थर्टी फर्स्ट : साऊंड सिस्टीमला रात्री 12 पर्यंत परवानगी

थर्टी फर्स्ट : साऊंड सिस्टीमला रात्री 12 पर्यंत परवानगी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सर्वसामान्यांना निर्विघ्नपणे साजरा करता यावा, यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील आहे. मद्य प्राशन करून कोणीही वाहन चालवू नये, अशा सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. तपासणी नाक्यांवर वाहनांची तपासणी केली जाणार आहे. साऊंड सिस्टीमलाही रात्री 12 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

थर्टी फर्स्टला काही हुल्लडबाजांकडून भरधाव वाहने पळविणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवित दुचाकी घेऊन जाणे, ट्रिपल सीट, मद्यप्राशन करून वाहन चालविणार्‍यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्याभरात संबंधित पोलिस ठाण्यांना त्यांच्या त्यांच्या हद्दीमध्ये नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील सर्वही 33 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या मदतीने मद्यपींची तपासणी केली जाणार आहे. जागेवरच खटले दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत. गस्ती पथके, भरारी पथकांच्या माध्यमातून हुल्लडबाजांवर लक्ष ठेवले जाणार आहे.

58,000 मद्यपींनी घेतला रितसर परवाना

कोरोनाचे कोणतेही निर्बंध यंदा नसल्याने थर्टी फर्स्ट जल्लोषात साजरा करण्याची तयारी सुरू आहे. मद्यप्राशनाचे परवाने घेण्यासाठीही मोठी झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे. 58 हजार परवान्यांचे वितरण झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली.

राज्य शासनाने थर्टी फर्स्टला पहाटे पाचपर्यंत परमीट रुम व बार सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, कोणीही मद्यप्राशन करून रस्त्यावर दंगा करू शकणार नाही, यासाठी बंदोबस्त नेमण्यात आला आहे. मद्य प्राशन करून वाहने चालविणार्‍यांवर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. अशावेळी मद्यपरवाना जवळ बाळगणेही आवश्यक आहे.

विदेशी मद्यासाठींचे 33 हजार परवाने जिल्ह्यात वितरित झाले आहेत. देशी मद्यासाठी 25 हजार जणांनी परवाने घेतले आहेत. विदेशी मद्याचा परवाना 5 रुपये, तर देशी मद्याचा परवाना 2 रुपयांना उपलब्ध करण्यात आला आहे. हे परवाने सर्वच बिअरबार, वाईन्स शॉपींमध्ये दिले जातात. या परवान्यांतून 2 लाख 15 हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे.

पन्हाळ्यावर येणार आहात, तर मग हे वाचाच!

पन्हाळा : पन्हाळगडावर 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी येणार असाल तर सांभाळूनच या! कुटुंबासमवेत आनंदाने गड फिरण्यासाठी या! सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गडावर मस्ती करण्यासाठी येणार असाल, तर मात्र पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

पन्हाळगडाचे पावित्र्य जपणे, जोपासणे आपले काम आहे हे विसरू नका. पन्हाळगडावर 31 डिसेंबर रोजी 70 पोलिस व चार अधिकारी ठिकठिकाणी प्रत्येक प्रवाशाची तपासणी करणार आहेत. वाघबीळ, बुधवार पेठ पन्हाळा, मसाई पठार आदी ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पन्हाळगडाचे पावित्र्य राखले जावे व मद्यपान तसेच दंगामस्ती होऊ नये यासाठी पन्हाळा पोलिसांनी पर्यटकांना आवाहन केले आहे.

गडाचे पावित्र्य राखण्याची विनंती केली आहे. याबाबत पन्हाळा पोलिसांनी आवाहन केले आहे की, पन्हाळगडावर येताय तर गडाचे पावित्र्य राखा. गडावर हुल्लडबाजी व मद्यपान करताना कोणी आढळून आला, तर पन्हाळा पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आणा, परस्पर कायदा हाती घेऊन कोणी वागू नये, असेही पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी आवाहन केले आहे.
पन्हाळा पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. गडावर येणार्‍या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 70 पोलिस यासाठी तैनात असून गस्ती पथक व चार अधिकारी या सर्वांवर लक्ष ठेवून असणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news