मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईसह राज्यात केस कटिंग व दाढीचे दर 1 मे पासून वाढवण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती सलून चालकांच्या शिखर संघटना असलेल्या सलून व ब्युटी पार्लर असोसिएशन आणि नाभिक महामंडळाने दिली आहे. दरम्यान 1 मे पासून केस कटिंग व दाढीचे दर 30 टक्क्यांनी महागणार असल्याची माहिती खोडसाळपणाने कुणीतरी दिल्याचे संघटनानी स्पष्ट केले आहे.
याबाबत संघटनेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, संघटनेतून हद्दपार झालेल्या एका पदाधिकाऱ्याने हे खोडसाळपणाने दरवाढीचे वृत्त दिले आहे. मुळात संघटनेच्या यावर्षी पार पडलेल्या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करताना कोणतीही दरवाढ न करण्याचे संघटनेने ठरवले होते.
याआधी लॉकडाऊनमुळे घटलेले उत्पन्न आणि त्यात 50 टक्के क्षमता व फक्त केस कटिंगसाठी परवानगी अशा निर्बंधांमुळे संघटनेने सर्व सेवांचे दर 50 ते 100 टक्क्यांनी वाढवले होते. त्यानंतर आता सर्व निर्बंध दूर झाल्यानंतर आर्थिक उत्पन्नाची गाडी रुळावर येत आहे. अशावेळी महागाईने पिचलेल्या ग्राहकांवर दरवाढीचा बोझा न टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतल्याचे सलून ब्युटी पार्लर असोसिएशनने सांगितले.
महत्त्वाची बाब म्हणजे राज्यस्तरीय दरवाढ करण्याचा निर्णय हा संघटनेस नाभिक महामंडळाशी चर्चा करून घ्यावा लागतो. तसेच ही दरवाढ जानेवारी महिन्यात नाभिक समाजाच्या दादर येथील मध्यवर्ती कार्यालयातून घोषित केली जाते. काही जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी जूनमध्ये केली जाते. कधीही व कुठल्याही महिन्यात अचानकपणे एखाद्या पदाधिकाऱ्यास राज्यस्तरीय दरवाढ घोषित करण्याचा अधिकार नसल्याचे अधिक माहितीत संघटनेने सांगितले.