतः दिव्यांग खेळाडू असून आजपर्यंत पॅरालिम्पिक, जागतिक अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी पदकांची लयलूट केली आहे. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मानसन्मान मिळाले आहेत. केवळ क्रीडाक्षेत्र नव्हे तर अन्य क्षेत्रातील युवा लोकांना प्रेरणा देण्यासाठीही त्यांची व्याख्याने आयोजित केली जातात. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली संघटनेच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी खेळाडूंचे हित डोळ्यासमोर ठेवत खेळाडूंच्या मूलभूत समस्या दूर करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले.

दिव्यांग खेळाडू मिळेल त्या सुविधा आणि सोयींबाबत समाधान व्यक्त करीत आपल्या देशाची प्रतिमा कशी उंचावली जाईल हाच ध्यास ठेवत असतात. एरवी आपले सर्वसाधारण खेळाडू किरकोळ सुविधा नाही मिळाल्या तरी तक्रार करत असतात. प्रशिक्षक आणि संघटनांबरोबरही त्यांचा योग्य रीतीने सुसंवाद नसतो. अशा खेळाडूंनी दिव्यांग खेळाडूंकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. अवनी, सुमित, भाविनाबेन आदी दिव्यांग खेळाडूंना आदर्श मानून सर्वसाधारण खेळाडूंनी एकाग्रतेने स्पर्धेत भाग घेतला तर आगामी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ते भरघोस पदके मिळू शकतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news