थैमान बिपरजॉय चक्रीवादळाचे

थैमान बिपरजॉय चक्रीवादळाचे

बिपरजॉय चक्रीवादळाचे थैमान सध्या अनुभवायला मिळत आहे. गेल्या अडीच दशकांत गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणारे हे पहिले वादळ आहे. गेल्या काही वर्षांत आपल्याला वादळांचे पूर्वानुमान अचूकपणाने वर्तवण्याचे तंत्र अवगत झाल्यामुळे जीवित आणि वित्तहानी कमी करण्यात यश आले आहे; पण त्याचबरोबर वादळांची संख्याही वाढत आहे. 1965 ते 2022 दरम्यान अरबी समुद्रात 13 चक्रीवादळे निर्माण झाली.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारपट्टी भागात सध्या भीतीचे वातावरण आहे. गेल्या 25 वर्षांचा इतिहास पाहिल्यास गुजरातच्या किनारपट्टीला धडकणारे हे पहिले चक्रीवादळ असेल. साधारणपणे हवेचा दाब जेव्हा कमी होतो तेव्हा आपण त्याला कमी दाबाचा पट्टा असे म्हणतो. तो अधिक तीव— झाला, तर त्याला डिप्रेशन म्हटले जाते. त्याहून दाब कमी झाला, तर डीपडिप्रेशन आणि त्यापेक्षाही हवेचा दाब नीचांकी पातळीवर गेला, तर त्याला चक्रीवादळ (सायक्लॉन) असे म्हटले जाते. चक्रीवादळामध्येही सिव्हियर सायक्लॉन, सुपर सायक्लॉन असे प्रकार असतात. वार्‍याचा वेग आणि हवेचा दाब हे चक्रीवादळांशी निगडित प्रमुख घटक आहेत. हवेचा दाब कमी होत जाईल त्यानुसार या प्रकारांमध्ये त्यांचे वर्गीकरण केले जाते. वार्‍याचा वेगही या प्रकारांनुसार बदलत जातो. वार्‍याचा वेग साधारणतः 48 ते 63 किलोमीटर प्रतितास इतका असेल, तर चक्रीवादळाची स्थिती आलेली आहे, असे म्हटले जाते.

चक्रीवादळे ही समुद्रावर तयार होतात. वेगवेगळ्या प्रदेशात त्यांना वेगवेगळी नावे आहेत. भारतात त्याला सायक्लॉन म्हटले जाते. अटलांटिक प्रदेशात त्यांना हरिकेन म्हटले जाते; पॅसिफिक प्रदेशात त्यांना टायफून म्हणतात, तर ऑस्ट्रेलियामध्ये त्यांना विलीविली म्हणतात. भारत, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका, बांगला देश आदी देशांनी या वादळांना नावे देण्यासाठी एक समिती स्थापन केली. कोणत्या वादळाविषयी आपण चर्चा करत आहोत हे समजावे, हा या नामकरणामागचा उद्देश होता. मागील काळात बंगालच्या उपसागरात आलेल्या वादळाला अम्फान असे नाव देण्यात आले होते. हे नाव थायलंडने सुचवले होते. 2020 मध्ये आलेल्या चक्रीवादळाला निसर्ग नाव देण्यात आले होते. भारतात चक्रीवादळे दोन कालखंडात होतात. एक म्हणजे मे ते जूनच्या सुरुवातीचा काळ आणि दुसरा म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा काळ. पावसाळ्यात चक्रीवादळे तयार होत नाहीत. चक्रीवादळ तयार होण्यास कारणीभूत असणार्‍या घटकांमध्ये दोन घटक महत्त्वाचे असतात. पहिले म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान 28 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असावे लागते आणि दुसरे म्हणजे खालील भागातील हवेतील वार्‍यांचा वेग आणि वरील भागातील वार्‍यांचा वेग यातील तफावत कमी असावी लागते. अधिक विस्ताराने सांगायचे, तर वार्‍याची दिशा आणि वेग उंचीप्रमाणे बदलत जातो. जमिनीपासून पाच किलोमीटर उंचीपर्यंत वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असतात, तर 5 ते 12 किलोमीटर उंचीपर्यंत वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. या दोन्हीतील फरक जास्त असेल, तर चक्रीवादळे तयार होत नाहीत. पावसाळ्यात समुद्राचे तापमानही कमी झालेले असते आणि वार्‍यांमधील तफावतही अधिक असल्यामुळे या ऋतूत सहसा चक्रीवादळे तयार होत नाहीत.

समुद्रात कोणतेही चक्रीवादळ तयार झाल्यानंतर त्यांना वाहत जाण्यासाठी दोन दिशा मिळतात. एक उत्तरेकडे जाते आणि दुसरे म्हणजे वरील भागातील पूर्वेकडून पश्चिमेकडे ढकलणारे वारे. या दोन्ही दाबांचा परिणाम होऊन वादळ पुढे सरकत जाते. त्यामुळे बरेचदा ते पश्चिमेकडे येमेनच्या किंवा ओमानच्या किनार्‍याकडे जाते. अन्यथा ते गुजरातच्या किनारपट्टीला धडकते. मुंबईच्या किनारपट्टीला सहसा ते धडकत नाही. 2017 मध्ये ओकी वादळ मुंबईच्या दिशेने आले होते; परंतु ते मध्येच क्षीण झाले. गेल्या 140 वर्षांत एकदाही मुंबईला चक्रीवादळाने तडाखा दिलेला नाही, ही या आर्थिक राजधानीच्या द़ृष्टीने जमेचीच बाजू म्हणायला हवी. चक्रीवादळांची रचना पाहिली, तर त्याचा मध्यभाग साधारणपणे 50 ते 60 किलोमीटर त्रिज्येचा असतो. त्याला वादळाचा डोळा म्हटले जाते. या भागात आकाश निरभ— असते, ढग नसतात आणि पाऊसही नसतो. त्यानंतर 60 ते 160 किलोमीटर हा 100 किलोमीटरचा भाग असतो तेथे प्रचंड उंचीचे भिंतीसारखे उभे ढग असतात. या ढगांत पाऊस असतो. त्यामुळे हा भाग अधिक नुकसान करणारा असतो. याला वॉल क्लाऊड रिजन म्हणतात.

अनेकांना प्रश्न पडतो की, या चक्रीवादळांना ही ऊर्जा कोठून मिळते? समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन त्या वाफेचे पुन्हा पाण्याच्या थेंबात रूपांतर होते तेव्हा त्यातून ऊर्जा बाहेर पडत असते. याला मराठीत गुप्त उष्णता म्हणतात. ही उष्णता वादळांना ऊर्जा किंवा ताकद देत असते. वादळ जेव्हा जमिनीवर येते तेव्हा समुद्राच्या पाण्यापासून मिळणारा वाफेचा पुरवठा बंद होतो आणि वादळ हळूहळू क्षीण होत जाते.

कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले की, त्याभोवती वारे घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरत असतात. त्यात उंचीनुसार काही फरक होतो आहे का, यावर हवामान खाते आणि तज्ज्ञ लक्ष ठेवून असतात. त्यातूनच हे वादळ कोणत्या दिशेने जाईल, याचा अंदाज घेऊन गणिती प्रारूपांचा वापर करून त्याचे निरीक्षण सुरू होते. अलीकडील काळात वादळांची पूर्वसूचना दिली जात असल्यामुळे एनडीआरएफकडून नियमावलीनुसार उपाययोजना केल्या जातात. यामध्ये किनार्‍यालगतच्या लोकांना हलवणे, मच्छिमारांना सूचना देणे यांचा समावेश होतो. एक शेवटचा कुतूहलाचा मुद्दा मांडणे आवश्यक आहे तो म्हणजे, चक्रीवादळांचा मान्सूनच्या वितरणावर कोणताही परिणाम होत नाही. मान्सूनचे वारे आणि मान्सूनचे वितरण हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. चक्रीवादळ हे दोन-तीन दिवस असते आणि त्यानंतर वातावरणीय स्थिती पूर्ववत होते. त्यामुळे मान्सूनसाठी ही चक्रीवादळे अडथळा आणणारी ठरतात, असे म्हणता येत नाही. उलट झालाच, तर काही वेळा मान्सून भराभर पुढे ढकलला जातो. त्यामुळे मान्सूनागमन लवकर होऊ शकते.

– डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news