सावंतवाडी ; नागेश पाटील : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा दुवा असलेला ब्रिटिशकालीन आंबोली घाटमार्ग सध्या अनेक आव्हानांचा सामना करत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव घाटातील अवजड वाहतूक तूर्तास बंद ठेवण्यात आली आहे. घाटमार्गावर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला; मात्र दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळतात आणि का केला एवढा खर्च, असा प्रश्न उपस्थित करतात. सुरक्षितता हा सर्वांत महत्त्वाचा निकष पूर्ण करण्यासाठी पावसाळ्यात दरडी थोपवणे, हेच सार्वजनिक बांधकाम विभागासमोर एक मोठे आव्हान आहे. वेंगुर्ले-बेळगाव हा राज्यमार्ग आंबोली घाटातून जातो. घाटमार्गाची लांबी
सुमारे 13 कि.मी. आहे. आंबोली घाट हा ब्रिटिशकालीन असूनही अद्याप ठीकठाक आहे. सातत्याची अवजड वाहतूक व कोसळणार्या दरडींमुळे सध्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. आंबोलीचे वर्षा पर्यटन या घाटमार्गावर अवलंबून आहे, हे महत्त्वाचे. पावसाळी हंगाम सोडला तर इतर वेळी घाटात दरडी पडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
घाटमार्गाची मदार दोन ब्रिटिशकालीन पुलांवर आहे. त्यापैकी एक पूल दोन वर्षांपूर्वी घाटातील मुख्य धबधब्यासमोर मोठी दरड कोसळल्याने खचला. वर्षभरापूर्वीच या ठिकाणी अत्याधुनिक पुल उभारण्यात आला. अवजड वाहतूकही सुरू झाली. तेवढ्यात 'पूर्वीचा वस' देवस्थानालगतच्या दुसर्या पुलाच्या क्षमतेचा विषय समोर आला. त्यामुळे पुन्हा अवजड वाहतूक बंद करण्यात आली.
सध्या फक्त मध्यम, लहान स्वरूपाच्या वाहनांनाच घाटमार्गातून परवानगी आहे. देवस्थानाजवळचा पूल पाडून नवा पूल उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्याच्या विशेष अर्थसंकल्पात या पुलाच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. आंबोली घाटात रस्ते खचून खड्डे पडण्याचे प्रमाण वाढत आहे. वेळोवेळी भर टाकली जाते. आंबोलीतून 'चोरीछुपे' अवजड वाहने सोडली जातात. रात्रीच्या अंधारात हा खेळ जरा जास्तच चालतो.
कडेकपार्यांचा भाग तोडून या ठिकाणी दोन पदरी रस्ता करण्याचे नियोजन आहे. अर्थात घाटाची सुरक्षितता लक्षात घेऊनच निर्णय होतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकरी अभियंता अनिल आवटी यांनी सांगितले. ज्या ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता होती, त्या ठिकाणी रिटेनिंग वॉल बांधण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.